पंतप्रधान देशातील दोन समाजामधील भेद ठळक होईल असे विधान भरसभेत करतात. त्यांचा उद्देश स्पष्ट असतो की बहुसंख्य समाजाचे एकगठ्ठा मतदान भाजपला झाले पाहिजे. त्यामुळेच कदाचित त्यांच्या पक्षाने देशातील सर्वात मोठ्या राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील जाहीर सभेत कबरस्थान आणि स्मशानाचा उल्लेख करुन मोदींनी प्रचाराची पातळी शेवटच्या टोकाला नेऊन ठेवली. 18 फेब्रुवारीला झालेल्या या सभेत मोदींनी मुस्लिमांच्या कबरस्थानला जशा सोयी-सुविधा देता तशाच हिंदूंच्या स्मशानाला देत चला, असे अखिलेश यादवांना सुनावले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी रमजान आणि दिवाळीही यूपीच्या डावात मांडली. वाराणसीत रमजानमध्ये वीजपुरवठा केला जातो मात्र दिवाळीत अंधार असतो असे मोदी म्हणाले. अखिलेश यांनी लागलीच मोदींचे आरोप फेटाळून लावले. एकदा स्वतःच्या मतदारसंघात जाऊन विचारा दिवाळीत अंधार असतो का, असा टोला त्यांनी लगावला. मात्र पंतप्रधान पदावरील व्यक्तीने स्मशान-कबरस्थान-रमजान-दिवाळी हे निवडणुकीच्या राजकारणाचे विषय करणे खेदजनक आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्या पक्षातील आग ओकणाऱ्या नेत्या...