मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे.
मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यासाठी मोदी-शहा जोडीने कोविंद हा दलित मोहरा पुढे केला आहे. त्यांचे नाव वापरून आता शहा गल्लीबोळात सभा घेऊन मायावतींचे राजकारण संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार हे सांगण्यासाठी भविष्यवेत्याची गरज नाही.
शहा पत्रकार परिषदेत वारंवार रामनाथ कोविंद हे कोणत्या समाजातून आले होते याचा उल्लेख करत होते. दलित समाजामध्ये त्यांनी केलेल्या कामाची उदाहरणे देत होते. त्यांचा सर्वाधिक जोर हा कोविंद कोणत्या जातीतून आले आणि भाजपवर वारंवार जो जातियवादाचा आरोप लावला जातो तो पुसण्याचा प्रयत्न दिसत होता. 2014 पासून भाजपच्या कार्यकाळात राजस्थान असेल नाहीतर नुकतेच उत्तर प्रदेशातील सहारनपूर किंवा त्याआधी गुजरातमधील उना अशा अनेक घटना मोजता येईल जिथे भाजपच्या शासन काळात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. या सर्वाचे पापक्षालन करण्यासाठी आणि आपल्या 'ऐकण्यात' राहील अशा उमेदवाराचा शोध रामनाथ कोविंद यांच्याजवळ येऊन थांबला आहे. कोविंद यांना काँग्रेस आणि डाव्यांनी विरोध केला तर ते कसे दलित विरोधी आहे हे ओरडून सांगण्यासाठी संघाची फळी आहेच.
कोविंद हे उत्तर प्रदेशातील कोळी समाजातील आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या कोविंद यांनी भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती, ते आयएएस होऊ शकत होते परंतू त्यांनी वकीलीला प्राधान्य दिले. भाजपच्या दलित मोर्चाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. दोन वेळा राज्यसभेवरही निवडून गेले. महाराष्ट्रात जसे विनय सहस्त्रबुद्धे हे भाजपच्या थिंक टँकमध्ये गणले जातात तसे कोविंद आहेत. ते राष्ट्रीय प्रवक्ते होते आणि प्रवक्ते असूनही ते कधी टीव्हीवर झळकले नाही. असा कमी बोलणारा राष्ट्रपती मोदी-शहांसाठी कधीही बेस्ट-बेटरच ठरणार.
-BHAi उन्मेष खंडागळे
Nice
उत्तर द्याहटवा