मुख्य सामग्रीवर वगळा

हक्क कोणाचा... अन् भंग कोणाचा ?

२३ मार्च १९३१  रोजी भगतसिंग - राजगुरू - सुखदेव या तीन क्रांतिवीरांना इंग्रज सरकारने फाशी दिली होती. उद्या तो शहिद दिवस आहे. त्यांच्या सारखेच आता विधानसभेत बॉम्ब टाकावा असे वाटत आहे. त्यांनी जरी फक्त सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी धुरांचा बॉम्ब फेकला होता, तरी आता फेकला जाणारा बॉम्ब तिथल्या सर्व आमदारांना मुळापासून संपवणारा असावा असे वाटते. कोणत्याही मद्यावर या आमदारांची तोंडे पन्नास दिशांना असतात मात्र, पत्रकारांच्या हक्कभंगाविरोधात ते सर्व एकत्र येतात या पेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते काय ? एकाही आमदाराराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चाड असू नये. केवळ यांचेच जनतेने आणि पत्रकारांनी ऐकावे अशीच यांची अपेक्षा आहे का ?  त्यांच्या विरोधात काही बोलयचेच नाही का ? हे कुठले तुर्रमख्खा लागून गेले ?

महाराष्ट्र राज्याचे राजकारण एवढ्या रसातळाला गेले आहे की, ज्या वास्तूत बसून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जावे त्याच वास्तूत एका पोलिस अधिका-यावर हात उगारले गेले. तेही एक दोघांनी नाही तर, पाच-पंचविस आमदारांनी.  कोणी दुस-याने हे कृत्य केले असते तर, गोष्ट वेगळी होती मात्र, कायद्याचे राज्य आणू... सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही आशा आणा-भाखा घेतलेल्या आमदारांनी एका पोलिस अधिका-याला गल्लीतील गुंडाप्रमाणे लाथाडावे याला लोकशाही म्हणावे का ? असाच प्रश्न आता पडायला लागला आहे....

एकीकडे पोलिसाला सभागृहात मारहाण करायची आणि त्यांच्या या झुंडशाहीबद्ददल बोलले म्हणून राज्यातील दोन पत्रकारांविरोधात हक्कभंगाचा ठराव आणयाचा... हे तर अतिच झाले... मी निझामाची रझाकारी पाहिली नाही. इंग्रजांचे अत्याचार पाहिले नाही. मोगलाईशी तर संबंधच नाही... मात्र, हे सर्व राज्यकर्ते जे करत होते, तेच आजचेही करतात यात आता मला शंका वाटत नाही.  

सुचिन सूर्यवंशी या वाहतूक सहायक पोलिस निरीक्षकाने वांद्रे वरळी सी लिंकवर आमदाराची गाडी अडवली म्हणून त्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव. एक साधा पोलिस निरीक्षक, तोही वाहतूक शाखेचा, त्याच्या विरोधात हक्कभंग आणण्याची आमदराला बुद्धीच कशी होते. काय मोठा गुन्हा त्याचा. तर त्याने बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर दोन कलमा लावल्या. यावेळी ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक झाली, कोणी कोणाल्या शिव्या दिल्या हे दोघानाच माहित. मात्र, विधिमंडळाच्या वास्तूत पोलिसाला मारणे याचे समर्थनच होऊ शकत नाही.  आमदार महोदय त्या शिपूर्ड्या (खासगीत ते पोलिसांना असेच बोलतात आणि उघड उघड मारतात देखील.) विरोधात त्याच्या वरिष्ठांकडे जाऊ शकले असते, त्याला निलंबीत केले जाऊ शकत होते. कायद्याची अनेक कवाडे उघडी असताना त्याला मारणे हाच जर या आमदारांपूढे पर्याय होता तर, मग लोकशाहीची चाड असलेल्यांनी त्यांच्या विरोधात बोलायचे नाही तर, काय त्यांच्या दारातील मांजर होऊन राहयचे.

बरं ज्या, एका आमदाराची गाडी अडवली त्याने हक्कभंग आणला, तर समजू शकले असते. पण, त्याला अनेक आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यासोबतच मारहाण करण्यासाठी राम कदम म्हणाले तसे, चाळीस - पन्नास आमदार होते. फक्त ज्यांचे चेहरे ओळखीचे आहेत त्यांचीच नावे समोर आली. असे जर असेल तर या लोकांना कायदे करण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल माझ्या मनात उपस्थित होतो. केवल ९ महिन्यांच्या निलंबना ऐवजी यांचे सदस्यत्व कायमचे रद्द करून यांना निवडणूकाल उभे राहाण्यापासूनही रोखले पाहिजे अशी शिक्षा द्यायला हवी होती. आता न्यायालयाने सोमवार २५ मार्चपर्यंत आमदार क्षितीज ठाकूर आणि आमदार राम कदम यांना कोठडी सुनावली आहे.  कदाचित सोमवारी त्यांना जामीनावर सोडण्यात येईलही. पण, त्यांचा गुन्हा केवळ ९ महिन्यांच्या निलंबना एवढा छोटा नक्कीच नाही. लिखाणाची पुनरुक्ती होईल पण लिहिल्याशिवाय राहवत नाही की, आमदारांनी हात उगारणे कधीही मान्य होऊ शकत नाही. लोकशाहीची अनेक अस्त्रे त्यांच्याकडे होती, त्याअंतर्गत ते सूर्यवंशीना 'सरळ' करू शकले असते. असे असताना त्यांनी हात उगारून आपल्यातले पशुत्व सिद्ध करून दाखवले. त्यानंतर या सर्व घटनेबद्दल थोडे कठोर होत बोलले म्हणून आयबीएन लोकमतचे संपादक निखील वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव आणला. आता या नादानीला काय म्हणावे. हा केवळ या दोघांवरचा आमदरांचा रोष मला वाटत नाही.तर, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि पत्रकारांची मस्कटदाबी आहे. आमच्या विरोधात बोलणा-या प्रत्येकाचा आवाज आम्हाला दाबता येतो, ही मग्रुरी दाखवण्याची ही खुम-खुमी आहे. यानंतर अनेक पक्षांचे नेते सांगायला लागले की, हे चुकीचे झाले. आहो पण, हे करणारे दुसरे - तिसरे कोणी नव्हते, तर तुमच्या पक्षांचेही आमदार त्यात सामिल होते. चुकीचे झाले हे त्यांना सांगा ! आणि खरचं तुम्हाला वाटते ना हे चुकीचे झाले तर, पक्ष शिस्तीनुसार जी कारवाई होत असेल ती कारवाई करा. नुसत्याच तोंडाच्या वाफा दवडून काही होणार नाही. 

या पत्रकारांची टिळकांशी तुलना करायची नाही पण, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल टीळकांनी केल्यानंतर त्यांना मंडालेच्या तुरूंगात डांबले होते. आताचे काळे इंग्रेज पत्रकारांना काळकोठडीत डांबू शकत नाही, म्हणून किमान त्यांच्या विरोधात हक्कभंग तरी आणा.  हा दुधाची तहान ताकावर भागून खूष होण्याचा प्रकार राज्यकर्त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे सर्व प्रकार घडत आहे. काय वाटत असले त्यांच्या स्मृतींना?

पुढील वर्षी निवडणूक आहे. तेव्हा हेच मारहाण करणारे आमच्या दारात येऊन आम्हाला मतदान करा म्हणाणार आहेत. तेव्हा यांना मतदान करायचे नाही असे मी लाख ठरवले तरी, ज्या दुस-याला मी निवडणार आहे, तो याचा ही बापच असतो... त्याच्यावही दोन गुन्हे जास्त असतात, एखादा तिसरा पहावा म्हटलं तरी, चित्र फार वेगळे नसते. तेव्हा निवडणूकीवर अबोल बहिष्कार टाकण्याशिवाय माझ्यासारख्याकडे पर्याय नसतो...  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...