महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली. काँग्रेस - राष्ट्रवादीला अनपेक्षित बहूमत मिळले. आणि पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण पुत्र अशोक चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. अशोक चव्हाण विक्रमी मताधिक्याने निवडून आले. हे सगळं यश मुख्यमंत्र्यांना लोकशाहीतील मतदारराजा आणि काँग्रेसश्रेष्ठींच्या कृपादृष्टीमुळे मिळालेले आहे, हे महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान न केलेला एखादा पोरही सांगू शकेल. मात्र चव्हाणांचा विश्वास लोकशाहीतील 'देवा' पेक्षा देव-देव करणा-या बाबावरच जास्त असल्याचे रविवारी महाराष्ट्रदेशाने पाहिले.
राजकारणी कुडमुड्या जोतिषा पासून 'जागृत' देवस्थानाचे निस्सीम भक्त असतात. हे ही सर्वश्रुत आहे. डाव्या चळवळीतील - पुरोगामी म्हणविणारेही बरेच जण चोरुन लपून देवदर्शन घेऊन येतात. मुलाबाळांच्या लग्न पत्रिकांवर याच्या त्याच्या कृपेनं छापतात. वेगवेगळ्या नावाने भंडारा, कंदूरी, न्याज च्या पंगती उठवतात. मात्र काल मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शासकीय निवासस्थानी , शासकीय खर्चाने , सुटीच्या दिवशी शासनाचे कर्मचारी राबवले ते सत्यसाईबाबाची पाद्यपूजा करण्यासाठी.
उठता बसता पुरोगामीत्वाची टिमकी मिरवणारे काँग्रेसीही यावेळी चव्हाणांची पाठराखण करतांनाच दिसत होते. शाहु-फुले-आंबेडकरांचे उठता बसता नाव घ्यायचे आणि त्यांच्याच महाराष्ट्रात भोंदू बाबाची शासकीय पूजा करुन घ्यायची . हे फक्त या काँग्रेसींनाच जमु शकतं.
ह्या सत्यसाईबाबाचा इतिहास आणि भक्तगण पाहिलातर त्याचीही या राजकारण्यांमधे बरीच उठबस दिसून येते. काँग्रेसचे हेडमास्तर तथा मुख्यमंत्र्यांचे पिताश्रीही या बाबाचे कट्टर भक्त होते. तसेच तासा तासाला कपडे बदलणारे शिवराज पाटील चाकूरकरांपासून, डोईवरील एकही केस न विस्कटू देणारे विलासराव देशमुखांपर्यत सर्वजण या (अ)सत्यबाबाचे पट्टशिष्य. यासोबतच आंध्र- कर्नाटकातही या बाबाच भक्तगण मोठ्याप्रमाणात आहे. आपल्या भक्तांना हा बाबा हवेतून सोन्याची साखळी काढून देतो. कायम आपल्याच धुंदीत असल्यासारखा वेडेवाकडे हातवारे काय करत असतो. आणि मह्त्वाचं म्हणजे या बाबाचे भक्त हे कोट्याधीश, सत्ताधारी , पुंजीपतीच कसे काय. या बाबाच्या सत्याचा भास- आभास काय फक्त पैशांच्या जोरावरच होतो की काय ? मुख्यमंत्र्यांनी किंवा इतरांनीही कोणाची पूजा करावी , कुठे करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . हे आम्हालाही मान्य. परंतू आमच्या कर रुपी पैशातून ज्या बंगल्याचा खर्च चालतो. तेथील कर्मचा-यांचे पगार दिले जातात. तिथे ही सवंग भक्ती करायची यांची हिम्मत तरी कशी होते. तुम्हाला पाद्यपूजा की काय ते करायचे तर तुमच्या मालकीच्या घरात जावून करा. मात्र त्यानंतर आमच्या शाहू - फुल्यांचे नाव घेवू नका. महाराष्ट्राने तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे. आमच्या जीवावर तुमचे चोचले पूरवण्याचे लायसन्स नाही. हा (अ)सत्यसाईबाबा स्वत:ला देवाचा अवतार समजतो. आणि महाराष्ट्रदेशाचे मुख्यमंत्री , राष्ट्रवादीचे जयंत पाटील महाराष्ट्रच्या पुरोगामीत्वाचे श्राध्द घातल्यासारखे या बाबाची साग्रसंगीत पूजा करतात. यांच्या या अशा वागण्याने देऊळा- राऊळात जावून दगडात देव शोधणा-या सामान्य माणसाचाही देवावरचा विश्वास उडायचा...
'वर्षा'वर भूत-प्रेतांचा वावर आहे. अशाही बातम्या काल दिवसभर मिडियात होत्या. या भुतांचे शांतवन करण्यासाठीतर अशोकराव तुम्ही हा पूजेचा घाट घातला नव्हाताना. मात्र तुम्हाला सळो की पळो करणारं भूत पूढील पाच वर्ष तुमच्या आजू बाजूलाच राहणार आहे. हे तुम्ही कसं विसरता. त्यासाठी कोणत्या पूजा करणार हे ही सांगून टाका.
उन्मेश,
उत्तर द्याहटवाछान आहे.लिहित रहा.
अभिनंदन !!