औरंगाबाद - शहरात नवीन प्रशासकीय किंवा पोलिस अधिकारी आल्यानंतर नव्याचे नऊ दिवस चर्चा होत असते. मात्र औरंगाबाद पोलिस आयुक्त म्हणून अमितेशकुमार रुजू झाल्यापासून केवळ अधिकारी आणि पोलिस खात्यातच त्यांची चर्चा नाही तर, शहरातील प्रत्येक चौकात, नाक्यावर, पानटपरी आणि एवढेच नाही तर ऑफिसमधील लंच टेबलवरही पोलिसांच्या कामगिरीबद्दल बोलले जात आहे. सर्व सामान्य नागरिकाला पोलिसांचा कायम धाक असतो. पण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आणि सत्ता व पैशांचे बळ ज्यांच्या पाठीशी असते त्यांना कोणीच आपले काही बिघडवू शकत नाही असा समज असतो. तो गैरसमज असल्याची उदाहरणे सध्या शहरात पाहायला मिळत असल्याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा आहे. रस्त्यावरुन डोक्याला काळा कपडा बांधून फिरणारे (चार्ली) पोलिस तर कुतूहलाचा विषय झाले आहेत. कुठे काही चुकीचे दिसत असेल तर हे चार्ली पथक तत्काळ हस्तक्षेप करत प्रकरण वाढण्याला वेळीच रोखत आहे. भर वस्तीत गांजा कुठे मिळतो, विचारणारा कोण ? शाळा सुटायला वेळ होता, तेव्हा काही पालक घोळक्या घोळक्याने गप्पा मारत उभे होते. त्यात एक माजी नगरसेवक आले, गप्पांमध्ये सहभागी झाले. बोलण्याच...