मुख्य सामग्रीवर वगळा

तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य


चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी दासू वैद्य यांनी गाणी लिहिली आहेत. नुकतीच दिव्य मराठी या माझ्या वेबसाईट साठी (दिव्य मराठी मध्ये मी उपसंपादक म्हणून आहे, म्हणून माझी वेबसाईट) त्यांची मुलाखत घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या गप्पांमध्ये त्यांनी चित्रपट आणि संत तुकाराम यांच्यासंबधी बरेच विवेचन केले. यातून दासू सरांचा व्यासंग आणि तुकारामाकडे पाहण्याची दृष्टी ही कळली. ही मुलाखत म्हणजे माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.  माझ्या अल्पबुद्धीला जेवढे पचले तेवढे या मुलाखतीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार, १२ मे २०१२ रोजी आमच्या दिव्य मराठीच्या वेबसाईटवर ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. 

तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य

ज्ञानबा-तुकाराम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम या चित्रपटाच्या गीत लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुकाराम कळण्यास मदत झाली. तुकाराम हे प्रकरण समजून घेणं तसं फार अवघड आहे. ते कवींचेही कवी किंबहूना कवींचे बाप आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यातील कवीचा गौरव आहे. कारण चारशे वर्षांनंतरही त्यांच्या अभंगासारखी एखादी कविता आम्हाला लिहिता येत नाही, अशी प्रांजळ कबुली दिली आहे 'तुकाराम' या आगामी चित्रपटाचे गीतकार दासू वैद्य यांनी.

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यानिमित्ताने दिव्य मराठी डॉट कॉमने दासू वैद्य यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी चित्रपटाच्या निर्मितीपासून गीत लेखनाचा अनुभव आणि तुकाराम या विषयाने झपाटलेल्या टीम बद्दल ते भरभरून बोलले.

गप्पांना सुरुवात झाली ती चित्रपटाच्या नावापासूनच. चित्रपटाच्या नावात फक्त तुकाराम एवढाच उल्लेख का आहे. म्हणजे संबंध महाराष्ट्रला ते संत तुकाराम म्हणून परिचीत असताना केवळ तुकाराम एवढेच नाव असण्याचे काही खास कारण?

तुकाराम हे संत होते किंबहुना ते महान संत आहेत,  यात आमचे दुमत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, या चित्रपटातून तुकारामांचा जीवनपट उलगडत जातो. त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर त्यांनी काय भूमिका घेतली, हे सांगण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. त्यांच्या बालपणापासून संत पदापर्यंत पोचण्याचा प्रवास, त्यासोबतच नंतरच्या काळातील त्यांचे अभंग आणि तत्वज्ञान हा संपूर्ण काळ यात मांडण्यात आला आहे. त्यामुळे केवळ संत तुकाराम एवढाच सीमित हा विषय नाही. तर त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास यात आहे.

या चित्रपटाच्या पटकथेविषयी काय सांगाल?

चित्रपटाची पटकथा हाच चित्रपटाचा आत्मा असतो.  प्रशांत दळवी आणि अजित दळवी यांनी अतिशय समृद्ध आणि मजबूत पटकथा लिहिली आहे. ५-६ वर्षांच्या अभ्यासातून ही पटकथा तयार झाली आहे आणि पटकथाच एवढी सुंदर असल्यामुळे त्यातूनच मला गाणी उलगडत गेली.

या चित्रपटात तुकारामांचे अभंग आणि तुमची गीते असा योग जुळून आला आहे, यांचा ताळमेळ कसा साधला?

मी मुळात कवी असल्यामुळे माझ्यातील कवी जपत मी गीत लेखन करत असतो. चंद्रकांत कुलकर्णी आणि मी अनेक वर्षांपासूनसोबत आहोत. तरीही, तुकाराम या चित्रपटासाठी गीत लेखनाबद्दल मला विचारणा झाली तेव्हा, ती माझ्यासाठी जेवढी आनंदाची गोष्ट होती. त्यासोबतच मोठी जोखीम आणि जबाबदारी देखील होती. चित्रपटातील दहा गीतांपैकी चार तुकारामांचे अभंग आहेत तर चार गीतांचे लेखन मी केले आहे. ते करत असताना तुकाराम मला अधिकाधिक उलगडत गेले. चारशे वर्षांपूर्वी तुकारामांनी नाशिकच्या कुंभमेळ्याला 'व्यर्थ सायास' म्हटले आहे. त्या काळात हा माणूस असं कसं म्हणू शकला. हे धारिष्ठ्य त्यांच्यात कुठून आले, असे प्रश्न पडत होते. त्याबरोबरच ते विठ्ठलाचे ही भक्त आहेत.  यातून त्यांची व्याप्ती आपल्याला समजते. हाच तुकारामांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू समोर ठेवून गाणी लिहायची होती.

यातील एक गाणं म्हणजे, माझ्या तुर्तास या कवितासंग्रहामधील कविता आहे. दुष्काळाची परिस्थिती त्या गीतातून मांडण्यात आली आहे. हरिहरन यांनी हे गीत गायले असून, अशोक पत्की यांच्या धीरगंभीर संगीतामुळे हे गाणे अचूक भाष्य करते.

अशोक पत्की आणि अवधुत गुप्ते या संगीतकारद्वयींसोबत एकाच वेळी काम करतांनाचा अनुभव कसा होता?

अशोक पत्की यांचे संगीत हे मेलिडियस, गंभीर अशा प्रकारचे आहे तर अवधुतचा स्वभाव आणि संगीत हे खेळकर, खोडकर, यंग जनरेशनला भिडणारे आहे. त्यामुळे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींनी या दोघांना एकत्र आणले आहे. तुकारामांचे बालपण ते तरुणपणाच्या काळासाठी अवधुतचे संगीत आहे. कारण तुकाराम हे काही लहानपणापासून गंभीर स्वभावाचे नाहीत. ते देखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे खेळत होते. त्यानंतर तरुण तुकारामांनी वडिलांनंतर उद्योग सांभाळला.  इथपर्यंत अवधुतचे संगीत आहे. यानंतर येतात ते अशोक पत्की. त्यांच्या संगीताचा जो बाज आहे तो या चित्रपटाच्या प्रत्येक सिचूएशनला समरस होणारा आहे.

संत तुकाराम हे विद्रोही संत. त्या काळापेक्षा कितीतरी पुढच्या पिढीबद्दल त्यांनी भा्ष्य केले आहे. त्यांचा हा स्वभाव गीतातून व्यक्त होतो का?

भेदणारे मुळ, आशयाचे कूळ

भाषेचा कल्लोळ, तुकाराम.

या ज्या काही ओळी आहेत त्या तुकारामांचा स्वभाव व्यक्त करणा-याच आहेत. एका प्रतिकाच्या रुपाने त्यांच्यातील विद्रोहीपणही गीतातून डोकावते.

या चित्रपटातील तुमच्या आवडीचे गाणे कोणते?

गाणीतर तशी सगळीच आवडती असतात. मात्र, काहींबद्दल सॉफ्ट कॉर्नर हा नक्कीच असतो. तसा गन्या, मन्या, तुका या गीताबद्दल आहे. अवधुतने या गीताला चाल लावली आहे. तुकारामांच्या बालपणाच्या प्रसंगाबद्दल, त्या काळातील ११ खेळ या गाण्यातून मांडण्यात आले आहेत. खेड्यातील मुलं ही एखादा खेळ खेळायचाय म्हणून घराबाहेर पडत नाहीत तर, ती एक खेळ झाला की दुसरा, मग तिसरा. त्यानंतर थकले की, पोहायला जातील. मग सुरपारंब्या खेळतील, झाडांवरील मोहळ काढतील. अशी खेळांची साखळी या गाण्यात गुंफण्यात आली आहे. अवधुतचंही हे आवडतं गाणं आहे. त्याचबरोबर या गाण्यात कबीराचा दोहा देखील आहे.  मुलं खेळत असतात. तिथून एक फकीर जात असतो, तो हा दोहा म्हणत असतो. असा तो प्रसंग आहे.

तुम्हाला या चित्रपटातून तुकाराम कसे भेटतात?

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ

विचाराची कळ, तुकाराम

शब्दांचे इमान, अक्षरांचे रान

अभंगाचे पान, तुकाराम

भेदणारे मुळ, आशयाचे कुळ

भाषेचा कल्लोळ, तुकाराम

पुन्हा उगवतो, खोल पसरतो

सांगून उरतो, तुकाराम
साभार दिव्य मराठी वेबसाईट. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...