पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या राज्यातून जातो त्या उत्तरप्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा या आठवड्यात होईल अशी आपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाला बिहारमधून मोठी आपटी मिळाली त्याआधी दिल्लीने दूर केले आहे. तरीही स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकीतील आकड्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शहा हुरळून गेले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिल्लीत प्रेस घेऊन गल्लीतील विजयाची पिपाणी वाजवली. (आपल्या विजयाचे श्रेय कोणी कसे घ्यावे, कुठे घ्यावे याचे काही नियम नाही. ठोकताळे नाही. संकेत आहेत ते पाळायचेच नाही हेच भाजपने ठरविलेले आहे त्यामुळे त्यावर न बोलले बरे !)
सांगतिले काळेधन-दहशतवाद-बनावट नोटा, समोर आणला कॅशलेसचा बेसलेस मुद्दा :
आज 500च्या जुन्या नोटा आणि 1000 रुपयांची बाद केलेली नोट बँकेत भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ज्या प्रमाणे मोदी नोटा बंदकरण्यासाठी देशाला उद्देशून बोलले तसेच ते उद्या बोलणार आहे. नोटा बंद केल्या त्या दिवशी त्यांनी राणा भीमदेवी थाटात काळापैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवाद यांना पायबंद घालण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे एक नाही तर 27-28 वेळा उच्चस्वरात सांगितले होते. घोषणेला सात दिवस होत नाही तर त्यांनी पलटी खाल्ली आणि कॅशलेसचा बेसलेस मुद्दा पुढे केला. मला सांगा तुम्ही बँकेत अर्ध्यातासाठी गेल्यानंतर किमान 3 ते 5 जण असे भेटतात जे आमची विथड्रॉल स्लीप, डिपॉझिट स्लीप भरून देण्याची विनंती करतात. अशा देशात कॅशलेस हा बेसलेस मुद्दाही लोक डोक्यावर घेत आहे. बरं त्यात जनतेचे किती मोठे नुकसान आहे. मी कार्ड पेमेंट केल्यानंतर माझी सर्व कुंडली त्या व्यक्तीच्या सर्व्हराल पोहोचते. म्हणजे माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे ते हनन आहे. दुसरे मी माझा पैसा कोणत्या माध्यमातून द्यावा हा सर्वाधिकार माझा आहे, तो हिरावून घेण्याचे षडयंत्र आहे. तिसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सध्या जाहीर केले आहे की डेबिट-क्रेडिट कार्डने काही ठराविक रकमेपर्यंत पेमेंट करणाऱ्यांना सेवा शुल्क (2.5%) आकारला जाणार नाही. म्हणजे काही दिवसांनी तुमच्या प्रत्येक ट्राझांक्शनवर तुमची इच्छा नसताना 2.5% कर बँकेला किंवा ती सेवा देणाऱ्या संस्थेला द्यावा लागेल. मी माझ्या कमाईचे पैसे त्रयस्थ व्यक्तीला का म्हणून द्यावे ? याचे उत्तर देशातील अर्थतज्ज्ञ पंतप्रधान देणार आहेत का ? दुसरे असे की एखादी व्यक्ती काय खरेदी करते, ही त्या व्यक्तीची खासगी बाब झाली. ती कार्ड खरेदीने जगजाहीर होणार आहे. हा व्यक्तीचा खासगी बाब जगजाहीर करण्याचा उपद्व्याप कशासाठी ?
90 टक्के रोकड बँकेत जमा मग काळा पैसा कोणता ?
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांनी दुरदर्शनवर भाषण करुन 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून कागज के तुकडे होतील असे जाहीर केले तेव्हा या किंमतीच्या 15.4 लाख हजार कोटी मुल्याच्या नोटा बाजारात होत्या. आज या नोटा बँकेत भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत 14 लाख हजार कोटी म्हणजेच तब्बल 90 टक्के रोकड बँकांमध्ये जमा झाली आहे. आता प्रश्न उरतो की मग काळा पैसा कुठे गेला ?
नोटबंदी बुमरँग होणार ?
नरेंद्र मोदी हे प्रचंड महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना सर्वकाही करायचे आहे आणि विशेष म्हणजे सर्वकाही त्यांना एकट्यालाच करायला आवडते. हे त्यांच्या नोटबंदीवरुन देशाने अनुभवले आहे. मोदींना आणि भाजपला केवळ 2014 मध्येच सत्ता पाहिजे होती आणि फक्त 2019 मध्येच सत्ता पाहिजे असेही त्यांचे छोटे उद्दीष्ट नाही. त्यांना त्याही पुढे 2024, 2029 पर्यंतची सत्ता हवी आहे. मोदी लोकसभेची निवडणूक त्यांचे गृहराज्य गुजरातमधील बडोद्यातून लढले होते आणि दुसरा मतदारसंघ त्यांनी निवडला होता पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या राज्यातून जातो तो उत्तरप्रदेशातील वाराणसी. (पुनरावृत्ती होते पण टाळणेही शक्य नाही. मोदी जेव्हा एका भाषणात 27-28 वेळा काळेधन उच्चारतात तेव्हा मला एवढी सवलत तर मिळालीच पाहिजे.) बडोद्यातील विजयानंतरच्या पहिल्या भाषणात मोदी म्हणाले होते, 'आज देशातील 3 ते 5 वर्षांची मुलेही मोदी-मोदी करत आहे. त्यामुळे आता तुम्ही पुढची 25 वर्षे चिंता करु नका. आपला मतदार आजच तयार झाला आहे.' हे वाक्य हसण्यावर नेण्यासारखे नाही, हे तेव्हा कळेल जेव्हा तुम्हाला माहित पडेल की मोदींनी एक अहवाल 2028 मध्ये मागितलेला आहे. 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीच्या तयारीचा अहवाल मला 2028 मध्ये सादर करा असा आदेश मोदींनी दिलेला आहे. म्हणजे त्यांना अतिव आत्मवविश्वास आहे की 2036 चे ऑलिम्पिक आपल्याच छत्रछायेत होईल.
नोटबंदीपर्यंत मोदी पॉलिटिकली करेक्ट वाटत होते. कारण त्यांच्या पक्षातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतीलच नाही तर मंत्रीही वाचाळवीर असताना मोदींची जीभ कधी घसरली नाही. एवेढेच नाही तर मोदींनी वाचाळवीरांना कधीनवत का होईना दट्ट्या दिला होता, त्यांचे कान उपटले होते. गेल्या आठवड्यातील गुरुवारी मात्र मोदी पक्षातील कनिष्ठ नेत्यासारखे वाहवत गेले. देशात लोकशाही असेपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही पक्ष असतील. मोदींना मात्र देशात एकमेव पक्ष हवा आहे. तोही फक्त सत्ताधारीच. पंतप्रधानांनी त्यांच्या उपऱ्या लोकसभा मतदारसंघातील - वाराणसीतील सभेत संसदेतील विरोधीपक्षाची तुलना पाकिस्तानी घुसखोरांशी- पाक सैनिकांशी केली. म्हणजे जे कोणी सत्ताधाऱ्यांविरोधात बोलेल ते मग पाकिस्तानी किंवा देशद्रोही. तसेचही नोटबंदीचा ज्यांना त्रास होत आहे आणि त्यांनी त्याची वाच्यता केली तर लगेच भक्त त्यांना तुम्हाला देशासाठी एवढेही सहन करता येत नाही का, असे सुनावत आहे. तुम्ही जर भक्त नसाल तर याचा अनुभव नक्की घेतला असेल.
भक्त नसलेल्या अर्थतज्ज्ञांचे मत आहे की नोटबंदीचे परिणाम हे आज, उद्या किंवा पुढील 15 - 20 दिवसांमध्येही जाणवणार नाहीत. याचे दुष्परिणाम जाणवायला सुरुवात होईल पुढील सहा महिन्यांनी. तेही समाजातील सर्वात खालच्या थरातून याची झळ वरपर्यंत येण्यास नक्कीच वेळ लागणार आहे. हातावर पोट असणाऱ्यांना पुढील सहा महिन्यांनी रोजगारासाठी वणवण भटकावे लागेल. असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या हातांना काम राहाणार नाही. सामान्यांची स्मृती अतिशय कमजोर असते, त्यामुळे तेव्हा हे सर्व का होत आहे हे लोकांना आठवणारही नाही.
आता एवढं सगळं वाईट होणार असेल तर शुभेच्छा देऊ कशाच्या ? तरीही बुद्धाचा अनुयायी असल्याने परिवर्तनावर अढळ विश्वास आहे. या परिवर्तनासाठी शुभेच्छा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा