मुख्य सामग्रीवर वगळा

स्वाईन महाराष्ट्र

किती गेले...
आज किती...
पुण्याचे किती गेले... ससुन मधलाच पेशंट होता का ?
या सारख्या प्रश्नांच्या सरबत्तीने सध्या प्रत्येकाच्या ऑफिसचा रोजचा दिवस सुरु होत आहे.
न्यूज चॅनल्सवरतीतर मतदानाची आकडेवारी दाखवावी तशी मृतांची आकडेवारी दाखवत आहेत. वृत्तपत्रांचीही स्थिती वेगळी नाही.
एव्हाना आता तुम्हाला कळलेच असेल की कोणत्या रोगाबद्दल मी बोलत आहे.
स्वाईन फ्लू... H1N1 विषाणू असलेला हा स्वाईन फ्लू आता महाराष्ट्रात आणि खास करुन पुण्यात चांगलाच घुसला आहे, नव्हे धुमाकूळ घालत आहे. या रोगाच्या भयंकर व्याप्तीमुळे पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीची नकोशी आठवण पुन्हा जागी झाली आहे.
हा ब्लॉग लिहण्यास सुरवात केली तेव्हा पुण्यातला 12 वा स्वाईन बळी गेला होता.
रिदा शेखच्या मृत्यूने सुरु झालेली ही मालिका थांबयचे नाव घेत नाहीए. पहिला मृत्यू रिदाचा झाल्यामुळे तिचे नाव लक्षात राहिले आहे, आता तर देशभरात 20 पर्यंत मृतांचा आकडा पोहचलाय त्यामुळे बालक, शाळकरी मुले, मध्यमवयीन स्त्री, पुरुष, पुण्यातील , राज्यातील आणि देशातील अशी मृतांची विभागणी केली जात आहे.
स्वाईन फ्ल्यू या रोगाने महाराष्ट्रात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झालयं एवढं नक्की. शासकीय रुग्णालयांमध्येच या रोगाचे निदान होत असल्यामुळे त्यांच्यावर ताण आलाय, तर ज्यांनी कधीच या रुग्णालयांचे तोंड पाहिले नाही त्यांना तेथे उपचारासाठी, इथून तिथे... तिथून इथे , या सरकारी खाक्याच्या खेट्या घालाव्या लागत आहेत. सुरवातीला या रोगाचे गांभीर्य लक्षात नघेतलेल्या राज्य शासनाचे "रिदा" या शाळकरी मुलीच्या मृत्यूने खाडकन् डोळे उघडले आहेत. स्वाईन फ्ल्यूच्या या पहिल्या कोवळ्या बळी नंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि रुग्णांची तपासणी आणि उपचार यात युध्द पातळीवर यंत्रणा कार्यरत झाली. मात्र याने गेलेला जीव परत येणार नव्हता. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आकलेचे तारे तोडत काही विधाने केल्यामुळे वातावरणात अजूनच विषाणू पसरले आणि वातावरण गढूळ बनले.
राज्य शासन अपयशी ठरत असतांना त्यांच्यावर टिका करण्याची नामी संधी सोडून देईल तो विरोधी पक्ष कसला. शिवसेनेच्या कार्य-अध्यक्षांनी आपले वाक्-बाण शासन यंत्रणेवर सोडायला सुरवात केलीच. 'मॅक्सिकन पॅटर्न' राबवा. हे मुख्यमंत्रीच अपशकूनी आहेत. अशी मल्लीनाथी त्यांनी सुरु केली. मात्र त्यांच्याच ताब्यात असलेल्या मुंबै महापालिकेत त्यांच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला आयुक्तांनी 'फाटक' दाखवलं आणि जनतेचा कौल मागितला. तर इकडे दुस-या साहेबांनी सरळ शाळेत जाऊन शाळा , सिनेमागृहच बंद करण्यास सुरवात केली. अर्थात मॅक्सिकन पॅटर्न राबवला, एकूण काय तर 'यांच्या' निर्णयावर 'त्यांनी' कुरघोडी केली. असो, कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाहीत ते राजकारणी कसले.
आता गोपाळकाला उद्यावर येवून ठेपलाय तर, महाराष्ट्राचं लाडकं दैवत गणपतीचीही चाहूल लागली आहे. अशातच संसर्गजन्य स्वाईन फ्ल्यूने महाराष्ट्राला विळखा घातल्याने राज्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्यानांही हे सण कसे साजरे करायचे असा प्रश्न पडला आहे. एकूण काय तर आपण सगळे नाक मुठीत घेवून जगत आहोत.

जाता जाता...

आत्ताच बातमी आली आहे... एक्यात सामील न होणा-या नेत्यांच्या सभा उधळा - रामदास आठवले.
सत्ते पासून दूर गेलेल्या आठवलेंना एक्याच्या बळावर तरी आगामी विधानसभेत (मानाचे नसलेतरी) स्थान मिळेल, याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांचा एक्याचा आटापिटा चालू दिसतोय. पण प्रकाश आंबेडकरांनी ऐक्यात सामील न होण्याचा घेतलेला निर्णय, आठवलेंच्या विधानसभेतील 'स्थाना'ला खो घालत आहे. असा त्यांचा कयास असावा म्हणूनच लोकशाहीवादी - फुले, आंबेडकर विचारधारा मानणा-या पक्षाचा नेता, हाणा मारा ची भाषा आपल्याच बांधवांविरोधात करत आहे. असं 'हाणून मारुन' खरचं ऐक्य होणार आहे का ? का यांच्याही डोक्यात H1N1 घुसला आहे ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...