वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे.
मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आलेला दिसत नाही. या समाजावर अजुनही हिंदूत्वाचे गारुड आहे. त्यांच्यातील चार-दोन नेते आणि कार्यकर्त्यांनी आंबेडकरी विचारधारा स्वीकारली असली तरी बहुसंख्याक समाज हा तुमचं ऐकायला तयार नाही. त्यामुळे प्रश्न पडतो की हा मतदार कित्येक वर्षे फक्त 'व्होट कटुआ' (मतं गोठवणारा) म्हणून राहाणार आहे. जर आपली लिडरशीप संसदीय राजकारणात दबावगट म्हणूनही पुढे येत नाही, तर नेतृत्वाने दुसरा विचार करणे गरजेचे आहे. एवढा मोठा मतदार आणि समाजातील तरुण नेतृत्व दर पंचवार्षिकला थिजवून (ब्लॉक करणे) टाकले जात आहे.
विदर्भातील अनेक मतदारसंघात 'वंचित' उमेदवारांनी २०-२५ ते ५०-७५ हजारंपर्यंत मते मिळवली आहे. मुर्तिजापूरच्या आमच्या भगिणी प्रतिभा अवचार यांचा विजय फक्त १९१० मतांनी हुकला आहे. आकोटमध्ये 'वंचित'चे उमेदवार ७२६० मतांनी पराभूत झाले. अकोला पूर्वमध्ये हरिदास भदे यांना ७५,७५२ मते मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. बाळापूरमध्ये डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना ५०,५५५ मते मिळाली तर एआयएमआयएमला तिसऱ्या क्रमांकाची ४४,५०७ मते मिळाली. वाशिममध्ये सिद्धार्थ देवळे यांनी भाजपला कडवी झुंज देत ५२,४६४ मते घेऊन दुसऱ्या क्रमांक मिळवला. कळमनुरीमध्ये अजित मगर यांना ६६,१३७मते मिळाली. औरंगाबाद मध्य मतदारसंघात वंचित आणि एमआयएम या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज शिवसेनेच्या विजयी उमेदवारापेक्षा १३,४१० अधिक होते. आज या सर्व जागांसह महाराष्ट्रात समविचारी पक्षांसोबत वंचितची आघाडी असती तर? नक्कीच निकाल वेगळा आला असता, यात शंका नाही.
आंबेडकरी विचार सभा-संमेलनातून आणि रस्त्यावरील आंदोलनातून सांगण्याबरोबरच तो संसदीय सभागृहातून मांडला गेला तर तो अधिक प्रभावीपणे मांडला जाईल. त्यासाठी गरज आहे ती थोड्या लवचिकतेची.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा