आज जागतिक ग्राहक दिन आहे. ग्राहकाच्या हक्कांचे रक्षण करणारे अनेक कायदे राज्य आणि केंद्र सरकार कडून केले जात आहेत. उत्पादन निर्माते आणि दुकानदारही ग्राहकाला देव म्हणत त्याला मोठा मान-सन्मान देतात आणि हळूच त्याच्या खिशाला अशी काही कात्री लावतात की, त्याला कळत सुद्धा नाही की, आपण लुबाडल्या गेलो आहोत.
सध्या कोणत्याही मौल्यवान वस्तुच्या खरेदीला गेल्यानंतर दुकानदाराकडून एक वाक्य हमखास फेकले जाते, साहेब-बाईसाहेब हौसेला कुठे मोल असते का ? अरे बाबा, हौसेला मोल नसते हे मान्य आहे. पण हौस कोणाची होत आहे आणि फजिती कोणाची एवढे कळण्याची तरी आम्हाला उसंत देत जा !
आज सकाळी साधरण दहा-सव्वा दहाची वेळ होती, औरंगाबादच्या मुख्य बाजारपेठेतली एका दुकानात गेलो होतो. नेमकेच दुकान उघडले गेले होते. दुकानातील सामानावरील धुळ झटकण्याचेच काम सुरु होते. तेव्हाच तेथील एका महिला कर्मचा-याला एक महाविद्यालयीन मुलगा म्हणाला, मला ती वस्तू द्याना.. तेव्हा थोड्या चढ्या आवाजातच ती महिला बोलली त्यावर दुकानाचे मालक शांतपणे त्या महिलेला म्हणाले, त्यांना घाई असेल लवकर आवर आणि त्यांना काय हवे ते दे.. तेव्हा असे वाटले की, किती ही ग्राहकाची काळजी.. पण त्यानंतर माझी खरेदी संपली आणि मी एवढ्याशा वस्तूचे एवढे पैसे का? असा सुर अळवला तेव्हा मात्र, मला असलेल्या घाईचा, माझ्या नाराजीचा विचार न करता त्या दुकानदाराने, नाही.. त्याचे तेवढेच बील होते असे सांगितले आणि माझ्याकडून एक रुपया देखील कमी घेतला नाही...
सांगायचा मुद्दा एवढाच की, ग्राहकाला अतिथी म्हणून देव म्हणून कितीही गोंजारले जात असले तरी, त्याचा खिसा कापला जाणारच आहे हे त्याने लक्षात घेतले पाहिजे.
औरंगाबादसारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरात झपाट्याने मॉल उभारले जात आहेत आणि नफा कमावून बंद होत आहेत. याचाही ग्राहकांनी विचार करण्याची वेळ आली आहे. ८० च्या दशकात येथे औद्योगिकरणाने वेग घेतला होता. मोठ्या प्रमाणात कंपन्या औरंगाबादला आल्या होत्या. यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळाला. शहराचा विकास झाला मात्र आज त्याच औद्योगिक क्षेत्रात ६० टक्क्यांहून अधिक कंपन्या बंद पडलेल्या आहेत. या मोठ्या कंपन्यांना पुरक लघुउद्योग निर्माण झाले ते तर बेवारस झाल्या सारखे झाले.
आता शहरामध्ये राज्य आणि केंद्र सरकारची अनेक कार्यालये झाली आहेत. विविध नामांकित कंपन्यांची कार्यालये आहेत. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, तारांकित हॉटेल्स निर्माण झाल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग तयार झाला आहे. या वर्गाचे महिन्याचे ठराविक उत्पन्न पक्के आहे. याचा अभ्यास करून गेल्या काही वर्षात औरंगाबादमध्ये अनेक मॉल सुरु झाले. चकचकीत दुकानांमधून खरेदी करण्याची संधी सर्वसामान्यांना मिळायला लागली. मग रस्त्यावर किंवा छोट्या दुकानांमध्ये जी वस्तू अर्ध्या किंमतीत मिळाली असती तीच तिथे दुप्पट भावात घेतली जाऊ लागली. सणावारांच्या काळात तर मॉलमधील गर्दी आवरायला पोलिसांचीही मदत मॉल चालवणा-यांना घ्यावी लागली. असे उदंड ग्राहक असताना येथील मॉल झपाट्याने बंद का झाले याचा शोध ग्राहकांनी घेतला पाहिजे.
जेवढ्या मोठ्या प्रमाणात औरंगाबादमध्ये कारखाने आणि उद्योग आले त्यातील बहुतेक काही काळानंतर नफ्यात असतानाही विविध कारणे देऊन बंद केले गेले. त्याचे कारण सरकारकडून मिळणारे अनुदान (सबसिडी) हे होते. अनुदानाची रक्कम खिशात पडल्यानंतर थातूर-मातूर कारणे देऊन ग्रामीण भागातून रोजगारानिमीत्त शहरात येऊन स्थिर झालेल्या कामगारांना या गल्लेभरू उद्योजकांनी रस्त्यावर आणले. आता, नफा कमावल्यानंतर मॉल बंद होत आहेत. येथे काम करणारा कामगार काय करत असले, याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही... की आपले पोट भरत आहे ना.. किती महागाई वाढली, असे म्हणत ८० रुपये लिटरचे पेट्रोल भरून आपण या सर्व गोष्टींवर धूराळा उडविणार आहोत...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा