मुख्य सामग्रीवर वगळा

मंगल प्रभात लोढा यांनाच फाळणीच्या प्रतीकाची एवढी शीरशीरी का यावी ?


अण्णाभाऊ साठेंनी मुंबईचे यथार्थ वर्णन त्यांच्या 'मुंबईची लावणी'मध्ये केले आहे. पहिल्या दोन ओळीतच त्यांनी मलबार हिलचा उल्लेख केला, तो असा...
'मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।'

अशा कुबेरांच्या वस्तीचे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे मंगल प्रभात लोढा. त्यांनी याच मलबार हिलमधील जीना हाऊस जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची त्यांनी केलेली मागणी कोणत्याही व्यक्तीला रास्तच वाटू शकते. त्यातही सध्याच्या 'देशद्रोही' आणि 'देशभक्त' या व्याख्येत त्यांची मागणी सहाजिकच देशप्रेमाचे भरते आणणारीच आहे.  त्यांच्या या मागणीने काही प्रश्नही निर्माण झाले आहे.

मंगल प्रभात लोढा यांनाच फाळणीच्या प्रतीकाची एवढी शीरशीरी का यावी ? 

- 'जीना हाऊस' ज्या भागात आहे तो मलबार हिल परिसर लोढांचा विधानसभा मतदारसंघ आहे. 1995 मध्ये ते येथून प्रथम आमदार झाले.
- मुख्यमंत्र्यांचा बंगला 'वर्षा' देखील मलबार हिलमध्ये आहे. 'वर्षा' समोरच अडीच एकरातील परिसरात 'जीना हाऊस' आहे.

- लोढा कोण आहेत ? 
मुंबईच्या कोणत्याही रस्त्यावरुन गेल्यानंतर लोढा डेव्हलपर्सच्या लक्झरीयस फ्लॅट्सच्या  जाहिराती तुमच्या नजरेस पडतील. जेवढ्या आकर्षक जाहिराती आहेत तेवढेच डोळे दिपवणारे त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत. अर्थातच मलबार हिल, कफ परेड येथीलच नाही तर परळमधीलही त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये महाराष्ट्रीयन (मराठी) व्यक्तीला प्रवेश मिळाला असेल याची खात्री देता येत नाही.
असे फुलटाईम बिल्डर आणि पार्ट-टाईम राजकारणी असलेले लोढा 1981 मध्ये राजस्थानातून मुंबईत आले.
त्यांची मुंबईत येण्याची कहाणीही फिल्मी आहे. राजस्थानातील मारवाड मधील भिनमल येथे जन्मलेले आणि वाढलेले लोढा यांचे वडील गुमन मल लोढा हे स्वातंत्र्यसैनिक आणि गुवाहाटी हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते. बी.कॉम एलएलबी झालेल्या मंगल प्रभात लोढांची जोधपूर हायकोर्टात प्रॅक्टिस सुरु होती. त्याचवेळी त्यांच्या वडिलांची बदली जोधपूरला झाली. जेथे वडील जज्ज आहे तेथे मुलाने वकिली करु नये असा नैतिकतेचा मुद्दा पुढे करुन मंगल प्रभात यांनी 1981 मध्ये मुंबईचा रस्ता धरला आणि अवघ्या 14 वर्षांत (1995) मुंबईतील इंद्रपूरी अर्थात मलबारहिलचे ते आमदार झाले.
- बिल्डर मानसिकतेच्या लोढांच्या डोळ्यात जीना हाऊस किती वर्षांपासून असेल याचा नेम नाही, मात्र संधी मिळाली ही भाजपचे सरकार आल्यावर. मग ही संधी सोडेल तो बिल्डर कसला?

आता काही सामान्य प्रश्न 

- इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले मात्र त्यांनी उभारलेल्या वास्तू आजही आपण 'हेरिटेज'च्या नावाखाली जपत आहोत. तेथे  'जीना हाऊस'च लोढांच्या डोळ्यात का खुपत आहे?
- जीना हाऊस गुलामी आणि फाळणीचे प्रतीक असल्याचे लोढा म्हणाले आहेत.
- दशकभरापासून लोढा आमदार आहे, आताच त्यांना जीना हाऊसची शीरशीरी का आली ?


जीना हाऊसबद्दल 
- पाकिस्तानचे निर्माते आणि भारताच्या फाळणीचे खलनायक ज्यांना म्हटले जाते त्या जीनांनी इंग्लंडहून भारतात परतल्यानंतर 1936 मध्ये मुंबईतील मलबार हिल येथे 2 लाख रुपये खर्चून जो बंगला बांधला तो जीना हाऊस. येथेचे त्यांनी मुस्लीम लीगचा चार्ज घेतला.
- अडीच एकरावरील हा बंगला युरोपियन स्थापत्यशैलीचा नमुना आहे. सी-फेसींग असलेल्या या बंगल्याच्या बांधकावर जीनांनी यांनी स्वतः लक्ष दिले होते. येथे इटालियन मार्बल आणि वॉलन्ट वूडचा वापर करण्यात आला आहे. ते खास इटलितून मागवण्यात आले होते.
- लोढा ज्या जीना हाऊसला फाळणीचे प्रतीक म्हणतात तेथे जीना आणि महात्मा गांधी व पंडित नेहरुच्या अनेक चर्चा झाल्या आहेत. या चर्चांचा साक्षीदार हा बंगला आहे.
- सध्या यावर भारत सरकारची मालकी असली तरी जीना यांची मुलगी दिना वाडिया यांनी  यावर वारसाहक्काने दावा केला आहे. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. योगायोग पाहा, दीना वाडिया यांचा जन्म 1919च्या ऑगस्ट 15 ला झाला होता.
- फाळणीनंतर जीना 1947 ला कराचीला गेले, मात्र मुंबईतील बंगला हा त्यांच्या अतिशय जवळ होता. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंना विनंती केली की हा बंगला परदेशी व्यक्तींना त्यातही यूरोपियन अधिकाऱ्यांना द्याव. त्यांना याची शैली आवडेल असा त्यांचा कयास होता. जीनांची ही विनंती नेहरुंनीही मान्य केली होती.
- अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी मुंबई भेटीत हा बंगला पाकिस्तानी अँबसिला देण्याची मागणी केली होती, मात्र ही चर्चा चर्चाच राहिली.
- ताज्या माहितीनुसार, या प्रॉपर्टीचा वाद न्यायालयात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...