नवीन वर्ष आले की, नित्य नियमाने मी व्यायाम करण्याचा संकल्प करतो. त्याला निसर्गही तेवढीच साथ देतो. जानेवारीमध्ये बोचर्या थंडीचे दिवस असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये हा संकल्प प्रत्यक्षात उतरवणे अंगी लागते. मात्र, पंधरा-वीस दिवसांनी संक्रांत येते आणि हिवाळा कमी-कमी होऊ लागतो तसा माझा उत्साह देखील मावळतो. संकल्पावरच संक्रांत येते. मग व्यायामाचा संकल्प केला होता हे देखील विसरायला होते. असो. हा झाला १ जानेवारी २०१५ पर्यंतचा इतिहास. यावर्षी संकल्प म्हणून नाही तर, मी स्वतःसाठी काही लिहू इच्छित आहे. माध्यमाच्या जगात काम करत असताना आपला स्वतःचा काही दृष्टीकोण असला पाहिजे. स्वतःचे असे काही मत असले पाहिजे. स्वतःची काही भूमिका असली पाहिजे, असे अनेक दिवसांपासून मनात घोळत होते. रस्त्याने चालताना अनेक गोष्टी दिसतात त्या बातमीत मांडणे शक्य होत नाही. नवीन वर्षाच्या निमीत्ताने मनातील या विचारांना मुर्तरुप देण्याचे निश्चित केले आहे.
मित्रांसोबतच्या चर्चेत, फेसबुक - ट्विटर या सोशल साइट्सवर आणि ब्लॉगवरही मी माझी काही मते मांडत असतो. पण, त्यात एकसंधपणा नसतो. एकसुत्रता नसते. त्यामुळे चर्चेच्या ओघात बोलल्यासारखे ते सगळे असते आणि गाडी आल्यामुळे धुराळा उडावा आणि गाडी नजरेआड होईपर्यंत धुराळा खाली बसावा तसा तो प्रकार झालेला असतो. आता असे न होऊ देता दर आठवड्याला एका विषयावर लिहून त्याबद्दलचे स्वतःचे मत मांडायचे आहे. प्रत्येक आठवड्यात या चाकोरीतच लिखाण होईल असे काही माझे स्वतःवर बंधन नाही. मी वारंवार माझे मत - माझे मत म्हणत आहे, त्याचा अर्थ मी फार काही वेगळे मांडणार आहे, किंवा मी एखाद्या मुद्यावर अडून बसणार आहे असेही नाही. माझा प्रयत्न फक्त मी पाहिलेले, अनुभवलेले आणि माझ्या समजुतीप्रमाणे जोखलेले जग मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावर तुम्हा सर्व मित्रांचे मार्गदर्शन आणि सल्ला अभिप्रेत आहेच.
आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती, या दिवशी मी नव्या लिखाणाला प्रारंभ करीत आहे. हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले या महत्मा फुल्यांच्या पत्नी असल्या तरी स्वतंत्र बाण्याच्या आणि स्वंतत्र व्यक्तीमत्व असलेली देशातील पहिली शिक्षीका होती. त्या माऊलीने कष्ट सोसले नसते तर, या देशातील महिलांना आणखी किती दिवस अज्ञानाच्या आणि रुढीवादाच्या अंधकारात चाचपडत राहावे लागले असेत हे सांगता येणे कठीण आहे. पंरपरा, दैववाद, चालीरीती, रुढी यातून आज महिला पूर्ण मुक्त झाल्यात असा दावा करणे फोल आहे. पण, तरीही शाळेतील शिक्षीकेपासून, कार्यालयात अधिकारी, आमदार-खासदार लोकसभाध्यक्षा- राष्ट्रपतीपदापर्यंत या देशाची महिला गेली आहे. त्याची बीजे ही सावित्रीबाईंच्या कार्यात दडलेले आहेत.
सावित्रीबाईंना शाळेत जाण्यापासून परावृत्त करण्यास जेव्हा कर्मठांना जमले नाही तेव्हा त्यांनी अफवा पसरवली होती, की त्यांच्या शाळेत शिक्षण घेणार्या महिलांनी गिरवलेल्या अक्षरांच्या अळया होतील आणि त्या त्यांच्या पतीच्या ताटात पडतील. अशा प्रकारचा विरोध पत्करुन सावित्रीबाई स्त्री शिक्षण, अस्पृष्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध यासाठी झटत राहील्या. केवळ पतीच्या कार्यात हातभार एवढेच त्यांचे कर्तृत्व नव्हते तर, सावित्रीबाई स्वंतत्र प्रज्ञेच्या होत्या. त्यांनी अनेक कविता लिहिल्या. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा खांद्यावर घेतली आणि यशस्वी पुढे चालवली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले जीवन दुसर्यांसाठी त्यांनी समर्पीत केले. पुण्यात प्लेगची साथ आली असताना, त्या रुग्णांची सुश्रुषा करत होत्या. एका महाराच्या मुलाला प्लेग झाला. त्याला त्यांनी दवाखाण्यात पोहोचवले. त्याच प्लेगचा त्यांना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अशा या क्रांतिज्योती सावित्रीमाईला त्रिवार वंदन करुन दर आठवड्याला येथे भेटण्याचे अभिवचन देऊन आज येथे थांबतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा