मुख्य सामग्रीवर वगळा

'आपला' माणूस सत्तेपासून कोरडा का?

महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आणि दिवळीला सुरवात झाली आहे.या दोन्ही सणांच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावातील आई, वडिल आणि मुलगा या उमेदीच्या वयातील कुटुंबाची हत्या करून त्यांचे तुकडे करून विहीरीत टाकण्यात आले. आता राज्यात कोणाचेही सरकार नसल्यामुळे कोणी मंत्री फिरकणार नाही, निवडणुका संपल्यामुळे आमदार आणि काल आमदार होण्याच्या शर्यतीतीलही फिरकणार नाहीत. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर तेवढे अत्याचार पर्यटन करुन येतील. पुढे काय?

नगरमध्ये याआधीही काही महिन्यांपूर्वी अशाच दोन घटना झाल्या ही, तिसरी! एवढेच काय ते येथील पोलिस प्रशासनासाठी या घटनचे महत्त्व. सहा महिन्यांपूर्वी नितीन आगे या तरुणाचे हत्याकांड झाले होते. त्याच्या आरोपींचे काय झाले हे नंतर दलित नेत्यांनी प्रशासन आणि राज्यकर्त्यांना विचारले का? तर याचे उत्तर नाही असेच आहे.काल हत्याकांड झालेल्या सुनील जयश्री संजय जाधव या मुलगा - आई - वडिलांच्या हत्याकांडाचे वेगळे काय होणार. याला तुम्ही आणि मी जबाबदार नाही का? नगरमध्येच का हत्या होत आहेत असा माझा प्रश्न नाही, तर दलितांवरच ही वेळ का येत आहे?

नगरमध्ये पाणी आणि सहकाराने समृद्ध झालेले दलितेत्तर संरजामशाहीने वागत नाहीत का?

पोलिस आणि प्रशासनाची त्यांनी भीती वाटत नाही का? की त्यांच्या आशीर्वादानेच हे सुरु आहे?

सहकाराने समृद्ध झालेल्या या जिल्ह्यात उठता-बसता फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणार्‍या पक्षाचेच आमदार आहेत. .यांच्या मुखी ह्या तीन महानुभावांच्या नावाला काही अर्थ आहे का?

असे, का? का? मनात खूप साचले आहेत. त्याला एकच उत्तर मला सापडत आहे. ते म्हणजे संघटन शक्तीचा झालेला क्षय, भरून यावा. तुम्ही रस्त्याने चालले की, लोकांना तुमची जरब बसावी. नको रे बाबा, यांच्याशी पंगा नको. याचा अर्थ दलितांची दहशत निर्माण व्हावी असा मुळीच नाही. दलितांच्या संघटन शक्तीची भीती वाटली पाहिजे. यांच्याकडे डोळे वर करुन पाहिले तरी आपल्या त्याचे उत्तर द्यावे लागले, अशी अनामिक भीती असली पाहिजे.

आपली संघटना मजबूत नसल्याने राजकीय ताकद नाही, आणि राजकीय ताकद नसल्याने आपला कोणावर वचक नाही. असे हे दुष्टचक्र निर्माण झाले आहे. ते भेदण्याची संधी 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने आली होती. पण आपले नेते वाटलेले, संघटन जागोजागी फाटलेले. त्यांना चिंता फक्त त्यांच्या खासदारकीची आणि आमदारकीची. त्या राज ठाकरेने भर सभेत तुमची टोपी उडवली. 'एवढ्या वर्षात यांना स्वतःचे चिन्ह नाही मिळवता आले', हो नाही, मिळवता आले. पण येणार्‍या निवडणुकीत ते मिळवून दाखवू, असे म्हणण्याची धमक रामदास आठवलेंनी दाखवली नाही. (आता त्या राज ठाकरेंच्या मनसेचे इंजिनही गोठण्याची शक्यता आहे.) राज ठाकरेंनी रामदास आठवलेंचे नाव घेतले म्हणून हे बोल फक्त त्यांनाच लागू होतात असे नाही, तर राज्यातील सर्वच  रिपाईच्या लोकांना लागू होतात. पण ते कोणाच्या जीवाला लागत नाही, याचेच दुःख आहे. 'मेरी करोगे नक्कल तो मै कर दूंगा तुम्हारा टक्कल' ही आमचे नेते म्हणवणार्‍यांची अक्कल !

दुसरे एक नेते जे स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टीकवून असलेले नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर. पण त्यांचे राजकारण सर्वसामान्य दलितांपर्यंत कधी पोहोचतच नाही. जो काल त्यांच्या बॅनरखाली निवडून आला तो उद्या त्यांच्यापासून दूर झालाच म्हणून समजा. हा यांचा इतिहास आणि वर्तमानही. संपूर्ण राज्यातून यांच्या भारिप बहुजन महासंघाचा एक आमदार निवडून आला. या नेत्याला सर्वसामान्य दलित कुटुंबाशी काही देणं-घेणं आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी यांची कार्यशैली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक दलित समाज हा झोपडपट्ट्यातून राहातो, पण एकाही झोपडपट्टीत यांच्या पक्षाची पाटी दिसत नाही. यांच्या भाषणाला गर्दी देखील आरक्षणाच्या लाभाने सधन झालेल्या आणि किमान शिक्षण घेऊन घरात चार-दोन पुस्तके बाळगून असलेल्या कागदी घोड्यांची. ज्यांचा समाजासाठी कवडीचाही उपयोग होत नाही.

बाकीचे नेते आणि त्यांचे पक्ष म्हणजे जिल्हा लिमीटेड कंपन्याच. त्याही एवढ्या फोफावल्या की महाराष्ट्रातील जिल्हे कमी पडतील पण संघटना आणि पक्षांची यादी संपणार नाही. एवढी शकले झालेला हा फक्त बौद्ध समाज. यात चांभार, मातंग आणि इतर दलित, आदिवासींचाही समावेश नाही. ते वेगळच अख्यान आहे. आपल्या स्वतंत्र चुलीमुळे समाजाची वाताहत होत आहे, हे या नेत्यांच्या गावीही नसेल का? समाजाला नेतृत्वाची किती गरज असते हे मोदीने सदोहारण दाखवून दिले आहे. तरीही आपण कोणा एकाचे नेतृत्व मानायला तयार नाही.

हैदराबादच्या औवेसींनी महाराष्ट्रातील मुस्लिम बहूल भाग हेरून तयारी केली आणि आज त्यांचे दोन आमदार विधानसभेत जाऊन धडकले आहे. औरंगाबाद पूर्व आणि सुशीलकुमार शिंदेंची कन्या प्रणितीच्या विरोधात सोलापूर मध्यमधून एमआयएमचे उमेदवार दोन नंबरवर राहिले आहेत. औरंगाबाद पूर्व मध्ये मुस्लिम मते कमी पडली म्हणून नाही तर ही जागाही त्यांची निघाली होती. असा कडवटपणा आपल्यात कधी येणार. ते औवेसी त्यांच्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच विचार सांगतात, यापेक्षा वेगळं काही सांगत नाही. आपल्या बापाचे गुणगाण गाऊन जर ते लोक एकत्र येत असतील आणि ताकद दाखवून देत असतील तर आपण का नाही ? का आपल्या धमन्यांमध्ये आता निळ रक्त उरलं नाही?

नेत्यांची अख्खी फळीच्या फळी, बुद्ध-फुले-शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा ज्ञानाचा झरा आपल्याकडे असताना, आपला माणूस सत्तेपासून कोरडा का राहात आहे? जर सगळे बौद्ध एक झाले तर चांभार आणि मातंग व साळी-माळी-कोळी-आदिवासी-ओबीसी नक्कीच आपल्याकडे धावत येतील. मग कोणाची बिशाद आहे, 'आपल्या' माणसाकडे काणा डोळा करुन पाहाण्याची. हा भाबडा आशावाद नाही, हे जरा काळजीपूर्वक लक्षात घ्यावं.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...