मुख्य सामग्रीवर वगळा

सोनेरी वर्खाच्या दगडाच्या देशा

आज महाराष्ट्र दिन. (हो दिनच ''दीन'' नाही. ) आज नुसताच महाराष्ट्र दिन नाही तर कामगार दिन देखील आहे. (हे तुम्हाला माहित नाही असं गृहित धरून मी मुळीच लिहीत नाही. तर तुम्हाला हे माहित आहे म्हणूनच लिहित आहे. ) तसच आज महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव. म्हणजेच 1 मे 2010 हा दिवस असा सुवर्ण त्रिकोणाने सजला आहे.
या महाराष्ट्राचा इतिहास वगैरे मी सांगत बसणार नाही. काय पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचे, मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्वखुशीने सामिल झालेला मराठवाडा, काहि अटींनीशी महाराष्ट्रात आलेला विदर्भ. हे सगळं तुम्हाला रोजच्या पेपरातून, टिव्ही वरुन वाचायला पहायला मिळत आहेच. काहींना या इतिहासाबद्दल जास्तच जाणून घ्यायचे असेल तर बरीच पुस्तकंही छापली गेली आहेत. त्यामुळे त्यात मी आणखी काय वेगळं सांगणार. असो.
हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्र शासन धुमधडाक्यात साजरा करत आहे. (शासनाने तसं त्यांच्या फाईलींवर, डाय-यांवर , जाहिरातीत 50चा आकडा आणि तुतारीचे चित्र दाखवायला कधीपस्नचं सुरुवात केलीय. ) महाराष्ट्र शासन साजरा करत आहे म्हणजे कांग्रेस, राष्ट्रवादी. मग शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मराठी आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि मुद्यावर वाढलेल्या पक्षांनी काय फक्त सरकारी खेळच पहात रहायचा का ? तर बिलकूल नाही आणि भाजपाचे म्हणाल तर हा राष्ट्रीय पक्ष. या पक्षाचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा . कदाचित भाजपा 1 मे काळा दिवसही साजरा करतील. त्यामुळे या सेलिब्रेशनच्या युगात, दिखाव्याच्या जगात शासन, सेना आणि मनसे यांच्यासाठी महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव हा ''महा इव्हेंट''.
हा महाइव्हेंट मनसेने पुरेपुर कॅश केलाय. हे सुवर्ण महोत्सवी दिनाच्या पुर्वसंध्येला मराठी न्यूज चॅनलाला डोळे लावून बसलेल्या प्रत्येक मराठी आणि गैर मराठी माणसाने बघीतले असेल. शिवसेनेने केलेल्या रक्तदान महायज्ञाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याचाही मोठा गाजावाजा झाला. पण हे सामाजिकदृष्टया फार मोठे काम झाले हे देखील महाराष्ट्राने मान्य केले. मात्र सुवर्ण महोत्सवाच्या पुर्वसंध्येला पुतण्याने काकावर मात केली.
शिवसेनेने आज मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शिवराज्याभिषेक शिल्पाचं अनावरण आणि कलादालनाचं उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते केलं. शिवाजी पार्कात उभारलेल्या कलादालनात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास साकारला. मात्र न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये या बातमीला आज काहिसं कमी महत्त्व होतं तर मनसेच्या "महाराष्ट्र माझा'' या रंगारंग कार्यक्रमाने जास्त फुटेज घेतलेलं दिसलं. एकूणच पुतण्याने काकाला पुन्हा एकदा मात दिली. हिंदी चॅनलवरतर चाचा-भतिजा का "रण" . अशाच काहिशा मथळ्याखाली बातम्या दाखविल्या जात होत्या. एकंदर या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या सोहळ्याचे जेवढे आप्रुप या दोन ठाकरेंना झाले तेवढे खचितच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयन जनतेला झाले असेल, असे वाटत राहते. आज महाराष्ट्र माझा कार्यक्रमात मराठमोळी लावणी थिरकली, शास्त्रीय संगीताने हा सोहळा सजला, मालवणी वस्त्रहरणने सगळ्यांना हसायला लावलं, त्याआधी महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील चव खवय्यांनी चाखली, आणि समारोप झाला तो महाराष्ट्राच्या आधुनिक शिल्पकारांच्या सन्मानाने. आता उद्याचा दिवस , खरं तर संध्याकाळ नव्हे रात्र गाजेल ती शिवसेनेच्या गर्जा महाराष्ट्राने. मात्र एक दिवस आधी मनसेनं बाजी मारलीय. मात्र या सेना आणि मनसेच्या रंगारंग कार्यक्रमात अंधारात असलेल्या अर्ध्या महाराष्ट्राचा कोणाला विसर पडू नये. विदर्भातील कास्तकारांच्या आत्महत्या - त्यांच्या विधवांचे प्रश्न या लक्ष दिपांच्या-आतिषबाजीच्या झगमगाटात झाकोळून जाऊ नयेत, मराठवाड्यातील खेड्यात-तांड्यावर पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाहीए, शहरांची अवस्थाही या पेक्षा वेगळी नाही. इथं या मुंबापुरीत सुवर्णमहोत्सवाचे पेग रिचवतांना कुठेतरी आपल्याच बांधवांच्या घशाला कोरड पडली असेल हे देखील लक्षात असुद्यावे.
एवढीच या महाराष्ट्राची 50 वर्षांपासूनची विनंती पुन्हाएकदा आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...