मुख्य सामग्रीवर वगळा

उजेडाची फुलं कोण जपणार ?


तुम्ही एक दिवस घरी उशिरा जाणार असाल तर बायकोचे नाहीतर आईचे पाच-दहा फोन येऊन गेलेले असतात. केव्हा येशील.  कुठे आहेस. किती वेळ लागले. कोणासोबत आहे. यापेक्षा  काही वेगळे प्रश्न तुमच्या कुटुंबियांच्या मनात येत नसतील. पण तो आता तुरुंगाचाच होऊन गेला आहे. त्याच्या दीड वर्षाच्या मुलाने सात महिन्यापूर्वी आपल्या बापाला पाहिले होते जाळीपलिकडे. त्या पोराला आपल्या बापाच्या खांद्यावर बसून गावभर फिरावं वाटलं नसेल का?  त्याच्या आई-बापाच्या दुखण्यात त्यांना वाटलं  नसेल का, की लेक असता तर दहा ठिकाणी घेऊन गेला असता आपल्याला. त्या क्रांतिकारी भगिनीच्या अंर्तमनाची घालमेल वेगळी  सांगायची काय गरज आहे. तिच्या मनात क्रांतीची आग आहे आणि ओठावर नक्षलवादी असल्याच्या संशयाने तुरुंगात टाकलेला नवरा - जीवनसाथी सचिन माळीचे गीत आहे.

शीतल साठे आणि सचिन माळी यांना नक्षलवादी असल्याच्या संशयाने महाराष्ट्राची एटीएस शोधत होते. यांचा गुन्हा काय तर बुद्ध-फुले-शाहू-बाबासाहेबांची गीतं लिहातात आणि म्हणतात.  दोघांनीही 2013 मध्ये मंत्रालयासमोर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. कारण काय तर आम्ही नक्षलवादी नाही हे सिद्ध करायचे होते. क्रांतीची गाणी गातो. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना त्यांचे शोषण होत असल्याचे उर बडवून सांगतो. आपला खरा आणि एकमेव बाप - बाबासाहेब. त्याचे कसे वाटे पाडले जात आहे. कोण कसा त्याचा लिलाव मांडत आहे. बिर्ला-बाटासोबत आता अंबानी-अदानी कसा तुमचा आटा पळवत आहे, हे सांगतो. हे सांगण जर लोकशाहीत गुन्हा आहे तर आम्ही जेलमध्ये जातो, यासाठी दोघांनी पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे ठरवले. ते आत्मसमर्पण नव्हते. शीतल आता जामीनावर बाहेर आली आहे. दीडवर्षांच्या त्यांचा मुलगा अभंग आता तिच्यासोबत असतो.

क्रांतीची गाणी लिहिण्याची आणि म्हणण्याची किती मोठी किंमत मोजत आहेत हे दोघं. आणि त्यात पोराचा - अभंगचा काय दोष. ज्याला अजून क्रांतीही निट म्हणता येत नसेल. काल औरंगाबादमध्ये विद्रोही शाहीरी जलसा झाला. तुडूंब भरलं होतं सभागृह. शीतल साठेंनी दगडालाही पाझर फुटावा अशा आर्तस्वरात बाबासाहेब,  शिवबा-सावित्री-फुले-शाहू सांगितले. खरा शिवाजी सांगणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरेंची वडिलकीची थाप आता पाठीवर पडणार नाही याचं आभाळभर दुःख असल्याचेही सांगितले. पण या 'उजेडाच्या फुलां'ना हा समाज जपणार की नाही? हा सवालही सर्वांसमोर ठेवून गेली. सचिन अजून किती दिवस तुरुंगाच्या भिंतीवरच लिहित राहाणार. तुरुंगात असूनही त्याचा आवाज बाहेर घुमतो आहे, पण बाहेरचा आवाज त्याच्यासाठी कधी उठणार ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...