
रोजचा दिवस नवा, हे प्रत्येकालाच माहित आहे. त्यात मला सांगण्यासारखे वेगळे असे काही नाही. आजचा दिवसही कालच्या सारखाच गेला. रोजच्या नियमाप्रमाणे ऑफिसमध्ये आलो, ऑफिसामध्ये मला नेमून दिलेले काम पूर्ण केले आणि आता घरी जायची वेळ टळून गेली आहे. बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट दिल्या नाही म्हणून हा प्रपंच.
आता मी मुंबई सोडून आठ-नऊ महिने झाले आहेत. आता मी माझ्या मुळ गावी म्हणजे औरंगाबादमध्ये आहे. एवढ्या दिवसांनी मी लिहित आहे, म्हणजे मुंबईत मुबलक वेळ होता असा त्याचा मुळीच अर्थ नाही.
मुंबईतील पूर्णवेळ हा ऑफिससाठी होता. कारण तिथे मी ऑफिस संपल्यानंतर घरी जाऊन काय करु ? असा प्रश्न माझ्या समोर उभा राहात असे. (कधी कधी नरिमन पॉईंट - मंत्रालयाकडे चक्कर मारायला जायचो. तेवढाच काय तो विरंगूळा) त्यामुळे वाचन ब-यापैकी वाढलं होतं. हा ही त्या वेळेचा मला फायदा झाला. इथे म्हणजे औरंगाबादला मात्र ऑफिस व्यतीरिक्त अनेक कामे असतात, त्यामुळे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर घरची आणि इतर काही महत्त्वाची कामे उरकण्यात दिवस निघून जातो आणि दुसरा दिवस उजाड़तो.
पण, मी ही सर्वांचीच (कदाचित नसेलही. असे सन्माननीय अपवाद वगळून) बोरींग कहानी का रिपिट करीत आहे. तर असो...
एवढा वेळ झेलले त्या सर्वांना धन्यवाद. पुढेही आपले सहकार्य लाभेल असे गृहित धरतो. हे 'गृहित' राज ठाकरे सांगतात त्या प्रमाणेच बरका. उगाच ताकाला जाऊन भांडे लपवायला नको. (ही सगळी मंडळी तुम्हाला गृहित धरतात. आपलीच माणसं आहेत. जाणार कुठे. कसंही वागवलं, कितीही त्रास झाला तरी मते आपल्यालाच देणार. असं गृहित धरतात. इति राज ठाकरे)
आता या राज ठाकरेंनी मुंबईचा 'किंग मेकर' मी असणार अशा खूप बाता मारल्या मात्र मुंबैकरांनी 'काका'ला अर्थात बाळासाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा ही २१ हजार कोटी की काय ते, कोंबडी बहाल केली आहे. (आपल्याला त्यातले फारसे आकडे तोंडपाठ नाहीत बुवा.) आणि त्यांनीही ती काखोटीला मारून मिळवून दाखविलाचा 'गजर' सुरु केला आहे. या ठाकरे कुंटूंबाच्या कौटूंबिक भांडणात पवारांच्या घड्याळाचा गजर फक्त पिंपरी-चिंचवडमध्येच झाला. बाकी मुंबैकरांनी काँग्रेसला नेहमीप्रमाणे 'हात' दिला. दिल्लीवरुन आऊटसोर्स केलेले पृथ्वीराज चव्हाण यांना अजून काही हा मुंबै आणि महाराष्ट्राचा खेळ कळालेला दिसत नाही. तसे पृथ्वीबाबा तंत्रज्ञानात अतिशय हुषार पण या महाराष्ट्राचे तंत्रच वेगळे आहे त्याला ते तरी काय करतील बिचारे . हे एकटेच काय ते विकासाच्या चार गोष्टी मतदाराच्या गळी उतरवत होते. बाकी अजित पवार त्यांना दादा म्हणण्याची प्रथा आहे ती टाळून, त्यांनी मुंडेंमागे घरचेच लचांड लावून दिले. मुंडे बिचारे दिल्ली , मुंबै , उर्वरीत महाराष्ट्र सोडून बीड आणि त्यातही परळीत मुक्काम ठोकून बसले. त्यांना या धाकल्या पवारांनी मानसिक संतूलन बिघडल्याचेही प्रमाणपत्र देऊन टाकले. आता मराठवाड्यातील माणसाला बोलल्यावर माझ्यासारख्या दुस-या मराठवाड्यातील माणसाला पक्ष-बीक्ष बाजूला ठेवून वाईट वाटतचं. पण वाटून करणार काय 'सौदा'च सारा. रामदास आठवलेनी नाही केला, शिवसेनेबरोबर दलित मतांचा सौदा.
या सौद्याच्या भाजीची शिवसेनेला काही चव आली नाही मात्र रामदास आठवले आपली चव घालवून बसले. काय ती शेरो शायरी, काय त्या कविता. नुसतं ट ला ट , प ला प. काहीही असो, त्यांच्यातील कवीला खासदारकी गेल्यानंतर नॅशनल स्टेज मिळाला नव्हता, तो उद्धव ठाकरेंनी एमएमआरडीएचा मिळवून दिला, आणि हक्काचा प्रेक्षकही. आता या पुढे शिवसेना त्यांना कशी ट्रिटमेंट देते हे पाहावे लागेल.
तर मी काय सांगत होतो. हं , राज ठाकरे. राज ठाकरे हे मुंबईत नाही पण जवळच्याच नाशिकमध्ये किंग मेकरची भूमिका निभावणार आहे. नाशिकमध्ये राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन सगळ्यांनाच धक्के देत चांगलेच धावले आहे. आता ते इथे भाजप आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करतीलही आणि त्यांच्या मनात असलेली ब्लू प्रिंट आपल्याला पहायला मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्राने गृहित धरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा