मुख्य सामग्रीवर वगळा

इंदू मिल : वृत्तवाहिन्यांचे राजकराण

गेल्या काही वर्षांपासून धगधगत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा मुद्दा आज निकाली निघाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात जागा देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. बाके वाजवून सर्व खासदारांनी त्याचे स्वागत केले. तर, मुबंई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबेडकरी जनतेने पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

हा आनंदोत्सव दाखवत असतानाच, मराठी वृत्तवाहिन्या या आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्टावादी काँग्रेसचे विजय कांबळे यांची प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे प्रतिक्रीया घेत होते. तेव्हा सहाजिकच आता तुम्हाला काय वाटते हा प्रश्न होता, आणि त्याचे स्वाभाविक उत्तर होते, हा आनंदाचा क्षण आहे. आंबेडकरी जनतेचा हा विजय आहे.

आंबेडकरी जनतेच्या ह्या जल्लोषात बेकीचे बीज पेरण्याचे काम काही वृत्तवाहिन्या करताना दिसत होत्या. या विजयाचे श्रेय कोणाला देणार?  हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत इंदू मिल हस्तांतरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी संध्याकाळी दिली. तेव्हापासूनच काही वाहिन्यांनी एकाच वेळी रिपाई नेत्यांना फोनवर सोबत घेऊन चर्चा सुरु केली. या आनंदाच्या क्षणी चर्चेचा सूर मात्र "श्रेय कुणाला देणार" असा होता. एकाच वाहिनीवर हे सुरु होते असे नाही तर, बहुतेक वाहिन्यांवर हेच चित्र पाहायला मिळत होते. दिल्लीतून काँग्रेसच्या नेत्यांच्याही प्रतिक्रीया घेतल्या जात होत्या. त्यांनाही वरील आशयाचेच प्रश्न विचारले जात होते. हे प्रश्न खोदून खोदून विचारून वृत्तवाहिन्यांना नेमके काय साधायचे होते ? 

आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणापासून लागलेली दुहीची कीड काही केल्या जात नाही. या किडीला खाद्य पूरवण्याचे काम वृत्तवाहिन्याही वारंवार करताना दिसत आहे. बाबासाहेबांच्या नावाने भावनिक राजकाराण केले की, त्यांना मानणारे लाखो अनुयायी हे आपलेच, हे काँग्रेसने सुरु केलेले राजकारण आता-आता शिवसेना - भारतीय जनता पक्षालाही उमगले आहे. त्यामुळेच आंबेडकरी चळवळीतील एक मोठा गट ते जवळ बाळगून आहेत. मनसेही त्यांच्या व्यासपीठावर बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून आहे. बाबासाहेब काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नाही, हे मान्य केले तरी, त्यांच्या नावाने राजकारण केले की, मतपेटीत त्याचा परिणाम दिसतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

बाबासाहेबांचे स्मारक हा काही राजकीय विषय नाही. सुरुवातीला विजय कांबळेंनी सनदशीर मार्गाने ही मागणी काही वर्षांपूर्वी लावून धरली होती.आता आता काही वृत्तपात्रातून नवी माहिती वाचनात आली की, कांबळेंच्याही आधी काही कामगार नेत्यांनी इंदू मिलची मागणी केली होती. त्यासाठीची रक्कम केंद्र शासनाला देण्याचीही तयारी या कामगारांनी दाखवली होती. असो, विषयांतर होईल. तर, कांबळे आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष असतानाही त्यांच्या पक्षाने विधीमंडळात किंवा संसदेत ही मागणी आग्रहाने मांडली असे चित्र कधी पाहायला मिळाले नाही. माजी खासदार रामदास आठवले यांनीही त्यांच्या खासदारकीच्या काळात इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावे यासाठी संसदेत एखादी कविता एकविल्याचे आठवत नाही. रिपब्लिकन सेनेने गेल्या वर्षी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात इंदू मिलचा ताबा घेत उग्र आंदोलन केले आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्परतेने इंदू मिलबाबात केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले, हे सुर्यप्रकाशा एवढे स्वच्छ सत्य आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या दिल्लीतील संपर्काचा पूरेपूर वापर करुन घेतला आणि मागणी मान्य करुन घेतली.

असे असतानी श्रेयाच्या राजकारणावरून वृत्तवाहिन्या ह्या नेत्यांमधील दुराव्याचा फायदा घेत आठवलेंना विचारतात की, आनंदराज म्हणत आहेत की, हे त्यांचे यश आहे? तेव्हा त्यांचे उत्तर असते की, कोणी काहीही म्हटले तरी हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. आम्हीही त्यासाठी आंदोलन केले होते. हा संपूर्ण आंबेडकरी जनतेचा लढा होता आणि तो आम्ही जिंकला आहे.
यात आठवले हे कुठेही आनंदराज किंवा इतर नेत्यांचे श्रेय नाकारत नाही, हे स्पष्ट असतानाही वृत्तवाहिन्या दाखवतात की, हे आमचेच यश आहे, असे आठवले म्हणत आहेत. असे का? वृत्तवाहिन्यांनी वास्तव मांडायचे की, एकांगी सांगायचे ?  आनंदराज यांनीही कुठेही म्हटले नाही की, हे मी केले! त्यांनी देखील प्रत्येक वृत्तवाहिनीला हेच सांगितले की, हा आंबेडकरी जनतेचा विजय आहे. तरीही वृत्तवाहिन्या ओढून ताणून त्यांच्यात श्रेयाचे राजकारण सुरु आहे, हे का बिंबवतात? त्यासाठी अर्ध्या-अर्ध्या तासाचा विशेष कार्यक्रम घेऊन त्यांच्यात शाब्दीक युद्ध लावून देतात. वृत्तवाहिन्यांनी असे करण्यामागे काय 'राजकारण' आहे?  हे काही समजत नाही. टीआरपीचा विषय आहे. मान्य आहे. परंतू, जोपर्यंत स्मारकाची मागणी मान्य होत नव्हती तो पर्यंत हे ठीक होते. स्मारकाची घोषणा झाल्यानंतर सगळे मान्य करत आहेत की, हा सर्वांच्या आंदोलनाचा आणि आंबेडकरी जनतेचा एकत्रित  विजय आहे. तेव्हा वृत्तवाहिन्यांनी कशाचा इश्यू करायचा हे ठरवले पाहिजे. एखाद्या आनंदाच्या क्षणी आणि चांगल्या मुद्यावरही रिपाईच्या नेत्यांमध्ये दुही आहे हे आधोरेखित करुन वृत्तवाहिन्यांचा टीआरपी तसा किती वाढणार आहे ? उगाच भावेनेचे राजकारण चिघळवणे इष्ट आहे का ? नेत्यांना स्क्रिनवर समोरासमोर आणून एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला लावून जनतेच्या आनंदावर विरजण टाकणे बरोबर आहे का ? 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...