मुख्य सामग्रीवर वगळा

औरंगाबाद मनपा निवडणूक ऐतिहासिक होणार

औरंगाबाद शहर म्हटलं की डोळ्या समोर येतात, अजिंठा - वेरुळच्या लेण्या, बीबीचा मकबरा, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान, बौध्द लेणी, आणि माझं विद्यापीठ. इथल्या चिकलठाणा, वाळूज एमआयडीसी मुळं औरंगाबाद शहर आशियातील सर्वात वेगाने वाढणारे शहर बनले होते. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि जगाच्या नकाशावरील औरंगाबाद शहर - जिल्हा आहे. इथल्या जायकवाडी धरणामुळे येथील एमआयडीसी भरभराटीस आली. औरंगाबादच्या पाण्याची चव इतकी भारी की देशभरातील बियर उत्पादकांना इथं आपल्या फॅक्टरीज उभाराव्या वाटल्या. एका ऑस्ट्रेलियन बियर कंपनीने हे पाणी बियर साठी अत्यंत चांगले उपयुक्त असल्याचा अहवालदेखील दिला आहे. त्यामुळेच औरंगाबादेत देशातील प्रत्येक बियरचा कारखाना आहे. आणि आता धान्यापासून मद्यनिर्मीतीचेही कारखाने हे जायकवाडी धरणालगत पैठण एमआयडीसीतच उभारले जाऊ लागले आहेत. असं हे औद्योगिक आणि सांस्कृतिक, शैक्षणीक दृष्ट्या महत्त्वाचं शहर.
औरंगाबादवर स्वातंत्र्यपूर्व काळात निजामांचा अंमल होता. औरंगाबाद हे हैद्राबादला जोडलेलं होतं. येथील जून्या इमारतीवर अजूनही निजामकालीन छाप दिसते. मलिक अंबरने या शहराची शास्त्रशुध्द रचना केली होती. शहराची पिण्याच्यापाण्याची व्यवस्था, वाहतूक, मलनिस्सारण या मुलभूत सोयींचा मलिक अंबरने व्यवस्थीत आराखडा तयार केला होता. या अराखड्यानुसार हे शहर वसवलेलं आहे. पानचक्की च्या भिंतीवरुन पडणारे पाणी आजही येथे येणा-या नागरिकांसाठी , सैलानींचे आकर्षण आहे. असा एतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचा विकास आज औरंगाबाद की संभाजीनगर या वादातच अडकून पडला आहे.
20 वर्षांपासून औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेना - भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. येत्या 11 ऐप्रिल रोजी या एतिहासीक शहराच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार यासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक देखील ऐतिहासिकच ठरणार अशी चिन्ह दिसत आहेत.
औरंगाबाद महापालिकेसाठीची पहिली निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेला औरंगाबादने महापालिकेने मुंबई ठाण्यानंतर पहिलं मोठं यश मिळवून दिलं. 60 सदस्यांच्या पालिकेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. मात्र राजकारणात नवख्या असलेल्या या शिवसैनिकांना पालिकेचे महापौरपद मात्र मिळवता आले नाही. कॉग्रेसने कमी जागा जिंकून देखील अपक्ष , रिपाई , दलित पँथर , मुस्लिम लिग यांच्या सहकार्याने शांताराम काळे यांना औरंगाबाद शहराचे पहिले महापौर बनविले. महानगर पालिकेच्या या पहिल्या पाच वर्षात शिवसेनेकडून विद्यमान अपक्ष आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. औरंगाबाद मधील शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रदिप जैस्वाल हे 2010 च्या विधानसभा निवडणूकीपर्यंत सेनेसोबत होते. सेने कडून ते नगरसेवक, महापौर, खासदार झाले मात्र मागील विधानसभा निवडणूकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यांनी औरंगाबाद मध्य मधुन अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. आज औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे पहिले महापौर शिवसेना - भाजप युतीच्या विरोधात आहेत. तर कॉंग्रेस - राष्ट्रवादी यांनी प्रथमच मनपा निवडणूकीत आघाडी केली आहे. या आघाडी सोबत जैस्वाल यांची शहर विकास आघाडी देखील आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही सत्ताधारी शिवसेना-भाजप युती विरुध्द कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि जैस्वाल यांची शहर विकास प्रगती आघाडी यांच्यातच होणार अशी चिन्ह आहेत. यासोबतच बंडखोरांशीही कडवी झुंज या युती आणि आघाडीला द्यावी लागणार आहे. शिवसेनेच्या जाहिर झालेल्या पहिल्या यादीवर अनेक शिवसैनिक नाराज आहेत. खासदार चंद्रकांत खैरे यांनी नक्षत्रवाडी या मागासवर्गीयांसाठी राखीव प्रभागातून स्वत:च्या मुलाला ह्रषिकेश खैरेला उमेदवारी मिळवून दिली आहे. एवढच नाही तर खैरेंच्या ड्रायव्हरला देखील शिवसेनेचे अधिकृत तिकीट मिळाले आहे. याचे शल्यं शिवसैनिकांना अधिक आहे. यासोबतच सेनेने यंदा अनेक तरुण नवे चेहरे दिले आहेत. पहिल्या यादीतील 36 पैकी 30 चेहरे नविन आहेत. यामुळे शिवसेनेत अनेक बंडोबा असणार यात शंकाच नाही. या बंडोबांना थंड करण्यातच नेत्यांची शक्ती खर्च होणार आहे.
2005च्या निवडणूकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडा झाली नव्हती. तेव्हा कॉंग्रेसने रिपब्लीकन पक्षाच्या 5 ते 6 उमेदवारांना पंजाच्या निशाणीवर उभे केले होते . यातील संजय जगताप, मिलिंद दाभाडे , प्रकाश गायकवाड यांच्या पत्नी आणि इतर दोन कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून आले होते. यावेळीही कॉंग्रेस दलित उमेदवार फोडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच शिवसेना भाजप प्रमाणेच कॉंग्रेस राष्ट्रवादीलाही बंडखोरीची मोठी बाधा होणार आहे. आघाडीत कॉंग्रेस 53 , राष्ट्रवादी 30 आणि शहर प्रगती विकास आघाडीला 16 जागा सोडण्यात आल्या असल्यातरी उमेदवार जाहिर करण्यात आलेले नाहीत. बंडोबांना शांत करण्यासाठीच आघाडीने हा पवित्रा घेतलेला असला तरी उमेदवारी मिळो अथवा ना मिळो इच्छुकांनी अर्ज दाखल करुन ठेवले आहेत.
महापालिकेत मोठ्याप्रमाणात असलेल्या या चार पक्षांव्यतरिक्त भारिप बहुजन महासंघ, रिपाई, भाकप, माकप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , समाजवादी पार्टी, शिवराज्य पक्ष, आणि अनेक संघटना या निवडणूकीत उतरणार आहेत. आज शनिवार आणि सोमवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत . त्यानंतर 99 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात राहतात हे उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतरच कळेल.
एकूणच कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शहर प्रगती विकास आघाडी यांची ऐतिहासिक आघाडी , आणि शिवसेना - भाजपची अनैसर्गीक युती किती जागा मिळवतात आणि इतर पक्ष आणि अपक्षांना कसे आपल्या जाळ्यात ओढून घेतात यावरच महापालिकेची सत्ता कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे. तुर्तास निवडणूकीचा धुराळा उडाला आहे, त्यामुळे अंधूक अंधूकच दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...