मुख्य सामग्रीवर वगळा

करार

२०१३ हे अजून एक नवे वर्ष सुरु झाले. कित्येकांनी अनेक संकल्प केले असतील. (त्याला काहीजण 'संकल्प सोडला' असेही म्हणतात! संकल्प सोडला म्हटल्यावर पुढे त्याचा पाठपुरावा करण्याची गरजच काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असो. ) कॉलेजात असताना अनेक वेळेस सकाळीच उठून व्यायाम करण्याचा संकल्प कित्येक वर्ष नित्यनियमाने केला होता, आणि नित्यनियमाने त्यात विसरही पडत आला आहे. आताही काही त्रास जाणवला की, व्यायाम करण्याचा संकल्प केला जातो आणि जेवढ्या तत्परतेने संकल्प केला जातो तेवढ्याच तत्परतेने तो विसरला देखील जातो. असे नव वर्षाच्या संकल्पांचे आणि माझे आतापर्यंतचे नाते राहीलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकल्प न करण्याचाच संकल्प केला आहे. मात्र, वरील सवयीप्रमाणे हा संकल्पही मोडीत निघतोच. असो. हे संकल्पाचे प्रवचन कितीही लांबवले तरी लांबतच राहील.

मी स्वतःला बौद्ध धम्माचा अनुयायी समजतो. तसा जन्मानेच बौद्ध असल्यामुळे त्यात मी काही समजण्याचा प्रश्न उरतच नाही. पण, मी बौद्ध आहे म्हणजे नेमका कोण आहे? भगवान बुद्धांचा जयघोष आणि बाबासाहेबांचा विजय असो किंवा उठता-बसता जयभीम. सालाबादाप्रमाणे येणारे १४ एप्रिल(डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), बुद्ध जयंती, नामांतर वर्धापन दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ६ डिसेंबर-बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण, एक जानेवारीला भीमा कोरेगावचा विजय दिन... असे अनेक दिवस मोठ्या थाटात साजरे करणे किंवा यानिमीत्त अभिवादन, श्रद्धांजली निमीत्त या महामानवांसमोर फुल-अगरबत्ती लावून त्यांच्यासमोर नतमस्तक होणे, म्हणजेच मी बौद्ध का ? आता यात महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहु महाराज, शिवाजी महाराज यांचाही समावेश करुन त्यांच्याही पुढे नतमस्तक होतो. कारण मी स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो. पण, मी बौद्ध आहे, आंबेडकरांचा अनुयायी आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवतो तर या सगळ्यांचा माझा काय अभ्यास आहे ? कुठल्याही चर्चेत बोलायला लागल्यावर मी छातीठोकपणे काही मुद्दे मांडेल. पण, त्यांचे विश्लेषण करायचे झाले तर मग उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यातही वेळ कशी मारून नेली याची फुशारकी असते. वास्तविक, त्या क्षणी वेळेने माझ्या कानखाली सनसनीत चपराक दिलेली असते, हे मी सोईस्करपणे विसरतो.

आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिशरण आणि पंचशील स्विकारुन करतो. पण, किती जणांना याचा अर्थ माहित असतो, हा खरा प्रश्न आहे. आता-आता तर असेही वाटायला लागले आहे की, अर्थ माहित असणे ही तर फार पुढची पायरी आहे, आम्हाला पूर्ण त्रिशरण-पंचशील तरी कुठे पाठ असते. जर, या प्राथमिक गोष्टीच मुखोदगद नसतील तर त्यांचा अर्थ आणि आचरण आमच्याकडून केव्हा घडेल. बाबासाहेबांनी हा धम्म जेव्हा आम्हाला दिला, तेव्हाच त्यांनी "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा सहज सोप्या भाषेतील ग्रंथ देखील आम्हाला दिला.  माझ्याही घरात हा ग्रंथ आहे. अनेकांच्या असेल. (कालच एक बौद्ध आणि आंबेडकरी साहित्याचे प्रकाशक आणि विक्रेते सांगत होते की, 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाची रंगीत छायाचित्र आणि काही नवीन मजकूर असलेले काही हजार ग्रंथ ६ डिसेंबरला मुंबईला विक्रीसाठी नेण्यापूर्वीच संपले.) पण, त्याचे वाचन - मनन अजून माझ्याकडून झालेले नाही. हा ग्रंथ वाचण्याचा संकल्पही मी अनेकदा केला. सुरुवातीची काही पाने वाचून हा संकल्पही पूर्णत्वास गेलेला नाही. मी स्वतःला आंबेडकरवादी तसेच आंबेडकर अनुयायी म्हणवून घेत असताना माझी जबाबदारी आहे की, मी बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा वाचली पाहिजे. धनंजय किर आणि खैरमोडे लिखीत त्यांच्या चरित्राची पारायणे नाही, पण किमान एक-दोनदा ते  वाचून झाले पाहिजे. मला माहित असलेले बाबासाहेब हे फक्त इतरांनी केलेल्या भाषणातील आणि गीतांमधील किंवा वृत्तपत्रातील संपादित लेखातील असतात. ही माझ्यासाठी शरमेची गोष्ट आहे. जर मी बाबासाहेब वाचलेच नसतील तर, मी स्वतःला त्यांचा अनुयायी तरी कसा म्हणवून घेऊ शकतो. बाबासाहेबांचे अभ्यासक जेव्हा त्यांच्या विविध पुस्तकातील दाखले देऊन काही सांगतात तेव्हा मला कोणी विचरले की, तु हे वाचले का,  तर आमचे उत्तर असते, बाबासाहेब आमच्या रक्तातच आहेत!  ते इतरांकडून समजून घेण्याची आणि वाचण्याची काय गरज.  यामुळे मी वेळ निभावून नेतो, मात्र माझ्यातील अज्ञान मात्र कायम राहाते.  ही बोचणी मला काही दिवसांपासून बोचत आहे. नववर्षाच्या निमीत्ताने आजपर्यंतची उजळणी केली तर या गोष्टी राहून गेल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. आता पुढच्या काही दिवसांत किंवा महिन्यात या महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्ण केल्याच पाहिजे. हा नववर्षाचा संकल्प नाही तर, स्वतःच स्वतःशी केलेला करार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...