मुख्य सामग्रीवर वगळा

भूमिका


नवीन वर्ष आले की, नित्य नियमाने मी व्यायाम करण्याचा संकल्प करतो. त्याला निसर्गही तेवढीच साथ देतो. जानेवारीमध्ये बोचर्‍या थंडीचे दिवस असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये हा संकल्प प्रत्यक्षात उतरवणे अंगी लागते. मात्र, पंधरा-वीस दिवसांनी संक्रांत येते आणि हिवाळा कमी-कमी होऊ लागतो तसा माझा उत्साह देखील मावळतो. संकल्पावरच संक्रांत येते. मग व्यायामाचा संकल्प केला होता हे देखील विसरायला होते. असो. हा झाला १ जानेवारी २०१५ पर्यंतचा इतिहास. यावर्षी संकल्प म्हणून नाही तर, मी स्वतःसाठी काही लिहू इच्छित आहे. माध्यमाच्या जगात काम करत असताना आपला स्वतःचा काही दृष्टीकोण असला पाहिजे. स्वतःचे असे काही मत असले पाहिजे. स्वतःची काही भूमिका असली पाहिजे, असे अनेक दिवसांपासून मनात घोळत होते.  रस्त्याने चालताना अनेक गोष्टी दिसतात त्या बातमीत मांडणे शक्य होत नाही.  नवीन वर्षाच्या निमीत्ताने मनातील या विचारांना मुर्तरुप देण्याचे निश्चित केले आहे.

मित्रांसोबतच्या चर्चेत, फेसबुक - ट्विटर या सोशल साइट्सवर आणि ब्लॉगवरही मी माझी काही मते मांडत असतो. पण, त्यात एकसंधपणा नसतो. एकसुत्रता नसते. त्यामुळे चर्चेच्या ओघात बोलल्यासारखे ते सगळे असते आणि गाडी आल्यामुळे धुराळा उडावा आणि गाडी नजरेआड होईपर्यंत धुराळा खाली बसावा तसा तो प्रकार झालेला असतो. आता असे न होऊ देता दर आठवड्याला एका विषयावर लिहून त्याबद्दलचे स्वतःचे मत मांडायचे आहे. प्रत्येक आठवड्यात या चाकोरीतच लिखाण होईल असे काही माझे स्वतःवर बंधन नाही. मी वारंवार माझे मत - माझे मत म्हणत आहे, त्याचा अर्थ मी फार काही वेगळे मांडणार आहे, किंवा मी एखाद्या मुद्यावर अडून बसणार आहे असेही नाही. माझा प्रयत्न फक्त मी पाहिलेले, अनुभवलेले आणि माझ्या समजुतीप्रमाणे जोखलेले जग मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावर तुम्हा सर्व मित्रांचे मार्गदर्शन आणि सल्ला अभिप्रेत आहेच.

आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती, या दिवशी मी नव्या लिखाणाला प्रारंभ करीत आहे. हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले या महत्मा फुल्यांच्या पत्नी असल्या तरी स्वतंत्र बाण्याच्या आणि स्वंतत्र व्यक्तीमत्व असलेली देशातील पहिली शिक्षीका होती. त्या माऊलीने कष्ट सोसले नसते तर, या देशातील महिलांना आणखी किती दिवस अज्ञानाच्या आणि रुढीवादाच्या अंधकारात चाचपडत राहावे लागले असेत हे सांगता येणे कठीण आहे. पंरपरा, दैववाद, चालीरीती, रुढी यातून आज महिला पूर्ण मुक्त झाल्यात असा दावा करणे फोल आहे. पण, तरीही शाळेतील शिक्षीकेपासून, कार्यालयात अधिकारी, आमदार-खासदार लोकसभाध्यक्षा- राष्ट्रपतीपदापर्यंत या देशाची महिला गेली आहे. त्याची बीजे ही सावित्रीबाईंच्या कार्यात दडलेले आहेत.

सावित्रीबाईंना शाळेत जाण्यापासून परावृत्त करण्यास जेव्हा कर्मठांना जमले नाही तेव्हा त्यांनी अफवा पसरवली होती, की त्यांच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या महिलांनी गिरवलेल्या अक्षरांच्या अळया होतील आणि त्या त्यांच्या पतीच्या ताटात पडतील. अशा प्रकारचा विरोध पत्करुन सावित्रीबाई स्त्री शिक्षण, अस्पृष्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध यासाठी झटत राहील्या. केवळ पतीच्या कार्यात हातभार एवढेच त्यांचे कर्तृत्व नव्हते तर, सावित्रीबाई स्वंतत्र प्रज्ञेच्या होत्या. त्यांनी अनेक कविता लिहिल्या. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा खांद्यावर घेतली आणि यशस्वी पुढे चालवली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले जीवन दुसर्‍यांसाठी त्यांनी समर्पीत केले. पुण्यात प्लेगची साथ आली असताना, त्या रुग्णांची सुश्रुषा करत होत्या. एका महाराच्या मुलाला प्लेग झाला. त्याला त्यांनी दवाखाण्यात पोहोचवले. त्याच प्लेगचा त्यांना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.  अशा या क्रांतिज्योती सावित्रीमाईला त्रिवार वंदन करुन दर आठवड्याला येथे भेटण्याचे अभिवचन देऊन आज येथे थांबतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...