मुख्य सामग्रीवर वगळा

रिपब्लिकन पक्षाची दुर्दशा कधी थांबेल ?


१९५७ ते १९६७ पर्यंत एक प्रबळ शक्ती असलेला आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाला प्रखर विरोध करुन सतत दबावात ठेवणारा रिपब्लिकन पक्ष आज पडझड झालेल्या एखाद्या मजबूत किल्ल्याची जी अवस्था होते तसा झाला आहे. एके काळी दिमाखदार वैभव लाभलेला किल्ला जसे खिंडारात त्याचे रुपातंर होऊन भकास आणि अवकळा आलेली वास्तू दिसावी तसे रिपब्लिकन पक्षाचे झाले आहे.
एके काळी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पंजाब, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यातून लोकसभेत खासदार पाठविणारा व विधानसभेत आमदार पाठविणारा तसेच मुंबई आणि नागपूर सारख्या महापालिकेचे महापौर पद भोगलेला हाच रिपब्लिकन पक्ष आहे का असा प्रश्न पडतो.
१९५७ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उरात धडकी भरविणारा रिपब्लिकन पक्ष त्याच काँग्रेससमोर सत्तेसाठी भिकेचे कटोरे घेऊन उभा असलेला पाहिल्यानंतर आंबेडकरी अनुयायांच्या तळपायाची आग मस्तका पर्यंत जाऊन भिडेत. या लाचार पुढा-यांना काळ्या पाण्यावर न नेता जिथे पाणीसुद्धा मिळणार नाही अशा ठिकाणी नेऊन फाशी द्यावी आणि समाजाची कायमच्या लाचारीपासून सुटका करावी, अशी सर्वसामान्य माणसाची उस्फूर्त संतापी प्रतिक्रीया उमटते. परंतू बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत तशा प्रकारची कोणतीच तरतूद नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन हे मोकार सांड एका निवडणूकीतून दुस-या निवडणूकीकडे शेपूट वर करून पून्हा उधळतात. अशा प्रकारे या मोकार सांडांना समाज आजपर्यंत वेसन घालू शकला नाही. ही समाजाची अगतिकता आहे. त्याचा हे पुढारी पुरेपूर फायदा घेतात. असं हे दुष्टचक्र सतत चालू आहे. आंबेडकरी समाजाला अगतिकपणे हे उघड्या डोळ्याने पाहावे लागते, ही त्याहून वाईट गोष्ट आहे.
बलाढ्य शक्तीचा लाचार पक्ष झाला
१९६७ पर्यंत एक बलाढ्य शक्ती म्हणून रिपब्लिकन पक्षाचे स्वरुप होते. परंतू १९६७ साली काँग्रेसचे चाणाक्ष नेते यशवंतराव चव्हण यांनी "रस्त्यावर मोर्चा काढून ज्या मागण्या करता, त्या सत्तेवर बसून सोडवा" अशी मधाळ भाषेत दादासाहेब गायकवाड यांना भुलावणी घातली व त्या यशवंतरावांच्या मधाळ भाषेला व त्यामधून टाकलेल्या चतूर डावाला रिपब्लिकन नते दादासाहेब गायकवाड भुलले आणि बलाढ्य रिपब्लिकन पक्षाला आणि त्याच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला कायमचेच काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधून बसले. १९६७ साली काँग्रेस पक्षाबरोबर रिपब्लिकन पक्षाची युती झाली आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे एक सभापती पद, एखादी आमदारकी, एखादी खासदारकी एवढ्या मोबदल्यात समाजाची विक्री काँग्रेसला करण्याची पद्धत दादासाहेबांनी जी रुढ केली तीच रा.सू.गवई यांच्यापासून ते लढाऊ पँथर म्हणविणा-या रामदास आठवले यांच्यापर्यंत चालू आहे. या युतीमुळे रिपब्लिकन कार्यकर्त्याचा स्वाभिमानी बाणा व लढावू वृत्ती कायमची लयास गेली. एखाद्या कफल्लक पदासाठी काँग्रेस पुढा-यांच्या मागे लाचारपणे फिरण्याची गुलामी प्रवृत्ती त्याच्या नसानसात कायमची भिणली. हा सिरस्ता लढाऊ म्हणणा-या आठवले यांनीही २००९ पर्यंत तह्यात चालू ठेवला. २००९ मध्ये जेव्हा शिर्डीमधून लोकसभेची निवडणूक ते हरले तेव्हा काँग्रेसच्या नावाने शिमगा करुन त्यांनी असंगाशी संग अर्थात शिवसेनेशी युती केली. यामागे काँग्रेसला धडा शिकविणे आणि सेना-भाजपच्या मदतीने मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत वाटा मिळविणे, तसेच राज्यसभेवर जाणे, या गाजराच्या पुंगीमागे लागून त्यांनी शिवसेनेशी साथसंगत सुरु केली. सेना-भाजप-रिपाई महायुती असे ढोल बडवत त्यांनी पेपरबाजी - टीव्हीबाजी खूप केली. मात्र डोंगर पाखरून उंदीर मिळविला. आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाची महापालिकेत गेलेली लाज, राज्यसभेच्या लक्ताराने तरी झाकता येईल अशी भाबडी आशा उराशी बाळगून ते कालपर्यंत वाट पाहात बसले. मातोश्रीच्या म्हाता-या वाघाने डरकाळी फोडली आणि अनिल देसाईंच्या नावाची घोषणा केली, आणि पुन्हा एकदा रामदास आठवलेंचा लाचार पँथर शेपूट खाली घालून जागच्याजागी तळमळत बसला.
एवढी लाचारी कशासाठी ?
एवढी लाचारी कशासाठी ? का म्हणून रिपाईचे नेते याच्या त्याच्या दारात भिक मागत फिरत आहेत? आहो, तुमच्याकडे मोठी कुवत आणि प्रचंड ताकद आहे. पण या भिकमागू प्रवृत्तीमुळे तुमची तुम्हालाच जाणीव नाही. हा तुमचा दुबळेपणा आहे. एवढी मोठी बलाढ्य शक्ती तुमच्याकडे असतांना तुम्हाला याचे त्याचे दरवाजे झिजविण्याची काहीच गरज नाही. फक्त गरज आहे ती स्वतःचा अहंभाव आणि निरर्थक अभिमान गाडून टाकण्याची. माझा रोखठोक आणि परखड सवाल आहे की, मोतोश्रीवर जाण्यासाठी जशी तुम्हाला लाज वाटत नाही तेव्हा 'राजगृहा'वर जाण्याची लाज का वाटावी? आहो, सिद्धार्थ हॉस्टोल आणि राजगृह किंवा आजची कांदीवली व दादर-वडाळा एकत्र आले तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या मालकीचा होऊ शकतो! पण तुम्हाला दोघांनाही एकमेकांना अलिंगण देऊन खांद्यालाखांदा लावून उभे राहण्याची आवश्यकात आहे. ही तयारी तुमची असली पाहिजे. परंतू त्यासाठी आवश्यकता आहे ती अहंमपणा आणि अभिमान गाडून टाकण्याची !
दुस-याच्या दारात शिळे कुटके चविने खाईल पण घरच्या गरम पोळीला मात्र शिवणार नाही. हा निरर्थक अहंमपणा आणि अभिमान हाच आम्हाला शिळे तुकडे आणि गरम पोळी पचवू देत नाही. हीच आमची खरी कमतरता आहे. त्यामुळेच आजचा तरूण मनसे सारखा पर्याय निवडत आहे. ही मोठी धोक्याची घंटा आहे, याचे भान तुम्ही ठेवले पाहिजे.
आता पाच महापालिका स्वबळावर लढवून आमची ताकद दाखवून देऊ अशी वल्गना करुन काय होणार आहे ? जेव्हा महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही काहीच करु शकलो नाही तेव्हा या पाच महापालिकेत काय दिवे लावणार आहोत ? परंतू भडक आव्हाने देऊन पोकळ गर्जना करण्यापेक्षा आम्ही आजपर्यंत काहीच केले नाही. तेव्हा काळाची हाक ऐका, कोणताही अभिमान , अहंभाव नधरात 'राजगृहाच्या पितृतिर्थावर' जा ! दिलखुलासपणे दिलजमाई करुन पुढची निवडणूक बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार यांच्या कृपाछत्राखाली लढण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांच्या साथीने लढा आणि मग बघा, वाघ आणि रिंगमास्टर दोघेही कसे सुतासारखे सरळ होऊन तुमच्या दारी येतात ते ! पण तुम्हाला लाचारी पाहिजे की स्वाभिमान हे तुमचे तुम्हाला ठरवायचे आहे.
जर तुम्ही स्वाभिमान सोडून पूर्वीसारखीच लाचारी पत्करली तर मात्र समाजाने अगतिक न होता तुम्हाला वठणीवर आणण्यासाठी वर्ज निर्धार करावा. 'हा' बरा की 'तो' बरा अशी माथेफोड न करता, किंवा कोणताही घोळ न घालता खरा कोण, आणि कोणाची ध्येयं धोरणे समाजासाठी स्वाभिमानाची व समाजाच्या उपयोगाची आहेत हा निकष लावून एकाच नेतृत्वाला साथ द्यावी. असे केले तरच हे वठणीवर येतील. अन्यथा हा ही नको आणि तो ही नको या प्रमाणे,
तुला ना मला टाक कुत्र्याला! या उक्तीप्रमाणे समाजपुरुषाने वागू नये. ठाम निश्चय आणि दृढ निर्धार करुन सोने आणि पितळ यातील फरक ओळखून ख-या सोन्यालाच साथ द्यावी. तरच रिपब्लिकन पक्षाची दुर्दशा थांबेल, अन्यथा उद्या होत्याचे नव्हते होईल. तेव्हा आपल्या हातात काहीच राहाणार नाही.
बाळासाहेबांनी पुढाकार घेणे गरजेचे
बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आता पुढाकार घेऊन संपूर्ण समाजाला एका झेंड्याखाली आणावे आणि अकोला पॅटर्न नुसता अकोल्यापूरता मर्यादीत न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण शक्तिनिशी राबवावा. कारण संपूर्ण समाज आज तुमच्याकडे अपेक्षेने पाहात आहे. तुमची ध्येयं धोरणे, स्वाभिमानी विचार, खाजगीकरण-राखीव जागांबद्दलचे धोरण, शिक्षणक्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढण्याचे विचार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वांना सामावून घेणारे बहुजनवादी धोरण. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्यसरकारचा दुर्बल घटकासाठीचा व मागासवर्गीय समाजासाठी राखून ठेवलेला समाजकल्याणासाठीच्या राखीव निधीच्या वाटपाविषयीचे धोरण नक्कीच समाजाला उत्थानाकडे नेणारे आहे. परंतू या सर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. ही अंमलबजावणी करुन घ्यायची असेल तर, दबावशक्तीची गरजेची आहे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन एक प्रचंड शक्ती उभी करणे काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व दलित, उपेक्षित आणि सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठेपासून वंचित बहुजन समाज एकत्र करण्याची आज गरज आहे. बाळासाहेब आंबेडकर हे करु शकतात, याबद्दल माझ्या सारख्या कार्यकर्त्याला व तमाम समाजालासुद्धा विश्वास आहे. बाळासाहेबांनी जर हे केले आणि सर्व समाज एका शक्तीने एकजुटीने उभा केला तर, आज काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसेकडे इतकेच काय, सेना-भाजपकडे जाणारा आणि पैशांची व झटपट सत्तेची आस बाळगणारा तरुण पुन्हा आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित होऊ शकतो. आजच्या तरुणांना कमी कष्टात सत्ता आणि संपत्ती हवी आहे. त्यांची ही अपेक्षापूर्ती रिपब्लिकन पक्ष आणि तमाम आंबेडकरी चळवळीची दुर्दशा झाल्यामुळे पूर्ण होत नाही. या सत्ता-संपत्तीच्या लालसेपाई ही तरुणाई भरकटत आहे. त्यांच्यासाठी जर आपण समर्थ पर्याय निर्माण कुरुन दिल्यास तो घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. परंतू त्यासाठी एक प्रचंड शक्ती निर्माण करण्याची गरज आहे. काँग्रेस किंवा सेना-भाजप-मनसेच्या मृगजळामागे न धावता आपणच आपली मजबूत शक्ती उभी करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भवितव्य अंधकारमय आहे. म्हणून एका शायराने म्हटले आहे, तीच आमची अवस्था होईल.
गर न समजोगे तो मीट जाओगे ! ए दास्तावालो !
तुम्हारी दास्ता तक न होगी दास्तानोमें !!

अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे
09545078631
09420316197
( साभार महाराष्ट्र टाईम्स औरंगाबाद)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...