तुम्ही एक दिवस घरी उशिरा जाणार असाल तर बायकोचे नाहीतर आईचे पाच-दहा फोन येऊन गेलेले असतात. केव्हा येशील. कुठे आहेस. किती वेळ लागले. कोणासोबत आहे. यापेक्षा काही वेगळे प्रश्न तुमच्या कुटुंबियांच्या मनात येत नसतील. पण तो आता तुरुंगाचाच होऊन गेला आहे. त्याच्या दीड वर्षाच्या मुलाने सात महिन्यापूर्वी आपल्या बापाला पाहिले होते जाळीपलिकडे. त्या पोराला आपल्या बापाच्या खांद्यावर बसून गावभर फिरावं वाटलं नसेल का? त्याच्या आई-बापाच्या दुखण्यात त्यांना वाटलं नसेल का, की लेक असता तर दहा ठिकाणी घेऊन गेला असता आपल्याला. त्या क्रांतिकारी भगिनीच्या अंर्तमनाची घालमेल वेगळी सांगायची काय गरज आहे. तिच्या मनात क्रांतीची आग आहे आणि ओठावर नक्षलवादी असल्याच्या संशयाने तुरुंगात टाकलेला नवरा - जीवनसाथी सचिन माळीचे गीत आहे.
शीतल साठे आणि सचिन माळी यांना नक्षलवादी असल्याच्या संशयाने महाराष्ट्राची एटीएस शोधत होते. यांचा गुन्हा काय तर बुद्ध-फुले-शाहू-बाबासाहेबांची गीतं लिहातात आणि म्हणतात. दोघांनीही 2013 मध्ये मंत्रालयासमोर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. कारण काय तर आम्ही नक्षलवादी नाही हे सिद्ध करायचे होते. क्रांतीची गाणी गातो. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना त्यांचे शोषण होत असल्याचे उर बडवून सांगतो. आपला खरा आणि एकमेव बाप - बाबासाहेब. त्याचे कसे वाटे पाडले जात आहे. कोण कसा त्याचा लिलाव मांडत आहे. बिर्ला-बाटासोबत आता अंबानी-अदानी कसा तुमचा आटा पळवत आहे, हे सांगतो. हे सांगण जर लोकशाहीत गुन्हा आहे तर आम्ही जेलमध्ये जातो, यासाठी दोघांनी पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे ठरवले. ते आत्मसमर्पण नव्हते. शीतल आता जामीनावर बाहेर आली आहे. दीडवर्षांच्या त्यांचा मुलगा अभंग आता तिच्यासोबत असतो.
क्रांतीची गाणी लिहिण्याची आणि म्हणण्याची किती मोठी किंमत मोजत आहेत हे दोघं. आणि त्यात पोराचा - अभंगचा काय दोष. ज्याला अजून क्रांतीही निट म्हणता येत नसेल. काल औरंगाबादमध्ये विद्रोही शाहीरी जलसा झाला. तुडूंब भरलं होतं सभागृह. शीतल साठेंनी दगडालाही पाझर फुटावा अशा आर्तस्वरात बाबासाहेब, शिवबा-सावित्री-फुले-शाहू सांगितले. खरा शिवाजी सांगणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरेंची वडिलकीची थाप आता पाठीवर पडणार नाही याचं आभाळभर दुःख असल्याचेही सांगितले. पण या 'उजेडाच्या फुलां'ना हा समाज जपणार की नाही? हा सवालही सर्वांसमोर ठेवून गेली. सचिन अजून किती दिवस तुरुंगाच्या भिंतीवरच लिहित राहाणार. तुरुंगात असूनही त्याचा आवाज बाहेर घुमतो आहे, पण बाहेरचा आवाज त्याच्यासाठी कधी उठणार ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा