2010 या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगलीच नटरंगी झाली. 1 जानेवारीला नटरंग प्रदर्शित झाला, त्याला सबंध महाराष्ट्रदेशातून उत्तम प्रतिसाद लाभलाय. नंटरंगच्या मागोमाग झेंडा हा ठाकरे घराण्याचा राजकीयपट मांडणारा चित्रपट मराठी रसिक मायबापाच्या भेटीस उत्सुक होता. यानंतर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय म्हणणारे महेश मांजरेकर शिक्षणाच्या आयचा घो... म्हणत येणार होते. या दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने मान्यताही दिलेली आहे. मात्र झेंडा मुळे कुणाचा तरी स्वाभिमान दुखावलाय तर, मांजरेकरांच्या चित्रपटाचे नाव शिवराळ असल्यामुळे त्याच्या नामांतरासाठी शिवबाचे मराठे बाह्या सरसावून पुढे आलेत.
शासनाचे सेन्सॉर बोर्ड, न्यायालय या व्यवस्था असतांना तिथे दाद मागण्याची कुणाचीच तयारी नाही. जनतेच्या दरबारातही या चित्रपटांचे भवितव्य ठरुदेत असं कोणीही म्हणायला तयार नाही.
सेन्सॉर बोर्डला समांतर सेन्सॉरशिप ही काही आजचीच बाब नाही. अनेक चित्रपट - नाटके हे या सेन्सॉरशिपच्या जाळ्यात अडकलेले आहेत. तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे नाटक , दिपा मेहतांचा वॉटर यासह अनेक कलाकृतींना या मुठभर अस्मिता, धर्मिक भावना, स्वाभिमान दुखावल्याच्या कारणावरुन आपल्या प्रदर्शनावर बंदी आणावी लागली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही अशी गळचेपी होवूनही कलाकार एकत्र येवून याविरोधात आवाज का उठवत नाही. या प्रश्नाचेही उत्तर अजून मिळालेले नाही.
सिने-नाट्य कलाकारांबाबतच असं घडतं असंही काही नाही, चित्रकार, साहित्यीक यांनाही या समांतर सेन्सॉर बोर्डाचा तेवढाच त्रास होतो. मात्र आजपर्यंत हे साहित्यीकही या विरोधात एकत्र आलेले नाही. मागील वर्षी आनंद यादवांना त्यांच्या पुस्तकातील भाग वगळूनही साहित्यासंमेलनाचे अध्यक्षपद भुषविता आले नाही. अध्यक्षाविना संमेलन पार पडले.
आता वळुयात आपल्या मुळ मुद्याकडे, झेंडा आणि शिक्षणाच्या आयचा घो...
नटरंगच्या झगमगीत यशानंतर झेंडा हा बहुचर्चीत चित्रपट प्रदर्शित होता होता राहिलाय. झेंडा ठाकरे घराण्यावर आधारीत चित्रपट. त्यामुळे ठाकरे घराण्यातील राजकारण, त्यांच्यातील फुट आणि त्यांच्या सावलीत मोठे झालेल्या प्रत्येकाचा उल्लेख यात झालेला असणार हे सहाजिक आहे. राज्याचे वसुलीमंत्री नारायण राणे यांचे शेंडेफळाचा स्वाभिमान या चित्रपटातील सदा मालवणकर या व्यक्तीरेखेमुळे दुखावलाय. आता हा स्वाभिमान राणेंच्या सांगण्यावरुनच दुखावलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नितेश राणेची स्वाभिमान संघटना चित्रपटाचे दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांना सदा मालवणकरची व्यक्तीरेखा बदला अन्यथा चित्रपट बंद पाडला जाईल अशा धमक्या देत आहेत. या धमक्यांना घाबरुन , सरकारी व्यवस्थेकडे दाद न मागता गुप्ते साहेबांनी मालवणकर हे नाव बदलण्याचं कबुल केलयं. नुसतच नाव बदलण्याचं कबुल केलं नाही तर ती व्यक्तीरेखाही काढुन टाकण्याचंही मान्य केलं.
यासर्व प्रकारावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे हे कोणीही नाकारणार नाही. मात्र अवधुत गुप्तेंही सरकारकडे दाद नमागता या बदलास का तयार झाले हे कोडेच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा