मुख्य सामग्रीवर वगळा

मोदी अजून हरले नाही

बिहार ही देशासाठी 2014 च्या लोकसभेनंतरची सर्वात मोठी निवडणूक होती. मोदींच्या पंतप्रधानपदाला विरोध करणारे नितीशकुमार येथे लढणार होते. मागील विधानसभेत सुपडा साफ झालेल्या लालू प्रसाद यादवांच्या अस्तित्वाची ही लढाई होती तर काँग्रेसला अजून आपण जिंवत आहोत हे दाखवायेचे होते. (काँग्रेसबद्दल बोललो नसतो तरी हे वाक्य पूर्ण झाले असते.)  हे झाले मोदी आणि भाजप विरोधकांचे. पण गेल्या 18 महिन्यात आपण काय दिवे लावेल, हे सांगत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद पणाला लावायला लावणारी ही निवडणूक होती. निवडणूक व्यवस्थापनाचे चाणक्य ज्यांना भाजपने म्हणण्यास सुरुवात केली होती, आणि त्यांच्या सूरात सूर मिसळत भारतीय माध्यमांनीही तशीच री ओढली होती, त्या दाढीवाल्या चाणक्याची बिहारच्या जनतेने बिनपाण्याची केली. या निकालानंतर मला एकदा तरी बिहार पाहून यावा असे मनोमन वाटत आहे.

पाच टप्प्यात बिहारची निवडणूक झाली आणि प्रत्येक टप्प्यात निवडणूक प्रचाराचा मुद्दा बदलेला होता. महाराष्ट्रात जसे विदर्भात गेले की कास्तकरी, शेतकरी आत्महत्या. पश्चिम महाराष्ट्रात उसाला भाव, साखर कारखाने, उद्योग, सहकार. कोकणात रेल्वे, आंबा-काजू निर्यात, प्रक्रिया उद्योग. नाशिक खानदेशात जाऊन द्राक्ष शेती, कांद्याला भाव, केळी-साठवणूक प्रक्रिया उद्योग. आणि मराठवाड्यात प्रचाराचा जोर  किती दिवस हा भाग दुष्काळग्रस्त ठेवायचा, युवकांसाठी रोजगार, सिंचनाला पाणी असे विविध मुद्दे प्रचारात प्रामुख्याने असतात. तसे काही बिहारच्या निवडणुकीत झाले नाही. देशात जे-जे घडत होते ते-ते दुसऱ्या दिवशी बिहारच्या प्रचारसभांमधून गाजत होते. त्यातही भाजपच्या प्रचारसभांना प्रत्येक माध्यमात ठळक प्रसिद्धी मिळताना दिसत होती. किते केले तरी प्रचाराचे सर्व साधनसामुग्री या पक्षाकडे जास्त होती.

सोशल मीडियापासून टीव्ही-रेडिओ-वृत्तपत्र सर्वकाही यांच्या ताब्यात. त्यामुळे हे होणारच. त्या तुलनेत नितीशकुमारांच्या (खरं पाहिले तर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव आहेत) जनता दल संयुक्त-जेडीयू आणि राष्ट्रीय जनता दलाचे-आरजेडी सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याकडे प्रचाराची साधने कमी होती. असे म्हटले जाते की 243 मतदारसंघात फिरण्यासाठी भाजपकडे दोन डझन हेलिकॉप्टर्स होते. तर लालू यादव यांच्याकडे एकच हेलिकॉप्टर होते. यावरुनच प्रचाराच्या साधनसामुग्रीचा अंदाज येईल. (मी भरकटत चाललो, हे आता पर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल. कारण शेवटची ओळ टाइप करताना आमच्या 'मॅडम'चा फोन आला होता आणि त्यांचा नेहमीचा प्रश्न - कधी येता. मलाही ऑफिस संपता-संपता लिहण्याची हुक्की येते आणि त्यांच्या फोनने माझी लिहिण्याची तंद्री तुटते हे नेहमीचे आहे. असो.)
तर मला सांगायचे हे होते की, बिहारमधील निवडणुकीत चार प्रबळ पक्षांमध्ये लढत झाली आणि त्यात जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महागठबंधनचा विजय झाला. हा विजय माध्यमांच्या चर्चेचा विषय झालेला नाही तर इंग्रजी दैनिक-टीव्ही चॅनल्स (हिंदी-इंग्रजी-मराठी) आणि सर्वच वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या पराभवाचेच विश्लेषण होत आहे. कोणीच फारसे या तिन्ही पक्षांचा विजय कसा झाला याबद्दल बोलताना दिसत नाही. हाही एकप्रकारे मोदी मॅनियाचा विजय आहे. पराभवानंतरही लोक मोदी-शहांबद्दलच बोलत आहेत. एकप्रकारे माध्यमतज्ज्ञांना हा धक्का तर नाही ना, असा प्रश्न मला पडला आहे. कारण सर्वच लोक  भाजपच्या पराभवावरच बोलत आहेत. कोणीच नितीशकुमार विजयी कसे झाले. त्यांच्या जागा 115 वरुन कमी होऊन 71 कशा झाल्या. लालूंनी 22 वरुन 80 वर मारलेली हनुमान उडी आणि जो पक्ष मृतावस्थेकडे जात आहे असे सोकॉल्ड विश्लेषक म्हणत होते, त्या काँग्रेसला 4 वरुन 27 वर कसे जाता आले ? याबद्दल कोणीच का बोलत नाही. येथे मला अजून मोदी हरले असे वाटत नाही.

भलेही लोकांनी मुरलीमनोहर-लालकृष्ण-अटलबिहारी वाजपेयी यांचा संयुक्त हसरा फोटो वारंवार शेअर केला असेल किंवा गायीने मी दुध-दही देते मत देत नाही म्हणत मोदी-शहांना उडवून लावल्याचे कार्टून्स शेअर केले असले, तरी फार कमी लोकांनी लिहिले आहे की 'जब तक रहे गा समोसे में आलू,  बिहार में रहेगा लालू' असे विश्लेषण केले आहे. महाराष्ट्रात जसे आज राज ठाकरेंना लोक सिर्यसली घेत नाही, तसे ज्या दिवशी मोदी-शहांच्या पराभवाची कारणमीमांसाही करावी वाटणार नाही, त्या दिवशी खऱ्या अर्थाने मोदींचा पराभव झालेला असेल. त्यामुळे दिल्ली गेले, बिहार गमावले म्हणून कोणी हुरुळून जाऊ नये. मोदींचा प्रभाव अजून येथील माध्यमांवर शाबूत आहे. टीव्ही चॅनल्स दिवसदिवसभर त्या बिचाऱ्या शत्रुघ्न सिन्हांचे सोमवारचे फुटेज 24 तासानंतरही दाखवत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न विचारत आहेत. याचाच अर्थ माध्यमांना वाटत आहे की सिन्हांनी काही तरी चूक केले आहे, त्यांच्या पक्षाला काय वाटते हे जाणून घेण्यात माध्यमांना काहीही स्वारस्य नाही.

दुसरीकडे, बिहारमध्ये विकासकुमारांना स्ट्रॅटिजिक मदत करणारा प्रशांत किशोर- याने याआधी मोदींना कशी साथ दिली होती, याच्याच सुरस कथा रंगवल्या जात आहेत. आणि आता तो पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना साथ देणार असल्याच्याही बातम्या दिल्या जात आहे. यातून भाजपला सावधान व्हा ! असाच अप्रत्यक्ष सल्ला माध्यमे देत आहे. मीडियाने काँग्रेसच्या पराभवानंतर असे कधी केल्याचे दिसले नाही. त्यामुळे जोपर्यंत मोदी मॅनिया संपत नाही तोपर्यंत मोदींचा पराभव झाला असे म्हणणे म्हणजे आपणच आपल्याला शाबसकी देण्यासारखे आहे. हा फक्त वटवृक्षावर झालेला आघात आहे. एकदोन फांद्या तेवढ्या तुटल्या आहेत. बाकी फारकाही नुकसान झालेले नाही. त्यामुळे जास्त आनंद साजरा करण्याला अर्थ नाही. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...