आज रात्री मस्त पैकी घरावर जाऊन थंडीत - गार हवेत सिगरेट ओढत कोक प्यावा वाटत आहे... घरी जाई पर्यंत दुकानं उघडी राहीली तर मनातला बेत नक्की पूर्ण करणार... वर्ष संपायला एकच दिवस उरला आहे आणि मला सुटी देखील आहे, त्यामुळे रात्री कितीही वेळ जागरण केले तरी उद्या वेळेवर उठण्याचे कंपल्शन नाही. हे काय सांगत बसलो असे जर वाटत असेल तर, मनातलं सांगण्यासाठीच तर ब्लॉग असतो. इथं नाही व्यक्त व्हायचं तर मग काय तयखाण्यात...
आज 'जयभीम' या घोषणेला 75 वर्ष पूर्ण झाली. मराठवाड्याचे सुपूत्र भाऊसाहेब मोरे यांनी ३० डिसेंबर १९३८ साली तत्कालिन निजाम राजवटीच्या सीमेवरील गावात - कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित केली होती. ही सभा निजाम राजवटीविरोधात आणि दलित, शोषित, शेतमजुरांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्या काळात मराठवाड्यातील दलितांचे जोरजबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. त्यांना मुसलमान केले जात होते. या सर्वांच्या विरोधात सुशिक्षीत भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन केले होते. भाऊसाहेब तेव्हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे मराठवाडा प्रांताध्यक्ष होते. याच परिषदेत भाऊसाहेबांनी जोहार मायबाप हे गुलामीचे प्रतिक असलेले अभिवादन नाकारण्याचे आणि फक्त आणि फक्त जयभीमचाच नारा देण्याचे - घोषणा देण्याचे - एकमेकांना भेटताना अभिवादनासाठी उच्चारला जाणारा शब्द फक्त जयभीमच असले असे आवाहन केले. ते आजतागायत अव्याहत सुरु आहे. बाबासाहेबांनी गुलामीत खितपत पडलेल्या माणसाला स्वाभिमानाने जगण्याचे धाडस दिले - मग याच महामानवाचा जयजयकार का नाही करायचा, असाही कदाचित भाऊसाहेबांचा व्होरा असले, नव्हे तो तसाच असला पाहिजे.
जयभीमने महाराष्ट्रात बौद्धांना वेगळी ओळख दिली. केवळ बौद्धांनाच नाही तर परिवर्तनवादी चळवळीचा हा अभिवादनाचा संस्कार बनला. जयभीम के नारे पे खून बहा तो बहने दो, हा बाबासाहेबांच्या नावासाठी मर-मिटण्याचा आतल्या आणि बाहेरच्या आवाजाचे उत्कट प्रतिबिंब जयभीम आहे. भर रस्त्यात उभे राहून - गल्लीच्या कोप-यावर किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दोघांनी एकमेकांना कडक जयभीम ठोकला तर चार-सहा माना वळल्याच पाहिजे. ही आपल्या अस्मितेची - अस्तित्वाची आज ओळख झाली आहे. पण 75 वर्षानंतरही माना का वळतात हा खरा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी जर फक्त एका समाजासाठी काम केलेल नाही, त्यांनी संपूर्ण सर्वहारा वर्ग, ऐकूणच मागासलेला समाज, या देशात गुलामांपेक्षाही हिन वागणूक मिळत असलेल्या महिलांसाठी, त्यांच्या आत्मसन्मान आणि उत्थानासाठी जीवन वेचले आहे. असे असतानाही कपाळावर आढी न येवू देता सर्वांनीच बाबासाहेबांचा जयजयकार करण्यात इतरांची जीभ का अडखळते... केव्हा बदलणार हा तुझ्या माझ्यातील फरक. माझे काही मित्र आहेत, जे बौद्ध नाही, मागासलेल्या समाजातील नाही आणि त्यांना जयभीम म्हणण्यातही कोणतीही अडचण नाही. आणि मलाही त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे अभिवादन करण्यात गैर वाटत नाही.. पण मेंदू - मन - जिव्हेला सवय लागली आहे कोणीही भेटल्यावर जयभीम म्हणण्याची...
जयभीम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा