मुख्य सामग्रीवर वगळा

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी

भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी ;
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे ?

असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडेत असेल ना. पण हा प्रश्न आपल्याला वारंवार का पडतो, आपल्या संवेदना इतक्या बोथट का झाल्या आहेत. आपल्या आसपास काही तरी वाईट घडतं आहे. काही माणूसकीला काळीमा फासणारं घडत आहे. काही अनैसर्गिक घडत आहे. या सर्व अघटीतांचे आपण केवळ मुक साक्षीदार का होत आहोत. गांधींची तीन माकडं आपण बनलो आहोत का ?
....
एक प्रसंग

एका शहरातील एक गजबजलेला चौक. सायंकाळची वेळ. एक वेडी बाई रस्त्यावर मरणप्राय वेदनेने ओरडते आहे. ती गर्भवती आहे. तिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली आहे. तिच्या बाळांतकळा आणि तिच्या मरणकळा यात कोणतीच भेदरेषा उरलेली नाही. तिचा आक्रोश क्षणा क्षणाला वाढतच जात आहे. तिच्या आसपास बघ्यांची गर्दी जमते. विरते. पुन्हा नवे लोक येऊन बघतात. निघून जातात. सुर्याचीही जाण्याची वेळ झालीय. तोही कधी कुणासाठी थांबत नाही. त्या वेडीचा टाहो आता अधिकच व्याकूळ झालेला. भर रस्तावर ती एका बाळाला जन्म देते. रस्त्यावर पैदा झालेलं ते पोर सर्वांची सहानुभूती मिळवतं. मदत मात्र नाही. पुढचे दोन तीन तास ते नवजात बालक आणि वेडी बाळांतीण त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून. काय म्हणत असेल त्या वेड्या आईची वेडी माया , ''मी जन्मत:च तुला रस्त्यावर आणलं. मला विचारु नकोस तुझा बाप कोण." की, ती काहीच म्हटली नसेल. काही म्हणण्याचे त्राण तरी कुठे होते तिच्यात. पुढच्या दोन तीन तासानंतर कुणाच्यातरी काळजात माणूसकीचा पाझर फूटला आणि त्या बाळ-बाळांतिणीला तिथनं दवाखाण्यात हलवण्यात आलं.

......


हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील , नाटकातील नाही तर, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात घडलेला आहे. तुम्ही पेपर मधे वाचलं असेल. टीव्हीवर बघीतलही असेल. बीड शहराच्या एका नाक्यावर रस्त्याकडेला हे सगळं घडत होतं तेव्हा कोणीच त्या वेडीच्या मदतीला धावलं नाही. एक साधा फोनही कोणी सरकारी दवाखाण्याला लावला नाही. अँबुलन्स बोलावली नाही. खिशातला / पर्समधला मोबाईल काय केवळ खयाली खुशाली विचारण्यासाठीच बाळगतो का आपण. ( मी कायम आपण - आपण म्हणतो आहे, ते जाणीव पुर्वक. कारण हा एक प्रसंग आहे, जिथे आपण नव्हतो. पण बसस्टॉपवर, रेल्वेस्टेशनवर एखादा कुली - म्हातारा - एखादी स्त्री एक मोठं गाठोडं पुढ्यात घेऊन ओशाळल्या नजरेने उभे असतात, कोणीतरी या गाठोड्याला टेकु देईल म्हणून, पण आपण कधीच त्या गाठोड्याला हात लावण्यासाठी वाकलेलो नसतो. का शर्टची इस्त्री मोडेल म्हणून - की हात मळतील म्हणून. म्हणून हा आपण. )

ग्रामीण भागात अजून माणूसकी शिल्लक आहे असे वाटत होते. पण या प्रसंगाने हा भ्रम दुर झाला. मुंबई - पुणे या महानगरांमध्ये कुणालाच दुस-यांसाठी वेळ नसतो. त्यांच्या वेळेचं - वागण्याचं कौतूक मुळीच नाही, पण मराठवाड्यातल्या एका ग्रामीण जिल्ह्यातही आता माणसला माणसासाठी वेळ उरलेला नाही.
या घटनेतून आपण 'प्रेतांपरी' झालोय हे जसे सिध्द झाले तसेच ज्या वेड्या स्त्रीला केवळ ती वेडी आहे म्हणून तिचा यथेच्छ उपभोग घेवून तिला मरण्यासाठी रस्त्यावर सोडून देणा-या नराधमाला जितकी दुषणं द्यावी तितकी कमीच आहेत.
आज जर एक वेडी स्त्री वासणेची शिकार होत असेल तर, धड धाकट लेकी - बाळी , आया - बहिणींच्या सुरक्षेचे काय ?
त्या वेड्या आईच्या बाळाच्या भविष्याचे काय? त्या बिचा-याच्या आयुष्यात काय वाढून ठेवलय कोण जाणे? प्रश्न प्रश्न आणि प्रश्नांचे वेटोळे तेवढे दिसत आहे?

तुमच्याही आयुष्यात प्रश्न आहेत . कांद्याचे भाव वाढलेत. पेट्रोल परवडेनसे झाले. महागाई रोज नवा उच्चांक गाठत आहे. मल्टीप्लेक्सेसची तिकटं नेमकी सुटीच्या दिवशीच का वाढतात. तुमचे आमचे हे प्रश्न जीवन सुखकर करण्यासाठीचे आहेत. मात्र त्या दोन जीवांच्या जगण्याचाच प्रश्न आहे.

हे सगळं आपल्या आसपास घडत असतांना आपण गप्प असतो. गप्प गप्प असतो. आपला आणि 'त्यांचा' काहीच संबंध नाही, ही भावना आपली बळावत चालली आहे. ही दरी सांधली पाहिजे. या सुस्थित आयुष्यापासून त्या विस्थापित जगण्यापर्यंत एक सेतू बांधला पाहिजे. थोड्या थंड जरुर झाल्यात पण आपल्या संवेदना मेलेल्या नाहित, नसता या शेवटापर्यंत तुम्ही आलाच नसता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...