मुख्य सामग्रीवर वगळा

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे.

कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानगरी पंचगंगेच्या पाण्याने ओतप्रोत होत होती. दुसरीकडे सांगलीमध्ये कृष्णानदीची पातळी वेगाने वाढत होती. बैठी घरं पाण्याखाली तर बहुमजली इमारतींचा पहिला मजला पाण्यात बुडून गेलेला. वीज, दुरसंचार यंत्रणा निकामी झालेली. पेट्रोल, दुधही मिळणे मुश्किल होऊन बसले. अशात नौदलाचे एक विमान आणि एनडीआरएफची टीम गोव्यातून कोल्हापूरला आली. जिथे आभाळच फाटले आहे तिथे या तोकड्या प्रयत्नांने काय वाचवले जाणार होते?


मतांच्या जोगव्यासाठी दारोदार भटकणाऱ्या राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला ही आपदा - महाप्रलय लक्षातच आला नाही. सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ येथे ८ ऑगस्ट रोजी सकाळी एक बोट उलटली. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कळाले की बोट उलटून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बातमी टीव्ही स्क्रिनवर झळकायला लागली तेव्हा राज्यकर्ते आणि प्रशासन खडबडून जागे झाले.कोल्हापूरपेक्षा सांगलीत कृष्णेने घातलेले थैमान  मोठे  आहे हे नऊ निष्पाप जीव गेल्यानंतर 'निरो'च्या लक्षात आले. गुरुवारची सायंकाळ होताहोता ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत गेला. या दुर्घटनेची विदारकता मृत आजीच्या कुशीत पहुडलेल्या निष्पाप बालिकेच्या कलेवराने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवली. ब्रम्हनाळ दुर्घटनेनंतर राज्यकर्ते, विरोधीपक्ष, प्रशासन, सामाजिक संस्था, संघटना, प७ यांनी सांगली, कोल्हापूर, सातारची विचारपूस सुरु केली. आज मी या महाप्रलयाबद्दल लिहित असताना महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ४० वर गेला आहे. ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ झाली आहे. कोल्हापूरमधून जवळपास  अडीत ते पावणेतीन लाख लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. सांगलीमध्ये दीड ते दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ९ ऑगस्ट रोजी कृष्णेची पाणीपातळी ५६.५ फुटांवर पोहचली होती. रविवारी ११ ऑगस्टला कृष्णेने थोडा दिलासा दिला आहे. पणीपातळी ५३.३ फुटांवर आली आहे. सांगली शहरातील काही भागातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

चिखल आणि गाळ
कोकणपट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला पूराचा सर्वाधिक फटका बसला. ब्रम्हनाळ दुर्घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या यात्रा स्थगित केल्या. कोल्हापूर, सांगलीमध्ये रविवारपर्यंत गाव आणि शहरांमध्ये पाणी तुंबलेले होते, ते आता ओसरु लागले आहे. मात्र या पूराने झालेला चिखल आणि वाहून आणलेला गाळ पांढरे बगळे एकमेकांच्या आंगावर उडवणार नाही तर नवलच. ब्रम्हनाळ बोट दुर्घटनेला २४ तास उलटत नाहीत तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पुराच्या पाण्यात बोटिंगचा आनंद घेतांनाचा व्हिडिओ समोर आला. त्यांच्या चेहऱ्यावरील विकट हास्य हे पुराचे कोणतेच गांभीर्य त्यांना नाही आणि ब्रम्हनाळच दुर्घटनेशी त्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचेच दाखवणारे होते. त्यांच्या या व्हिडिओवरुन विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधायचे सोडले नाही. सोशल मीडियातूनही महाजनांवर जहरी टीका झाली.

महाजनांचे हे प्रताप भाजपला बॅकफूटवर घेऊन जाण्यास पुरेसे नव्हते की काय म्हणून भाजपच्या एका आमदाराने पुरग्रस्तांसाठीच्या अन्नधान्याच्या पाकिटांवर मुख्यमंत्री फडणवीसांसह स्वतःचा रंगित फोटो छापून जाहिरातबाजी केली. हाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबतही समोर आला. त्यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले की पुरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी बॉक्स कमी पडत असल्यामुळे पक्षाचे स्टिकर असलेले बॉक्स वापरले. त्यासोबतच त्यांच्या सौभाग्यवतींचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले की, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी त्या कित्येक दिवसांपासून स्वतःच्या स्वयंपाक घरात राबून डबे पाठवत आहेत.

भिडे कुठे आहे?
सांगलीचा उल्लेख झाला आणि भिडेची आठवण राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना झाली नाही असे कसे होईल. पूराचे पाणी कमी-कमी होऊ लागले तसे सर्वच आपल्या बिळातून बाहेर निघून 'मुखशुद्धीकरण' करताना दिसून येत आहे.  सांगली बुडत असतांना भिडे कुठे होते, सांगलीकरांच्या मदतीसाठी ते काही करतांना का दिसले नाही, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. भिडेबद्दलचा सवाल उपस्थित झाल्यानंतर सोशल मीडियावर धारकऱ्यांचे २००५ मधील पुरासह २०१९ च्या पुरात भिडे कुठे आणि काय करत आहेत याची रसभरीत वर्णनेच येऊ लागली. लगोलग आव्हाडांवरही सांगलीतील चिखल फेकला जाऊ लागला.
पूरात निष्पापांचा बळी जाण्यासाठी सरकार जबाबदार आहे हे पांढऱ्या झब्ब्यातील काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी म्हटल्यानंतर विरोधीपक्षाने राजकारण न करता सल्ला द्यावा असे उपदेशाचे डोस पाजण्यात येऊ लागले आहे.
सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात अॅक्टिव्ह वंचित घटकाने टीव्ही मीडियाला पाण्यात बुडालेले बंगले आणि बहुमजली इमारतीच दिसतात का ? असा सवाल केला आहे. झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागातील झोपड्या पाण्याखाली गेल्या नाहीत का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पुरात निवडणूक आठवतेच कशी?
 राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ हा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणाचा पुरावा असल्याचे सांगितले. यांना यांच्या यात्रा महत्त्वाच्या वाटल्या त्यामुळेच पुराकडे दुर्लक्ष केले गेले असा आरोप राज यांनी भाजप सरकारवर ठेवला. शनिवारी झालेल्या राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुरानंतर वाहून आलेल्या गाळात उडी घेण्यास उद्धव ठाकरेही रविवारी आले. त्यांनी गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनावर बोलणे टाळले. मात्र राज ठाकरेंनी पुरामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे तेव्हा विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, या मागणीचा समाचार घेतला. पुरस्थितीत यांना निवडणूक आठवतेच कशी असा सवाल उद्धव यांनी केला.
पुरात वाहून आलेला गाळ आणि चिखल विधानसभा निवडणुकीपर्यंत हे बगळे एकमेकांवर कसा उडवतात, हे पाहाण्यात महाराष्ट्राची जनता रंगून जाईल आणि पुन्हा नव्या पुराची वाट पाहिल. आपल्या एकत्मतेच्या दर्शनासाठी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...