मुख्य सामग्रीवर वगळा

सोनेरी वर्खाच्या दगडाच्या देशा

आज महाराष्ट्र दिन. (हो दिनच ''दीन'' नाही. ) आज नुसताच महाराष्ट्र दिन नाही तर कामगार दिन देखील आहे. (हे तुम्हाला माहित नाही असं गृहित धरून मी मुळीच लिहीत नाही. तर तुम्हाला हे माहित आहे म्हणूनच लिहित आहे. ) तसच आज महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव. म्हणजेच 1 मे 2010 हा दिवस असा सुवर्ण त्रिकोणाने सजला आहे.
या महाराष्ट्राचा इतिहास वगैरे मी सांगत बसणार नाही. काय पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचे, मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्वखुशीने सामिल झालेला मराठवाडा, काहि अटींनीशी महाराष्ट्रात आलेला विदर्भ. हे सगळं तुम्हाला रोजच्या पेपरातून, टिव्ही वरुन वाचायला पहायला मिळत आहेच. काहींना या इतिहासाबद्दल जास्तच जाणून घ्यायचे असेल तर बरीच पुस्तकंही छापली गेली आहेत. त्यामुळे त्यात मी आणखी काय वेगळं सांगणार. असो.
हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्र शासन धुमधडाक्यात साजरा करत आहे. (शासनाने तसं त्यांच्या फाईलींवर, डाय-यांवर , जाहिरातीत 50चा आकडा आणि तुतारीचे चित्र दाखवायला कधीपस्नचं सुरुवात केलीय. ) महाराष्ट्र शासन साजरा करत आहे म्हणजे कांग्रेस, राष्ट्रवादी. मग शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मराठी आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि मुद्यावर वाढलेल्या पक्षांनी काय फक्त सरकारी खेळच पहात रहायचा का ? तर बिलकूल नाही आणि भाजपाचे म्हणाल तर हा राष्ट्रीय पक्ष. या पक्षाचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा . कदाचित भाजपा 1 मे काळा दिवसही साजरा करतील. त्यामुळे या सेलिब्रेशनच्या युगात, दिखाव्याच्या जगात शासन, सेना आणि मनसे यांच्यासाठी महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव हा ''महा इव्हेंट''.
हा महाइव्हेंट मनसेने पुरेपुर कॅश केलाय. हे सुवर्ण महोत्सवी दिनाच्या पुर्वसंध्येला मराठी न्यूज चॅनलाला डोळे लावून बसलेल्या प्रत्येक मराठी आणि गैर मराठी माणसाने बघीतले असेल. शिवसेनेने केलेल्या रक्तदान महायज्ञाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याचाही मोठा गाजावाजा झाला. पण हे सामाजिकदृष्टया फार मोठे काम झाले हे देखील महाराष्ट्राने मान्य केले. मात्र सुवर्ण महोत्सवाच्या पुर्वसंध्येला पुतण्याने काकावर मात केली.
शिवसेनेने आज मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शिवराज्याभिषेक शिल्पाचं अनावरण आणि कलादालनाचं उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते केलं. शिवाजी पार्कात उभारलेल्या कलादालनात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास साकारला. मात्र न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये या बातमीला आज काहिसं कमी महत्त्व होतं तर मनसेच्या "महाराष्ट्र माझा'' या रंगारंग कार्यक्रमाने जास्त फुटेज घेतलेलं दिसलं. एकूणच पुतण्याने काकाला पुन्हा एकदा मात दिली. हिंदी चॅनलवरतर चाचा-भतिजा का "रण" . अशाच काहिशा मथळ्याखाली बातम्या दाखविल्या जात होत्या. एकंदर या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या सोहळ्याचे जेवढे आप्रुप या दोन ठाकरेंना झाले तेवढे खचितच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयन जनतेला झाले असेल, असे वाटत राहते. आज महाराष्ट्र माझा कार्यक्रमात मराठमोळी लावणी थिरकली, शास्त्रीय संगीताने हा सोहळा सजला, मालवणी वस्त्रहरणने सगळ्यांना हसायला लावलं, त्याआधी महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील चव खवय्यांनी चाखली, आणि समारोप झाला तो महाराष्ट्राच्या आधुनिक शिल्पकारांच्या सन्मानाने. आता उद्याचा दिवस , खरं तर संध्याकाळ नव्हे रात्र गाजेल ती शिवसेनेच्या गर्जा महाराष्ट्राने. मात्र एक दिवस आधी मनसेनं बाजी मारलीय. मात्र या सेना आणि मनसेच्या रंगारंग कार्यक्रमात अंधारात असलेल्या अर्ध्या महाराष्ट्राचा कोणाला विसर पडू नये. विदर्भातील कास्तकारांच्या आत्महत्या - त्यांच्या विधवांचे प्रश्न या लक्ष दिपांच्या-आतिषबाजीच्या झगमगाटात झाकोळून जाऊ नयेत, मराठवाड्यातील खेड्यात-तांड्यावर पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाहीए, शहरांची अवस्थाही या पेक्षा वेगळी नाही. इथं या मुंबापुरीत सुवर्णमहोत्सवाचे पेग रिचवतांना कुठेतरी आपल्याच बांधवांच्या घशाला कोरड पडली असेल हे देखील लक्षात असुद्यावे.
एवढीच या महाराष्ट्राची 50 वर्षांपासूनची विनंती पुन्हाएकदा आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...