आई असल्यावर जाणवत नाही
एकटाच असलो की, मनावर अनाहूत काजळी पसरते. मग चार भिंतीचं सुरक्षा कवच असलेल्या घरात, जर्नालिझमच्या हॉलमध्ये, बुद्धलेणीच्या पायथ्याशी, पिंपळाच्या जाळीदार सावलीत मी कुठेही असलो तरी, माझ्या एकटेपणाला सोबत करायला 'आई' हळुवार पावलाने येते. कधी-कधी माणसांच्या मेळ्यात, नात्यांच्या गोतावळ्यात, माझ्या एकाकी मनाची आई सोबती होते. एकटेपणाच्या गर्तेतून आई माझा उजवा हात हाती धरून, डावा हात पाठीवर फिरवून येणा-या प्रत्येक संकटाशी धैर्याने सामोरे जाणाचे बळ देते. त्यावेळी ती खूप काही सांगते. तिला लाभलेल्या छोट्याशा आयुष्यातील ब-या-वाईट अनुभवाचं संचित आई माझ्या पुढयात ठेवेत...
कोजागिरीच्या पिठूर चांदण्यात आईची गोरी कांती अधिकच उजळून निघायची. सर्वांसाठी द्रवणारं तिचं ह्रदय, आजही कळत नाही तिच्या ह्रदयाचा थांग. कुठून साठवलं होतं तिनं एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचं तिच्याशी आपलेपणाचं नातं.
'उपाशीपोटी पाण्याच्या घोटी सपान पडतं
आभाळ झडतं ग आभाळ झडतं'
अशी मनाची अवस्था झाली की, मनाच्याही नकळत मनभर व्यापून राहाते आई; आणि म्हणूनच प्रत्येक सुख-दुःखात मनाला उभारी देणारी असते तिची सोबत, तिची आठवण. आईचा तिच्या लेकरांसाठी असलेला वात्सल्याचा झरा कधीच अटत नाही. दिसामाजी बाळासाठी आईचं प्रेमाचं सिंचन अधिकाधिक वाढतच असतं.
मला आठवतं, एक शेजारीण आईला म्हणाली, 'किती दिवस तुम्ही मुलाला बाळाच म्हणणार आहात?' तेव्हा आईचं उत्तर होतं, 'तो कितीही मोठा झाला तरी माझ्यासाठी बाळच राहाणार आहे.' आज या शब्दातील गहिरेपणा, मार्दव, सच्चाई कळायला लागते व मन मनोमन कबूल करतं की, आईचा बाळ होऊनच आयुष्यभर राहावं. पण नियतीला ते कदाचित मान्य नसावं. म्हणूनच...
पण आईच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. आजही एकांतात रुतलेल्या माझ्या मनाला, मला तिचाच हात धरुन वर आणतो. प्रकाशाच्या वाटेवर नेतो.
'आई असल्यावर जाणवत नाही
नसल्यावर नाही म्हणवत नाही'
कारण, आई असते मनात मन भरून राहिलेली आणि घर भरून सुद्धा.
आई नसल्यावर नाही म्हणवत नाही.
साभार- दैनिक लोकमत युवामंच
(आज माझ्या आईचा - आशाबाई रमेश खंडागळे १६ वा स्मृतीदिवस आहे. त्यानिमीत्त हा मीच माझ्याशी साधलेला संवाद. हे स्फूट की, ललित माहित नाही, पण जेव्हा मी हे लिहिले(२००४ किंवा २००५ मध्ये), तेव्हा मी पत्रकारितेचा विद्यार्थी आणि लोकमत युवामंचचा विद्यापीठ प्रतिनिधी होतो. त्याकाळातील माझ्या लिखाणाला युवामंच हे हक्काचे व्यासपीठ होते. त्यांचे विशेष आभार, त्या प्रोत्साहनामुळेच मला माझ्या मनातील भावना कागदावर उतरविण्याचे धाडस आले. )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा