मुख्य सामग्रीवर वगळा

मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा...

गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वी राजस्थान हायकोर्टातून निवृत्त होणाऱ्या न्यायाधिशांनी दिला होता. त्यावर राष्ट्रीय स्तरावर बरीच चर्चा झाली. गुजरातमध्ये गोरक्षणाच्या नावावर वाढत चाललेला हिंसाचारही चिंतेचा विषय बनला आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी गुजरात दौऱ्यावर असताना गायीच्या नावाखाली माणसांना मारणे योग्य नसल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून 'गाय' हा विषय अधिक संवेदनशील झाला आहे. नुकताच एक अहवाल आला होता त्यात महाराष्ट्रात गोरक्षणाच्या नावाने गुजरात आणि उत्तर प्रदेश एवढा हिंसाचार नसल्याचे म्हटले होते. हे कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोचले की काय? आपण कसे काय मागे राहिलो याचे त्यांना दुःख झाले असावे म्हणूनच फडणवीसांच्या वाणीतूनही आता गायीचे गोडवे निघाले आहेत. तेही गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या उपस्थितीत.

काय म्हणाले मुख्यमंत्री 
- जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ज्या ठिकाणी गायींची संख्या कमी झाली आहे तिथेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.'
- मुख्यमंत्री फडणवीस एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे म्हणाले, की गाईंची संख्या घटल्याने शेती उत्पादन घटले आहे. शेतकरी गायींचा कसा सांभाळ करतात याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण गाय असेल तर उद्याचे जग असेल.

भूमिका 
- मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे निरुपण ऐकणाऱ्या जैन समुदायाला भरुन पावले असेल. परंतू मुख्यमंत्री हे विसरले की ते ज्या विदर्भातून आले आहेत, त्याच प्रदेशात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक आहे.
- मुख्यमंत्री म्हणाल्या प्रमाणे मग विदर्भात गायींची संख्या कमी झाल्यामुळेच कदाचित विदर्भात आत्महत्या वाढल्या असल्या पाहिजे. यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांनी विदर्भात प्रत्येक शेतकऱ्याला खंडीभर गायी अनुदानात दिल्या पाहिजे. कारण गायींची संख्या वाढली तर शेतकरी आत्महत्या आपोआप कमी होतील आणि उद्याचे बुडणारे जग आपण वाचवल्याचे पुण्यही त्यांच्या पदरी पडेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...