बाळासाहेब आंबेडकरांशी बोलायला मिळणे हा तसा आनंददायी क्षण. मानवमुक्तीचे उदगाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वंशज म्हणून त्यांचे महत्त्व आहेच, त्याशिवाय बाळासाहेबांनी विचारवंत आणि ध्येयनिष्ठ आणि कणा असलेले राजकीय नेते म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा श्रध्देय नेत्याशी बोलण्याची ८ एप्रिल रोजी संधी मिळाली. माझे वडील अँड. रमेशभाई खंडागळे लिखित 'एकीत जय आणि बेकीत क्षय' पुस्तक प्रकाशनानिमीत्त औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावर त्यांची भेट झाली. जवळपास तासभर त्यांच्या सहवासात होतो. त्यावेळी ते मराठवाडा आणि औरंगाबाद येथील अनेक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करत होते. कार्यकर्त्यांच्या अडचणी-समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाय सुचवत होते. काहीवेळेस ज्यांच्या मार्फत या समस्या सुटतील अशा मंत्री, प्रशासकीय अधिकारी उच्चपदस्थ राजकारणी यांना फोनवर सुचना देत होते. माझे वडील रमेशभाई यांच्यामुळे सूर्यकुळातील या राजहंसाशी मी संवाद साधला. तो नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांची ज्या खालच्या थरावर जावून टिंगल उडविली त्याविषयी. त्यासोबतच ओघाने आले...