मुख्य सामग्रीवर वगळा

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी ;
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे ?

असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडेत असेल ना. पण हा प्रश्न आपल्याला वारंवार का पडतो, आपल्या संवेदना इतक्या बोथट का झाल्या आहेत. आपल्या आसपास काही तरी वाईट घडतं आहे. काही माणूसकीला काळीमा फासणारं घडत आहे. काही अनैसर्गिक घडत आहे. या सर्व अघटीतांचे आपण केवळ मुक साक्षीदार का होत आहोत. गांधींची तीन माकडं आपण बनलो आहोत का ?
....
एक प्रसंग

एका शहरातील एक गजबजलेला चौक. सायंकाळची वेळ. एक वेडी बाई रस्त्यावर मरणप्राय वेदनेने ओरडते आहे. ती गर्भवती आहे. तिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली आहे. तिच्या बाळांतकळा आणि तिच्या मरणकळा यात कोणतीच भेदरेषा उरलेली नाही. तिचा आक्रोश क्षणा क्षणाला वाढतच जात आहे. तिच्या आसपास बघ्यांची गर्दी जमते. विरते. पुन्हा नवे लोक येऊन बघतात. निघून जातात. सुर्याचीही जाण्याची वेळ झालीय. तोही कधी कुणासाठी थांबत नाही. त्या वेडीचा टाहो आता अधिकच व्याकूळ झालेला. भर रस्तावर ती एका बाळाला जन्म देते. रस्त्यावर पैदा झालेलं ते पोर सर्वांची सहानुभूती मिळवतं. मदत मात्र नाही. पुढचे दोन तीन तास ते नवजात बालक आणि वेडी बाळांतीण त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून. काय म्हणत असेल त्या वेड्या आईची वेडी माया , ''मी जन्मत:च तुला रस्त्यावर आणलं. मला विचारु नकोस तुझा बाप कोण." की, ती काहीच म्हटली नसेल. काही म्हणण्याचे त्राण तरी कुठे होते तिच्यात. पुढच्या दोन तीन तासानंतर कुणाच्यातरी काळजात माणूसकीचा पाझर फूटला आणि त्या बाळ-बाळांतिणीला तिथनं दवाखाण्यात हलवण्यात आलं.

......


हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील , नाटकातील नाही तर, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात घडलेला आहे. तुम्ही पेपर मधे वाचलं असेल. टीव्हीवर बघीतलही असेल. बीड शहराच्या एका नाक्यावर रस्त्याकडेला हे सगळं घडत होतं तेव्हा कोणीच त्या वेडीच्या मदतीला धावलं नाही. एक साधा फोनही कोणी सरकारी दवाखाण्याला लावला नाही. अँबुलन्स बोलावली नाही. खिशातला / पर्समधला मोबाईल काय केवळ खयाली खुशाली विचारण्यासाठीच बाळगतो का आपण. ( मी कायम आपण - आपण म्हणतो आहे, ते जाणीव पुर्वक. कारण हा एक प्रसंग आहे, जिथे आपण नव्हतो. पण बसस्टॉपवर, रेल्वेस्टेशनवर एखादा कुली - म्हातारा - एखादी स्त्री एक मोठं गाठोडं पुढ्यात घेऊन ओशाळल्या नजरेने उभे असतात, कोणीतरी या गाठोड्याला टेकु देईल म्हणून, पण आपण कधीच त्या गाठोड्याला हात लावण्यासाठी वाकलेलो नसतो. का शर्टची इस्त्री मोडेल म्हणून - की हात मळतील म्हणून. म्हणून हा आपण. )

ग्रामीण भागात अजून माणूसकी शिल्लक आहे असे वाटत होते. पण या प्रसंगाने हा भ्रम दुर झाला. मुंबई - पुणे या महानगरांमध्ये कुणालाच दुस-यांसाठी वेळ नसतो. त्यांच्या वेळेचं - वागण्याचं कौतूक मुळीच नाही, पण मराठवाड्यातल्या एका ग्रामीण जिल्ह्यातही आता माणसला माणसासाठी वेळ उरलेला नाही.
या घटनेतून आपण 'प्रेतांपरी' झालोय हे जसे सिध्द झाले तसेच ज्या वेड्या स्त्रीला केवळ ती वेडी आहे म्हणून तिचा यथेच्छ उपभोग घेवून तिला मरण्यासाठी रस्त्यावर सोडून देणा-या नराधमाला जितकी दुषणं द्यावी तितकी कमीच आहेत.
आज जर एक वेडी स्त्री वासणेची शिकार होत असेल तर, धड धाकट लेकी - बाळी , आया - बहिणींच्या सुरक्षेचे काय ?
त्या वेड्या आईच्या बाळाच्या भविष्याचे काय? त्या बिचा-याच्या आयुष्यात काय वाढून ठेवलय कोण जाणे? प्रश्न प्रश्न आणि प्रश्नांचे वेटोळे तेवढे दिसत आहे?

तुमच्याही आयुष्यात प्रश्न आहेत . कांद्याचे भाव वाढलेत. पेट्रोल परवडेनसे झाले. महागाई रोज नवा उच्चांक गाठत आहे. मल्टीप्लेक्सेसची तिकटं नेमकी सुटीच्या दिवशीच का वाढतात. तुमचे आमचे हे प्रश्न जीवन सुखकर करण्यासाठीचे आहेत. मात्र त्या दोन जीवांच्या जगण्याचाच प्रश्न आहे.

हे सगळं आपल्या आसपास घडत असतांना आपण गप्प असतो. गप्प गप्प असतो. आपला आणि 'त्यांचा' काहीच संबंध नाही, ही भावना आपली बळावत चालली आहे. ही दरी सांधली पाहिजे. या सुस्थित आयुष्यापासून त्या विस्थापित जगण्यापर्यंत एक सेतू बांधला पाहिजे. थोड्या थंड जरुर झाल्यात पण आपल्या संवेदना मेलेल्या नाहित, नसता या शेवटापर्यंत तुम्ही आलाच नसता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...