
रिपब्लिकन पक्षाचे नेत रामदास आठवले यांचा मुंबई महापालिकेत केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. मात्र याच वेळी त्यांनी ज्या दोन पक्षांशी युती केली त्या शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. भाजप तर मागील निवडणूकीपेक्षा तीनने अधिक आहे. मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे. ज्याची भाजपनेत्यांनाही अपेक्षा नव्हती. या सगळ्यावर रिपाई नेते आठवले यांनी नुकतेच मुंबईत भाष्य केले आहे.
गेली अनेक वर्षे आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर होतो. आमची मते त्यांना मिळत होती, परंतु आता आम्ही शिवसेना-भाजपबरोबर आहोत. महापालिका निवडणुकीत मात्र या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने आणि आमच्यातही बंडखोरी झाल्याने रिपाइंचे उमेदवार निवडून आले नाहीत, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी पुन्हा एकदा केला.
मुंबई पत्रकार संघात आयोजित एका कार्यक्रमात शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले एकत्र आले होते. याप्रसंगी आठवले म्हणाले की, ‘गड आला पण सिंह गेला’ अशी आमची अवस्था झाली आहे. आमची मते महायुतीकडे वळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, परंतु या दोघांची (शिवसेना, भाजप) मते आमच्याकडे वळली असती तर आमचे दहापर्यंत उमेदवार नक्कीच निवडून आले असते. रिपाइंच्या दोघांनी बंडखोरी केली, तर यांचे 8 बंडखोर होते. त्यामुळेच आमच्या जागा कमी निवडून आल्या. असे असले तरी आम्ही महायुतीसोबत आहोत आणि यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेलेली आमची मते विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता आठवलेंनी काँग्रेस - राष्ट्रवादीकडे वळालेली मते पुन्हा स्वतःकडे वळविणार असल्याचे म्हटले आहे. मात्र हे बोलण्या एवढे सोपे काम नाही.
मुळात शिवसेनेने रिपाईला सोबत घेण्याचे प्रमुख कारण दलित तरुण मते हे होते. मुंबईतील दलित तरुण हा दिशाहीन झालेला आहे. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व जवळचे वाटत आहे. गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत ही मते मनसेकडे वळाल्यामुळेच त्यांचे उमेदवार हे लाखांच्या घरात गेले होते. ही तरुण मते जर मनसेकडे वळू शकतात तर ती शिवसेनेकडे का डायव्हर्ट करता येणार नाही, या दृष्टीने शिवसेना - प्रामुख्याने उद्धव ठाकरे विचार करीत होते. तेव्हा पासूनच ते ही मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांच्याकडे एकही प्रसिद्ध चेहरा नसल्यामुळे त्यांच्या सभांमधून भीमशक्तीच्या नावाखाली केवळ निळे झेंडे फडकतांना दिसत होते. रामदास आठवलेंच्या रुपाने आंबेडकरी जनतेतील जाना-माना आणि मास लिडर असलेला चेहराच नव्हे तर नेता त्यांच्या गळाला लागला आणि मुंबई महापालिकेत त्यांना या नेत्याचा करिष्माही पाहायला मिळाला. चौथ्यांदा सेना-भाजप युतीला मुंबैची कोंबडी मिळाली आहे.
मात्र याच वेळेस शिवसेनेने रिपाईला दिलेल्या २९ जागांपैकी किती जागा या त्यांच्याकडे नंबर एक आणि नंबर दोनच्या होत्या. याचे उत्तर आहे एकही नाही. या सर्व जागा मागील पालिका निवडणूकीत चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर असलेल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी सेना-भाजपचे उमेदवारच काय खुद्द उद्धव ठाकरे उभे राहिले असते तरी निवडून आले नसते. अशा जागा रिपाईच्या झोळीत त्यांनी टाकल्या. त्यातही दहा - बारा ठिकाणी शिवसेना- भाजपचे बंडखोर उभे होते. त्यामुळे विरोधी काँग्रेस - राष्ट्रवादी - मनसे बरोबरच रिपाईच्या उमेदवारांना महायुतीच्या बंडखोरांशी लढा द्यायचा होता. यामुळे त्यांची अर्धी शक्ती तिथेच खच्ची झाली. यासोबतच विरोधी उमेदवार आणि बंडखोरांकडे वाहणारा पैशांचा महापूर हा रिपाई उमेदवार कुठून आणणार होता ?
याचाच अर्थ महायुतीच्या नावाखाली सेना-भाजप युतीने आठवलेंच्या रिपाईची पूर्ण मते मिळविली मात्र २९ प्रभागांमध्ये युतीचे एकही मत रिपाई उमेदवारांना पडले नाही.
हा केवळ राजकीय विरोध नाही. यामागे फार मोठे षडयंत्र आहे. रिपाईच्या उमेदवार निवडून आला तर त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही त्यांना जयभीम घालणार का ? उद्या कपाळी निळ लावून तुम्ही फिरणार आहात का ? आणि एकदा का त्यांना निवडून आणले की पुढच्यावेळेसही ते या जागेवार दावा सांगतील तेव्हा तुम्ही त्यांना आडवू शकणार नाही. त्यामुळे आत्ताच यांच्या पायात पाय घाला आणि यांना पाडा. हे मनुवादी षडयंत्र या मागे आहे. याची जाण आठवलेंना नाही असे म्हणणे चुकेचे ठरेल मात्र, आठवले हे संसदीय राजकारणापासून सध्या अलिप्त आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांना जोपर्यंत आमदारकी किंवा खासदारकी मिळत नाही तोपर्यंत तेही कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन देणार नाहीत.
शिवसेना-भाजपने जर मनावर घेतले असते तर रिपाईचे देखील १०-१२ नगरसेवक मुंबई महापालिकेत असते. मात्र त्यांना तसे व्हावे असे वाटतच नाही. त्यांच्या मनातील मनुवाद अजून संपलेला नाही. दलित माणसे मोठी व्हावी ही भावना अजून त्यांच्या मनालाही शिवलेली नाही. आणि जोपर्यंत त्यांच्यातील वर्णव्यवस्थेची मानसिकता, मनुवादी दृष्टीकोण गाडला जात नाही तोपर्यंत सर्वसाधारणच नव्हे तर राखीव प्रभागातूनही रिपाईचा उमेदवार निवडून येणे शक्य नाही.
मुंबईतील पत्रकार परिषदेत आठवलेंनी गड आला पण सिंह गेला असल्याचे म्हटले. पण गड कोणाचा आला आणि सिंह कोणाचा गेला याचा खुलासा केला नाही. हा गड शिवसेनेचा आला आहे. कारण आठवलेंचा गड कधी नव्हताच तो यावेळी येण्याची शक्यता होती. मात्र मनुवादी मानसिकतेने आठवलेंचे ते स्वप्न सत्यात उतरु दिले नाही. मागील वेळेचा आकडाही यंदा आठवले यांचा पक्ष गाठू शकलेला नाही त्यामुळे सिंह गेला एवढे मात्र नक्की. त्यामुळे आगामी काळात (२०१४चे लक्ष्यं समोर ठेवून) स्वतःची क्रिडीबीलीटी वाढविणे हे मोठे काम आठवले आणि इतर रिपाई नेत्यांना करावे लागणार आहे.
आपापले एक एक पॉकेट निर्माण करुन ते मजबूत करणे एवढेच ध्येय आठवलेंसह प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे यांनी केले पाहिजे. बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारखे केडरबेस कार्यकर्ते तयार करणे हे आजच्या घडीतील अवघड काम जर या नेत्यांकडून झाले तर या पुढील काळात दलित चळवळीला दिशा सापडू शकते अन्यथा या निवडणूकीसारखीच अवस्था दलित मतांची आगामी काळातही होईल. आणि गुरे हाकून न्यावी तशी ही मते कोणीही हाकून घेऊन जाईल.
आपले निरिक्षण आणि विश्लेषण वाचून आपल्यातल्या राजकीय विश्लेषकाची आज ओळख झाली...छान
उत्तर द्याहटवा