मुख्य सामग्रीवर वगळा

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

१७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले.

राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे कोणता व्हिडिओ लावणार आणि मोदी सरकारची किती फाडणार याची सर्वांनाच उत्सूकता लागून राहिलेली असते. आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आणि राज यांची या निवडणुकीतील मुंबईतील पहिली सभा काळाचौकी येथे झाली. यावेळी त्यांनी मुकेश अंबानींचा उल्लेख करुन भाजपवर बाऊंसरच टाकला आहे.
राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणली होती. त्यांच्या या ब्ल्यू प्रिंटची तेव्हा सर्वच माध्यमवीरांनी खिल्ली उडवली होती. मात्र त्यातून एक नव्या धाटणीचा विचार करणारा नेता निर्माण होत आहे, असा आशावाद कोणीही व्यक्त केला नाही. यंदाच्या लोकसभेत राज यांनी व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे मोदी-शाह जोडीवर फोकस ठेवून त्यांच्या पाच वर्षातील कामाची लक्तरेच वेशीवर टांगण्याचा जाहीर कार्यक्रम हाती घेतल्याचे आपण पाहात आहोत. यासाठी ते एखाद्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये प्रेझेंटेशन द्यावे तसे आपले भाषण सादर करत आहे. एक-एक व्हिडिओ दाखवून त्याबद्दल ठाकरी शैलीत मोदी सरकारचे वाभाडे काढत आहेत. विशेष म्हणजे ४८ लोकसभा मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्रात राज यांनी मोजून १० सभा घेण्याचे ठरवले आहे. त्यात त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार नाही, तरीही त्यांच्या सभांना होणारी गर्दी ही चढत्या क्रमाचीच राहिली आहे.
राज ठाकरे यांनी नांदेड येथील पहिल्या सभेत मोदींच्या डिजिटल इंडियाची पोलखोल केली. त्याबद्दलचा व्हिडिओ त्यांनी सभेत दाखवला. हरिसाल गावातील गावकरी, या गावाचा मॉडेल याची सध्याची परिस्थिती त्यांनी नांदेडच्या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाला दाखवली. यानंतर सोलापूरच्या सभेत या गावातील मॉडेलच समोर आणून मोदी सरकारचे दात घशात घातले. राज यांच्या आरोपांना उत्तर तरी कसे द्यायचे याचा फक्त विचारच भाजपचे धुरीण करत बसले. तोपर्यंत राज यांच्या भाषणाचे व्हिडिओ विविध भाषांमधून देशभर पोहोचत होते. डिजिटल गावानंतर मुरबाडमधील धसई या सरकारच्या लेखी कॅशलेस गावाचा कारभार कसा फक्त कॅशवरच अवलंबून आहे हे राज यांनी त्यांच्या पुढील सभेत दाखवले.
जवानांच्या नावावर, एअर स्ट्राईक करणाऱ्या वैमानिकांच्या नावावर मोदी मतं मागत आहेत, मात्र यांच्याच नाकर्त्या धोरणांमुळे काश्मिरमध्ये जवान कसे मार खात आहेत, याचा व्हिडिओ दाखवून राज यांनी जनतेच्या मानात मोदी आणि त्यांच्या सरकारबद्दलची चीड आणखी वाढवली. १४ फेब्रुवारीला ४० जवान शहीद झाले. या जवानांच्या घरातील चुलही पुढील काही दिवस पेटली नसेल मात्र पंतप्रधान मोदी १५ ते २२ तारखेपर्यंत कोणकोणत्या ड्रेसमध्ये कोणकोणत्या हास्यमुद्रा देत होते, याचे सविस्तर फोटो फिचर द टेलिग्राफने दिले होते. या दैनिकाचे कात्रण दाखवून राज यांनी मुंबईच्या सभेत 'हा कसला फकीर हा तर बेफिकीर पंतप्रधान' म्हणून मोदींचा समाचार घेतला. राज यांच्या फकीरावरील कॉमेंटवर मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद हा प्रातिनिधीक म्हणता येईल. कारण घरी बसून आपापल्या टीव्ही स्क्रिनवर राज यांचे भाषण पाहाणाऱ्या आणि ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील कोट्वधी जनतेचाही तोच प्रतिसाद असणार यात शंका नाही.
मुंबईतील पहिल्याच सभेत राज ठाकरे यांनी मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना दिलेल्या पाठिंब्याचा ज्या प्रकारे उल्लेख केला, त्यातून त्यांना काय म्हणायचे आहे ते त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवले आहे. मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे हे चांगले मित्र आहेत, याचाही उल्लेख राज यांनी केला. त्यांच्या बोलण्यातील बिटवीन द लाईन जनतेला कळली असणारच. अंबानी यांनी देवरांना दिलेल्या पाठिंब्यातून देशात काय वारे वाहात आहे, याचा संदेश गेल्याचेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांची वकृत्वशैली ही महाराष्ट्राच्या जनतेला नवी नाही. रंग-रेषांशी खेळणारा हा माणूस जेव्हा एखाद्याबद्दल बोलतो तेव्हा त्यांचे हातवारेही एका लयीत फिरत असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. नुकतेच त्यांनी 'हवा नसलेला फुगा कसा असतो... जॅकेटमध्ये फिट बसवलेला हा फुगा आहे' असा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला तेव्हा खरोखर एखाद्या फुग्याला शर्ट-पँट आणि जॅकेट घातल्यासारखे देवेंद्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहिले असणार. ही राज यांच्या शब्दाबरोबरच त्यांच्यातील व्यंगचित्रकाराची दृष्टी आहे.
राज यांच्या भाषणांची अशीच मेजवाणी आता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मुंबईतील सभांतून मिळत राहाणार आहे. त्याचा जनतेच्या मनावर किती परिणाम झाला हे बरोब्बर एक महिन्याने अर्थात २३ मेला आपल्याला कळेलच. तोपर्यंत 'लाव रे तो व्हिडिओ'...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...