मुख्य सामग्रीवर वगळा

लोकशाही जिंकली आणि मोदी हारले

देशात लोकशाही आहे हे आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या माध्यमातून सिद्ध झाले आले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देशाचे भाषणबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षाच्या सदस्यांना अनेक टोमणे मारले आणि तुम्हाला 'ऐकावेच लागेल' हे एक नव्हे तर तीन वेळा म्हटले. तेव्हा त्यांचा बोलण्याचा टोन हा स्वतःच्या नावाचा सुट घालणार्‍या एका देशाच्या राजासारखा होता. त्यामुळेच विरोधीपक्षातील सदस्य नाराज झाले आणि त्यांनी सरकारला जमीनीवर आणले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी यांनी काळ्या धनावर सरकार अपयशी झाल्याचे राष्ट्रपतींच्या भाषणात संशोधन करावे हा प्रस्ताव आणला होता. पंतप्रधानांच्या भाषणानंतर तो मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यावर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना परत-परत विचारले, तुम्हाला प्रस्ताव मतविभाजनासाठी ठेवायचा आहे??? त्यावर येचूरी यांनी होय असे सांगितले आणि सरकारचा राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर 118 विरुद्ध 57 असा लाजीरवाणा पराभव झाला. वास्तविक वरिष्ठ सभागृहात सरकारचे 72 सदस्य आहेत. मात्र गुड गव्हर्नंन्सचा दावा करणार्‍या मोदींचे 15 खासदार कुठे गेले होते याचा त्यांनी शोध घेतला पाहिजे.

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात विरोधकांना शालजोडे दिले होते. त्याचा परतावा विरोधकांनी  राष्ट्रपतींच्या अभिभाषणात संशोधन करुन तत्काळ केला. राज्यसभेची परंपरा राहिली आहे की, पंतप्रधान किंवा सभागृह नेत्याच्या भाषणानंतर त्यावर विरोधक प्रश्न विचारू शकतात. मात्र, एककलमी कार्यक्रम राबवणारे मोदी आपले भपकेबाज भाषण ठोकून तत्काळ सभागृहातून बाहेर पडले. मी बोलल्यानंतर बाकीचे कोणी बोलायची गरजच नाही असाच काहीसा त्यांचा समज असावा. पण आपण हुकूमशाही नाही तर लोकशाही देशात राहातो आणि लोकशाही राष्ट्राचे पंतप्रधान आहोत याचा त्यांना कदाचित भाषणानंतर विसर पडला असावा.  परंतू त्यांच्या मंत्रिमंडळातील फ्लोअर मॅनेजमेंट करणारे व्यंकय्या नायडू यांना हे चांगले ज्ञात होते की येथे आपण कमजोर आहोत. त्यामुळे काँग्रेस सदस्य गुलामनबी आझाद यांच्याजवळ जाऊन त्यांनी मतविभाजनाची गरज नसल्याचे सांगितल्याचे सर्वांनी पाहिले. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांची तेव्हा धावपळ झाली, पण पंतप्रधान कुठे गेले होते हे काही कळले नाही.

पंतप्रधान जर स्वतःच्या भाषणानंतर सभागृहात थांबले असते आणि त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांचा सामना केला असता तर लोकसभेत बहुमतात असलेल्या सरकारवर आज ही नामुष्की आली नसती. गुजरात विधानसभेत मोदी दिसतच नव्हते हे ऐकून होतो, मात्र आज त्याची प्रचिती आली आहे. यामुळे एक बरे झाले लोकशाहीत तुम्हाला विरोधकांच्या मतालाही किंमत दिली पाहिजे हे अधोरेखीत झाले. केवळ भाषणातूनच आम्ही सर्वांच्या मतांचा आदर करतो हे बोलून चालत नाही तर तसे वागावे देखील लागते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...