मुख्य सामग्रीवर वगळा

नेते हवेत मुद्दे जमीनीवर, बिहारमध्ये पंतप्रधानांपासून सर्वांचेच ताळतंत्र सुटले

बिहार विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ महिन्यांच्या कामाची परीक्षा आहे. त्यांनी त्यांची सर्व शक्ती तिथे पणाला लावली आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत.त्याचमुळे त्यांचे बोलण्याचे ताळतंत्र सुटले आहे. याचे दुषण भाजप समोरच्या महाआघाडीतील जेडीयू-आरजेडी-काँग्रेसला देईलही . पण जनतेला हे कळणार नाही असे केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही मोदींना कसे कळत नाही याचेच नवल वाटते. बस्तरच्या सभेत तर पंतप्रधानांनी थेट नितीशकुमार आणि लालू यादवांना आव्हानच केले की तुमच्याकडे जेवढ्या शिव्या असतील तेवढ्या आता देऊन टाका, शेवटचे सात-आठ दिवसच शिल्लक राहिले आहे. आज बिहार विधानसेभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे.  त्यानिमीत्ताने एक दिवस आधीच मी दिव्य मराठी वेब साईटसाठी (divyamarathi.com) आतापर्यंतच्या प्रचारावर माझे मत मांडले होते. त्यात विकासापासून सुरु झालेली चर्चा आता शिवीगाळीवर आणि तंत्र-मंत्रात अडकल्याचे मांडले आहे. आज बिहारमध्ये ५० जगांसाठी मतदान होत आहे. त्यानिमीत्ताने वेबसाईटसाठीेचे विश्लेषण पुन्हा एकदा माझ्या BLOG वर पुनर्प्रकाशित करीत आहे.  

नेते हवेत मुद्दे जमीनीवर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे. त्यानंतर अजून दोन टप्प्यांचे मदतान बाकी राहील. विकासाच्या मुद्यावरुन सुरु झालेली निवडणूक आज अशा वळणावर आली आहे की येथील जनता कधी मतदानाचे पाचही टप्पे संपतात आणि निकाल जाहीर होतो याची वाट पाहात आहे. देशात कुठेही काही झाले तर त्याचा संबंध बिहारच्या राजकारणाशी जोडला जात आहे. राजकीय नेत्यांची विधाने तर या चर्चेला खतपाणीच घालत आहेत. दुसरीकडे बिहारमध्ये मोदींचा विजयरथ अडवू पाहाणारे शरद पवार बारामतीतच ठाण मांडून आहेत आणि केंद्रीय मंत्र्यांची सरबराई करत आहेत. तर, महाराष्ट्र व दिल्लीत भाजपसोबत सत्तेची चव चाखणारी शिवसेना बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. मात्र त्यांचाही 'आव्वाज' काही जाणवत नाही. ना ते विजयी होणाऱ्यांच्या यादीत आहेत ना पाडणाऱ्यांच्या.

मुद्यांवरुन भरटकेल नेते

बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विकासाचा मुद्या सुरुवातीला खूप रेटला पण नंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना नेत्यांच्या सुटलेल्या तोंडाच्या पट्ट्याला आवर घालणे कोणत्याही पक्षाला जमलेले नाही. मग एकामोगोमाग डीएनए, आरक्षण, बीफवरील बंदी, शैतान, दलित - मागासवर्गियांची राजकारण्यांनी करुन घेतलेली वाटणी, फरीदाबादमधील जळीत कांड, धर्म-अधर्म यावरुन राजकारण्यांची फ्रीस्टाइल तेवढी अजून पाहायला मिळाली नाही. मात्र या मुद्यांमुळे बिहारच्या जनतेच्या रोजच्या जीवन-मरणाचे प्रश्न बाजूला पडले. बिहारमधून होणारे स्थलांतर हा कोणत्याच पक्षाचा अजेंड्यावरील ठळक मुद्दा होऊ शकला नाही.

नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यात थेट लढत


वृत्तपत्र-टीव्हीच्या माध्यमातून बिहारची निवडणूक समजून घेणाऱ्या देशातील जनतेला येथील थेट लढत दोन दिग्गजांमध्ये होत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याही भाषेचा स्तर खालवल्यामुळे बिहारी जनतेची निराशा झाली आहे. केवळ सभेला उपस्थित जनतेची खुशमस्करी करण्याच्या उद्देशाने भाषणबाजी होताना दिसत आहे. या तू-तू, मै-मै मध्ये विकासाचा मुद्दा कसा टिकणार. तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या फेरीत पंतप्रधान मोदींनी नितीशकुमारांच्या कॉम्प्यूटरमध्ये लालू नावाचा व्हायरस शिरल्याचे म्हटले आहे.

भाजप नेते गिरिराज सिंह यांनी झप्पीबाबाच्या सोबत रंगलेल्या नितीशकुमारांच्या गप्पांचा व्हिडिओ अपलोड करुन प्रचाराची पातळी आणखी खाली आणली. नितीशकुमार पराभवाला घाबरून तंत्र-मंत्राच्या भजनी लागल्याचे दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. पण व्हिडिओ लोकसभा निवडणुकीतील असल्याचे समोर आल्याने हा खोडसाळ प्रचार भाजपच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नितीशकुमारांचे सख्खे मित्र लालू प्रसाद यादव यज्ञ-याग करत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांचा या सर्वांवर कसा विश्वास आहे हे सांगणाऱ्या सुरस कथा सध्या बिहारमध्ये रंगत आहेत.

सर्वांच्याच सभेला गर्दी


लालू यादव यांच्या सभांना होणारी गर्दी त्यांच्या खास बिहारी स्टाइलने केल्या जाणाऱ्या विनोदासाठी आहे की त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन जमलेली गर्दी मतदान केंद्रातही कंदील (त्यांचे निवडणूक चिन्ह) शोधेल हे सांगणे आता कठीण होऊन बसले आहे. कारण गर्दी ही सर्वांच्याच सभेला होत आहे.
नेते हवेत, 70 हेलिकॉप्टरने सुरु आहे प्रचार

बिहारच्या इतिहासात ही विधानसभा निवडणूक प्रथमच हवेतून लढली जात आहे. पाटण्याच्या विमानतळावरुन दररोज सकाळी जवळपास 70 हून अधिक हेलिकॉप्टर उड्डाण भरतात आणि राज्यातील विविध ठिकाणी जातात. या हेलिकॉप्टरमध्ये बसलेले नेते जमीनीवरील लोकांचे किती प्रश्न मांडत आहेत हे तुम्ही रोज टीव्हीच्या स्क्रिनवर पाहातच आहात. काही नेते तर टीव्हीवरील चर्चेत भांडायालाच उभे असतात. तर सभांमधून विकासाचा मंत्र सांगण्याऐवजी आता तंत्र-मंत्राच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बक्सरच्या सभेत पुन्हा हा मुद्दा उपस्थित करुन विरोधकांचे नाव न घेता, 'त्यांचा फक्त तंत्र-मंत्रावर विश्वास उरला आहे. पण बिहारच्या जनतेला काय हवे तंत्र-मंत्र की लोकतंत्र' असा सवाल करुन टाळ्या मिळवल्या. पण या टाळ्या वाजवणारे हात बुधवारी कोणते बटण दाबतात हे महत्त्वाचे आहे.
 आवाज कुणाचा... ही घोषणाही बिहारमध्ये घुमल्याचे अद्याप कानावर आले नाही. सालाबादा प्रमाणे होणाऱ्या दसरा मेळाव्यात याबद्दल काही बोलण्याची शक्यता नव्हतीच, पण त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख किंवा त्यांचे दूत बिहारमध्ये फिरकलेले नाही. त्यामुळे शिवसेना ही निवडणूक किती सिरिअसली लढत आहे हे 'बिहारी' शिवसैनिकांना कळून चुकले आहे. त्याउलट हैदराबादी एमआयएमचे नेते तळ ठोकून बसले आहेत. मोदींना हरवणे हेच लक्ष्य असल्याचे ते म्हणत आहे. ही निवडणूक एक निमीत्त आहे. खरी लढत 2019 मध्ये होणार असल्याचे खासदार असुदुद्दीन ओवेसी सध्या बिहारमध्ये म्हणत आहेत. त्याच बरोबर अच्छे दिन कुठे गेले, 15 लाख केव्हा मिळणार हा देखिल त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे.
त्यामुळे बिहारी जनतेला प्रश्न पडला आहे की हे पक्ष निवडणुक जिंकण्यासाठी मैदानात उतरलेत की हारण्यासाठी. कारण काही पक्ष असेही आहेत ज्यांचा पराभवातच विजय आहे. हे काहीही असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीत स्वतःला पणाला लावून निवडणूक रंगतदार केली आहे.

- साभार, विशेष आभार www.divyamarathi.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...