लखनऊ - हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठाचा स्कॉलर रोहित वेमुला याच्या आत्महत्येचा उल्लेख करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी भावूक झाले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात भाषणासाठी पंतप्रधान उभे राहिले असता काही विद्यार्थ्यांनी मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी 'मोदी मुर्दाबाद', 'मोदी गो बॅक'च्या घोषणा दिल्या. त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. (थांबा. त्यांना बोलू द्या. ते काय म्हणतात हे मला ऐकायचे आहे. त्यासाठीच मी येथे आलो. त्यांना बसू द्या. असे मोदी म्हणाले नाही, ते तसे म्हणाले असते तर मग 40 साहित्यिकांना साहित्य अकादमी परत करण्याची गरजच काय होती आणि रोहितचाही जीव कशाला गेल असता.)
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएच.डी करत असलेला दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्यासह चार विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निलंबित केले होते. एवढेच नाही, तर या पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश बंदी होती, हा नव्या मनुचा सामाजिक बहिष्कार नाही तर काय होता. त्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करुनही त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले नाही. त्यानंतर रविवारी (17 जानेवारी) रोहितने विद्यापीठ वसतिगृहातील एका रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी त्याने पाच पानी पत्र लिहिले. त्यात त्याने त्याच्या भविष्यातील योजनांचा उल्लेख केला. एक विज्ञान लेखक होण्याची त्याची इच्छा होती. मात्र, 'आता मी फक्त हे अशा प्रकारचे पहिले आणि अखेरचे पत्र लिहित आहे. प्रकाशयात्री होण्याच्या दिशेने प्रवास करतो, जयभीम. ...माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका.' असे लिहून त्याने या आधुनिक मनुंना बुद्धांची शांतताच अधिक गरजेची असल्याचा संदेश दिला. त्याग आणि क्षमा हेच मोठे अस्त्र असल्याचे रोहितने अधोरेखित केले.
रोहित आत्महत्या प्रकरणात केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय, कुलगुरु अप्पा राव आणि भाजप प्रणित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता सुशीलकुमार यांच्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील दत्तात्रेय आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी (ज्यांनी खोटी तथ्ये मांडून आपला निर्णय योग्य असल्याचे दाखवण्याचा बावळट प्रयत्न केला. अखेर खोट्या डिग्र्या घेणाऱ्या बाईकडून अपेक्षाती कोणती असणार?) यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी संघटनांसह विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात गेलेल्या मोदींना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
भाषणाच्या सुरुवातीलाच मुर्दाबाद आणि गो बॅकच्या घोषणा झाल्याने वाक्-चतूर मोदींना अखेरपर्यंत सूर गवसला नाही. मात्र अखेरीस त्यांनी डोळ्यात आसवे आणत, 'माँ भारतीने अपना एक लाल खोया है' म्हणत वेळ मारुन नेली. रोहितला आत्महत्येला मजबूर व्हावे लागले, असे ते म्हणाले. पण त्याला आत्महत्या का करावी लागली याचा शोध घेणार, हे सांगण्यास मोदी सराईतपणे विसरले. त्याच्या मारेकऱ्यांना एक मिनीट मंत्रिमंडळात ठेवणार नाही, असे म्हणण्यास त्यांची जीभ धजावण्याची शक्यताच नव्हती पण मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना मी समजू शकतो. माझ्या शासनात यापुढे असे होणार नाही, अशी ग्वाहीही ते देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांची आसवे ही मगरीची होती, आणि त्यांचे प्रेम पुतणा मावशीचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा