तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य
ज्ञानबा-तुकाराम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम या चित्रपटाच्या गीत लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुकाराम कळण्यास मदत झाली. तुकाराम हे प्रकरण समजून घेणं तसं फार अवघड आहे. ते कवींचेही कवी किंबहूना कवींचे बाप आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटासाठी काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यातील कवीचा गौरव आहे. कारण चारशे वर्षांनंतरही त्यांच्या अभंगासारखी एखादी कविता आम्हाला लिहिता येत नाही, अशी प्रांजळ कबुली दिली आहे 'तुकाराम' या आगामी चित्रपटाचे गीतकार दासू वैद्य यांनी.
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यानिमित्ताने दिव्य मराठी डॉट कॉमने दासू वैद्य यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी चित्रपटाच्या निर्मितीपासून गीत लेखनाचा अनुभव आणि तुकाराम या विषयाने झपाटलेल्या टीम बद्दल ते भरभरून बोलले.
गप्पांना सुरुवात झाली ती चित्रपटाच्या नावापासूनच. चित्रपटाच्या नावात फक्त तुकाराम एवढाच उल्लेख का आहे. म्हणजे संबंध महाराष्ट्रला ते संत तुकाराम म्हणून परिचीत असताना केवळ तुकाराम एवढेच नाव असण्याचे काही खास कारण?
तुकाराम हे संत होते किंबहुना ते महान संत आहेत, यात आमचे दुमत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, या चित्रपटातून तुकारामांचा जीवनपट उलगडत जातो. त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर त्यांनी काय भूमिका घेतली, हे सांगण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. त्यांच्या बालपणापासून संत पदापर्यंत पोचण्याचा प्रवास, त्यासोबतच नंतरच्या काळातील त्यांचे अभंग आणि तत्वज्ञान हा संपूर्ण काळ यात मांडण्यात आला आहे. त्यामुळे केवळ संत तुकाराम एवढाच सीमित हा विषय नाही. तर त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास यात आहे.
या चित्रपटाच्या पटकथेविषयी काय सांगाल?
चित्रपटाची पटकथा हाच चित्रपटाचा आत्मा असतो. प्रशांत दळवी आणि अजित दळवी यांनी अतिशय समृद्ध आणि मजबूत पटकथा लिहिली आहे. ५-६ वर्षांच्या अभ्यासातून ही पटकथा तयार झाली आहे आणि पटकथाच एवढी सुंदर असल्यामुळे त्यातूनच मला गाणी उलगडत गेली.
या चित्रपटात तुकारामांचे अभंग आणि तुमची गीते असा योग जुळून आला आहे, यांचा ताळमेळ कसा साधला?
मी मुळात कवी असल्यामुळे माझ्यातील कवी जपत मी गीत लेखन करत असतो. चंद्रकांत कुलकर्णी आणि मी अनेक वर्षांपासूनसोबत आहोत. तरीही, तुकाराम या चित्रपटासाठी गीत लेखनाबद्दल मला विचारणा झाली तेव्हा, ती माझ्यासाठी जेवढी आनंदाची गोष्ट होती. त्यासोबतच मोठी जोखीम आणि जबाबदारी देखील होती. चित्रपटातील दहा गीतांपैकी चार तुकारामांचे अभंग आहेत तर चार गीतांचे लेखन मी केले आहे. ते करत असताना तुकाराम मला अधिकाधिक उलगडत गेले. चारशे वर्षांपूर्वी तुकारामांनी नाशिकच्या कुंभमेळ्याला 'व्यर्थ सायास' म्हटले आहे. त्या काळात हा माणूस असं कसं म्हणू शकला. हे धारिष्ठ्य त्यांच्यात कुठून आले, असे प्रश्न पडत होते. त्याबरोबरच ते विठ्ठलाचे ही भक्त आहेत. यातून त्यांची व्याप्ती आपल्याला समजते. हाच तुकारामांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू समोर ठेवून गाणी लिहायची होती.
यातील एक गाणं म्हणजे, माझ्या तुर्तास या कवितासंग्रहामधील कविता आहे. दुष्काळाची परिस्थिती त्या गीतातून मांडण्यात आली आहे. हरिहरन यांनी हे गीत गायले असून, अशोक पत्की यांच्या धीरगंभीर संगीतामुळे हे गाणे अचूक भाष्य करते.
अशोक पत्की आणि अवधुत गुप्ते या संगीतकारद्वयींसोबत एकाच वेळी काम करतांनाचा अनुभव कसा होता?
अशोक पत्की यांचे संगीत हे मेलिडियस, गंभीर अशा प्रकारचे आहे तर अवधुतचा स्वभाव आणि संगीत हे खेळकर, खोडकर, यंग जनरेशनला भिडणारे आहे. त्यामुळे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींनी या दोघांना एकत्र आणले आहे. तुकारामांचे बालपण ते तरुणपणाच्या काळासाठी अवधुतचे संगीत आहे. कारण तुकाराम हे काही लहानपणापासून गंभीर स्वभावाचे नाहीत. ते देखील सर्वसामान्य मुलांप्रमाणे खेळत होते. त्यानंतर तरुण तुकारामांनी वडिलांनंतर उद्योग सांभाळला. इथपर्यंत अवधुतचे संगीत आहे. यानंतर येतात ते अशोक पत्की. त्यांच्या संगीताचा जो बाज आहे तो या चित्रपटाच्या प्रत्येक सिचूएशनला समरस होणारा आहे.
संत तुकाराम हे विद्रोही संत. त्या काळापेक्षा कितीतरी पुढच्या पिढीबद्दल त्यांनी भा्ष्य केले आहे. त्यांचा हा स्वभाव गीतातून व्यक्त होतो का?
भेदणारे मुळ, आशयाचे कूळ
भाषेचा कल्लोळ, तुकाराम.
या ज्या काही ओळी आहेत त्या तुकारामांचा स्वभाव व्यक्त करणा-याच आहेत. एका प्रतिकाच्या रुपाने त्यांच्यातील विद्रोहीपणही गीतातून डोकावते.
या चित्रपटातील तुमच्या आवडीचे गाणे कोणते?
गाणीतर तशी सगळीच आवडती असतात. मात्र, काहींबद्दल सॉफ्ट कॉर्नर हा नक्कीच असतो. तसा गन्या, मन्या, तुका या गीताबद्दल आहे. अवधुतने या गीताला चाल लावली आहे. तुकारामांच्या बालपणाच्या प्रसंगाबद्दल, त्या काळातील ११ खेळ या गाण्यातून मांडण्यात आले आहेत. खेड्यातील मुलं ही एखादा खेळ खेळायचाय म्हणून घराबाहेर पडत नाहीत तर, ती एक खेळ झाला की दुसरा, मग तिसरा. त्यानंतर थकले की, पोहायला जातील. मग सुरपारंब्या खेळतील, झाडांवरील मोहळ काढतील. अशी खेळांची साखळी या गाण्यात गुंफण्यात आली आहे. अवधुतचंही हे आवडतं गाणं आहे. त्याचबरोबर या गाण्यात कबीराचा दोहा देखील आहे. मुलं खेळत असतात. तिथून एक फकीर जात असतो, तो हा दोहा म्हणत असतो. असा तो प्रसंग आहे.
तुम्हाला या चित्रपटातून तुकाराम कसे भेटतात?
जगण्याचा पाया, चालण्याचे बळ
विचाराची कळ, तुकाराम
शब्दांचे इमान, अक्षरांचे रान
अभंगाचे पान, तुकाराम
भेदणारे मुळ, आशयाचे कुळ
भाषेचा कल्लोळ, तुकाराम
पुन्हा उगवतो, खोल पसरतो
सांगून उरतो, तुकाराम
साभार दिव्य मराठी वेबसाईट.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा