दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने विक्रमी (७० पैकी ६७) विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाने भाजपचा (७० पैकी ०३) आणि एका अर्थाने मोदींचा अश्वमेध रोखला गेला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दिल्लीत भाजपला केवळ तीन जागांवर रोखून त्यांच्या गेल्या नऊ महिन्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सत्ता-पैसा-जात-धर्म आणि नकारात्मकता यांच्यापलिकडे मतदार विचार करतात याचा भाजपला नऊ महिन्यात विसर पडला होता. सर्वसामान्यांच्या हिताऐवजी नकारात्मक राजकारणावर स्वार होऊन विजय मिळविता येईल याला भाजप बळी पडली. दुसरीकडे पॅरेशूट उमेदवार किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार करुन स्वपक्षीयांचा रोष ओढवून घेतला, त्याचाच परिणाम त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला.
भाजपमध्ये अंतर्गत लोकशाहीची गरज
राजकीय विश्लेषक डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या मतानुसार, सध्याच्या राजकारणात वचनांची आणि आश्वासनांची परिपूर्ती करणे राजकीय पक्षांसाठी अत्यंत गरजेचे आहे. सत्ता मिळविण्यासाठी जनतेच्या आकांक्षा जागवणे वेगळी गोष्ट आहे आणि त्याची परिपूर्ती करणे वेगळी बाब आहे. 'आप'ने दिल्लीत भाजपपेक्षा आपण अधिक विश्वसनिय असल्याचे लोकांना पटवून दिले. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली देऊन आगामी काळात आश्वासनांची पूर्ती केली जाईल हा विश्वास जागविला. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने विकासाऐवजी आप आणि काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. त्यांन नकारात्मक प्रचार भोवला.
शीला दीक्षित यांचा कार्यकाळ सोडला तर, दिल्ली हा भाजपचा अभेद्य गड राहिलेला होता. येथे त्यांचे केडर आणि स्थानिक नेते भक्कम स्थितीत असताना पंधरा दिवसांपूर्वी आयात केलेल्या नेत्या किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषित केले. यामुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते दोन्हींची नाराजी मोदी आणि शहांनी ओढवून घेतली. अण्णा हजारेंच्या अंदोलनातून पुढे आलेले केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यातच लढत लावल्याने जनतेनेही भाजपकडे पाठ फिरवली. सत्तेसाठी नेते कोणत्याही पक्षात जातात, याचा रोष तरुण मतदारांनी मतदानातून व्यक्त केला.
दिल्लीच्या निकालाने भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांत संपुष्टात आलेली पक्षांतर्गत लोकशाहीची गरज अधोरेखीत झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते राज्यांमधील ज्येष्ठ नेते, स्थानिक पातळीवर काम करणार्यांच्या विचारांना स्थान द्यावे लागणार आहे.
छोट्या पक्षांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न जनतेला रुचला नाही
राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांच्या मते, भाजपचा दिल्लीतील पराभव हा या पक्षाने छोट्या पक्षांना चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न चालविला होता, त्याला उत्तर आहे. दिल्लीतील मतदारांना भाजपची ही चाल पसंत पडलेली नाही. जो विकास भाजप आणि काँग्रेसला अपेक्षीत होता त्या विकासामुळे बाजूला फेकला गेलेल्या समाज घटकाचा संताप म्हणजे 'आप'ला मिळालेला प्रचंड विजय आहे. गेल्या 15 वर्षांत गरीब व कष्टकरी यांच्याकडे फक्त आप आणि त्यांच्यासारख्या संघटना व कार्यकर्ते लक्ष देत होत्या. त्यांच्या कामाची पावती या निकालाने दिली आहे.
भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करतान डोळे यांनी सांगितले, नरेंद्र मोदी यांना अहंकाराची बाधा झाली होती. अमित शहांसारख्या माणसाला पक्षाध्यक्षपदी बसवले. त्यांनी सर्व बाजूने दुबळा असलेल्या आपला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याजोडीला घरवापसी, रामजादे-हरामजादे, हिंदू-मुस्लिम तणाव. यामुळे विकासाऐवजी धर्माधिष्टीत राजकारण भाजप करत असल्याचा अनुभव दिल्लीकरांना येत होता. त्याचा राग त्यांनी फक्त तीन जागा त्यांच्या पदरात टाकून केला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते लोकशाहीच्या दृष्टीनेही हा निकाल महत्त्वाचा आहे. जनतेचे राजकीय शहाणपण सिद्ध करणारा हा निकाल आहे. आपला मिळालेली मते ही सर्व थरातील आणि जाती-धर्मांची आहे. त्यामुळे जात-धर्म-पंथ यांच्यापलिकडे लोक विचार करतात हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे. जनतेला नवा पर्याय हवा होता आणि तो त्यांनी निवडला आहे.
(divyamarthi.com वरुन साभार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा