मुख्य सामग्रीवर वगळा

सुनीसुनी मुंबई, गहिवरलेले मराठीजन आणि आतून पुरता हललेलो मी!

मुंबई... अविरत धावणारे शहर... जिथे कुणालाच कुणासाठी वेळ नाही... कायम धावपळ... लोकलमधील गर्दी... माझ्या तीन साडेतीन वर्षांच्या मुंबईतील वास्तव्यात, विविध रंगाने- गंधाने भरलेली मुंबई कित्येकवेळेस पाहिली.  मात्र, शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरची मुंबई ही सुनीसुनी आणि दुःखाचे सावट पसरलेली होती. गेल्या रविवारी एकाही दुकानाचे शटर उघडे नव्हते. मोठ मोठ्या मॉलपासून चहाच्या आणि पानाच्या टप-यांनीही आपली दारं बंद करुन घेतलेली होती. अशी सन्नाट्याने भरलेली मुबंई या आधी कधीच पाहिली नाही आणि या पुढेही कधी पाहाता येईल, असे वाटत नाही.

गेल्या शनिवारी मी माझ्या एका परीक्षेनिमित्त मुंबईला गेलो होतो. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या तशा सोमवार पासून येत होत्या, त्यामुळे मातोश्रीवर असलेली गर्दी आणि तिथून सुरू असलेले मीडियाचे कव्हरेज याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून मी शनिवारी दुपारी कलानगरमधील म्हाडाच्या इमारतीत उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये जाऊन थांबलो. काही क्षणांतच खासदार संजय राऊत बाहेर आले आणि त्यांच्यासोबत इतरही काही लोक होते. गेल्या काही दिवसांपासून एकटे खासदार राऊतच बाळासाहेबांच्या तब्येतीची माहिती माध्यमांना देत होते, टीव्ही चॅनल्सवर मी हे पाहिले होते. त्या दिवशी 'राऊत आये... चूप बैठो...' असे अनेक माध्यमांचे प्रतिनिधी एकमेकांना ओरडून ओरडून सांगत होते. मात्र, कॅमेरामनला दिसत नसल्यामुळे त्यांचे ओरडणे काही थांबत नव्हते. त्याच आरडा-ओरडीत एक गृहस्थ पुढे आले आणि त्यांनी, बाळासाहेबांना वाचवण्यात आम्ही अपयशी ठरलो. आज दुपारी ३.३३ वाजता त्यांचे निधन झाले, असे जाहीर केले. त्यांच्या निवेदनानंतर कळले की, गेल्या चार वर्षांपासून बाळासाहेबांवर उपचार करणारे ते डॉ. जलील परकार होते. डॉ. परकार यांचे ते शब्द कानी पडताच, हजारो शिवसैनिक स्तब्ध झाले. डॉ. पारकर यांच्यानंतर माईकाचा ताबा खासदार राऊत यांनी घेतला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी संयम आणि शिस्त दाखवली पाहिजे, असे आवाहन केले. मात्र, तिथे उपस्थित शिवसैनिकांना आपल्या भावनांना आवरणे कठीण झाले होते. बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष त्यांनी सुरू केला. त्याच काहीशा घालमेलीच्या वातावरणात राऊतांनी सांगितले की, उद्या सकाळी (रविवार, १९ नोव्हेंबर) सात वाजल्यापासून शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

मी हे सगळे एकत असतानाच माझ्या कॅमेरात तेथील वातवरण कैद करत होतो. तेव्हा माझ्या मनातही धाकधूक होती की, अशावेळी आपण कॅमेराची क्लिक - क्लिक करावी का ? पण, माध्यमामध्ये काम करत असल्यामुळे थोडा निष्ठूर होतो, त्या भावनांनी भारलेल्या वातवरणात कॅमेराचे फ्लॅश उडाले. खासदार राऊत, डॉ. परकार, पोलिसांना आदेश देणारे विश्वास नांगरे-पाटील, बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलिस कर्मचारी आणि संबंध महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती पोहोचविणारे माध्यमांचे प्रतिनीधी यांना कॅमेरात बंद केले. लागलीच सोबत असलेल्या लॅपटॉपच्या माध्यमातून फोटो आणि माहिती ऑफिसला पाठवली.

त्यानंतर मातोश्रीच्या दिशेने शिवसैनिकांप्रमाणेच राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रांतील मंडळींची रीघ लागली होती. आता यापुढे कोणतीही महत्त्वाची घोषणा होणार नाही, असे कळल्यामुळे अनेक माध्यमकर्मींसोबत मी देखील म्हाडा ऑफिसच्या आवारातून बाहेर पडलो.  रस्त्यावर पोलिस, रॅपीड ऍक्शन फोर्सचे जवान आणि पांढ-या कपड्यातील, दाढी वाढवलेले लोक, कॉर्पोरेट लूक असलेले तरूण, वयोवृद्ध माणसे दिसत होती. यातील काहींच्या हातात भगवे झेंडे होते. स्त्रिया आणि तरुणीही त्या गर्दीत खिन्न चेह-याने उभ्या होत्या. सांजवेळ त्या वातावरणाला आणखीनच धीरगंभीर बनवत होती.

तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. ऑफिसमधून सरांचा फोन होता. पलिकडून आवाज आला, तुझी उद्याची परीक्षा बहुतेक रद्द झाली आहे. उद्या सकाळी लवकर मातोश्रीवर पोहोच आणि ज्या रथावरुन बाळासाहेबांना नेले जाणार आहे त्याचे फोटो लवकर पाठव.  हे सांगत असताना सरांनी कुठेही बाळासाहेबांचे पार्थिव, त्यांचे निधन, अंत्ययात्रा या शब्दांचा वापर केला नव्हता. बाळासाहेबांचे निधन हा शब्दही उच्चारणे मुंबईपासून कित्येक मैल दूर असलेल्या शहरांमध्ये जड जात होते, इथे त्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरील परिस्थिती कशी असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

रविवारी सकाळी आठ-साडे आठची वेळ. कुर्ल्याहून बेस्टने कलानगरकडे निघालो. बस फॅमिली कोर्टसमोरच थांबली. पुढे मुंबई आणि राज्यातून आलेल्या शिवसैनिकांच्या वाहनांची रांग लागली होती. प्रत्येक गाडीवर भगवा झेंडा लावलेला होता. मी थोडासा पुढे जात नाही तर दाटीवाटीने जमलेले स्त्री-पुरुष. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त. कलानगर समोर असलेल्या उड्डाणपुलावरुन मी फोटा घ्यायचे ठरवले होते. पण मला रस्ता ओलांडायलाही जिथे जागा नाही, तिथे मी पुलावर कसा जाणार, असा प्रश्न पडला. पोलिसांची आणि गर्दीची पर्वा न करता मी पुढे निघालो. अनेकांनी समजावले की, पुढे जागा नाही, दोरी बांधलेली आहे. मात्र, सांगणा-यांचे हे शब्द ऐकून न ऐकल्यासारखे करत मी पुढे जात होतो. समोरच इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी असलेली उघडी बस दिसली. तशीच एक बस प्रिंट मीडियासाठीही होती. मात्र, ती फार दूर असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मी़डियासाठी असलेल्या बसवर चढून फोटो घेता येतील या विचाराने बसजवळ पोहोचलो. बसच्या दारात उभ्या असलेल्या पोलिसांनी ही बस इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी असल्याचे सांगत मला बसमध्ये चढू दिलं नाही. मात्र, आता जर बसमध्ये चढलो नाही तर, आपल्याला काही फोटो काढता येणार नाहीत. कारण त्या गर्दीला पार करून पुलावर जाणं किंवा समोरच्या बसमध्ये चढणेही शक्यच नव्हते.  म्हणून बसवर कोणी ओळखीचे आहे का, ते शोधले तर, एक औरंगाबादचाच पत्रकार सापडला.  त्याच्याच सांगण्यावरुन नंतर पोलिसांनी मला बसवर चढू दिले. त्यानेही आपल्या शहराबद्दलची आपुलकी दाखवली. त्या मित्रामुळे मला मातोश्रीबाहेरचा जनसागर कॅमेरात कैद करता आला. सकाळचे नऊ वाजले असतील, अजून बाळासाहेबांच्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात झालेली नव्हती. बाळासाहेबांचा हात उंचावलेला फोटो आणि फुलांनी सजवलेला तो रथ सज्ज होता. तिथे रस्त्यावर चोहोबाजूंना बाळासाहेबांना एकदाच डोळेभरून पाहण्यासाठी लाखो नजरा आसुसलेल्या होत्या. क्षणाक्षणाला गर्दी वाढत होती. मी त्या गर्दीचे आणि रथाचे फोटो घेऊन पुढे निघालो. मिळालेले फोटो मला लागलीच मेलच्या माध्यमातून ऑफिसला पाठवायचे होते. कलानगर समोरील उड्डाणपूलवरुन पायी चालत दुस-या पुलावर जाऊन थांबलो. या पुलावर अंत्ययात्रा येईपर्यंत मला फोटो मेल करता येणार होते. आणखी फोटो काढण्यासाठी जागाही पकडून ठेवता येणार होती.

या पुलावर वृत्तवाहिनीत काम करत असलेला एक मित्र भेटला. आता पुढचा प्रवास त्याच्या गाडीतून करायचा, असे मनोमन मी ठरवून टाकले.  त्याआधी पुलाच्या कठड्याला लागून असलेल्या उतारावर जाऊन बसलो. तिथे माझ्याआधी बरेच लोक जमले होते. त्यात काही महिला, शिवसैनिक आणि फोटोग्राफरही होते. मला ज्या ठिकाणी बसायला जागा मिळाली तिथे बराच कचरा पडलेला होता. त्या कच-यातच पडलेले एक बॅनर जरा झटकून घेतले आणि त्यावर मी बसलो. माझ्या छोट्या कॅमेराने येथून फोटो चांगले मिळतील याची मला खात्री होती, त्यामुळे किमान २०-२५ मिनिटे मी तिथे अंत्ययात्रा येण्याची वाट पाहात होतो. कॅमेराचा एँगल सेट करुन ठेवला होता. अंत्ययात्रा जसजशी त्या पुलाजवळ येत होती, तसतशा घोषणांच्या आवाजाचा वाढत असल्याचे जाणवत होते

    बाळासाहेब अमर रहे... कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला...  या घोषणांनी वातावरण गलबलून गेले. तेवढ्यात चाफ्याच्या फुलांनी सजवलेला तो रथ समोर आला. रथाचे समोरचे एक - दोन फोटो काढल्यानंतर बाळासाहेबांचा चेहरा नजरेस पडला आणि मी त्या शांतचित्त शरीराकडे पाहातच राहिलो...  माझ्या बाजूला बसलेल्या महिला ओक्साबोक्सी रडू लागल्या... काही पुरुषांनाही अश्रू अनावर झाले. परत या, परत या, बाळासाहेब परत या... या घोषणेने मी भानावर आलो. चिरनिद्रेत असलेल्या बाळासाहेबांचे फोटो काढण्यासाठी माझा हात जेवढा पुढे जाईल, तेवढा पुढे करत कॅमेरा क्लिक केला. बाळासाहेबांच्या बाजूला त्या रथावर शोकाकूल उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी आणि त्यांची दोन्ही मुले दिसली. उद्धव दोन्ही हात जोडून लोकांच्या भावना मुकपणे समजून घेत असल्याचे जाणवले. बाळासाहेबांच्या जाण्याने केवळ त्यांच्या डोक्यावरचेच छत्र गेले नव्हते, तर महाराष्ट्रातील लाखो लोकांची आपल्या घरातील एखादी वडीलधारी व्यक्ती गेल्याची भावना होती.  इतका वेळ त्रयस्तपणे फोटो काढणारा आणि माहिती घेणारा मी समोरचे ते दृष्य पाहून आतून पुरता हललो होतो.
(छायाचित्र - मातोश्री बाहेरील गर्दी )

साभार - दिव्य मराठी वेबसाईट www.divyamarathi.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...