आई असल्यावर जाणवत नाही एकटाच असलो की, मनावर अनाहूत काजळी पसरते. मग चार भिंतीचं सुरक्षा कवच असलेल्या घरात, जर्नालिझमच्या हॉलमध्ये, बुद्धलेणीच्या पायथ्याशी, पिंपळाच्या जाळीदार सावलीत मी कुठेही असलो तरी, माझ्या एकटेपणाला सोबत करायला 'आई' हळुवार पावलाने येते. कधी-कधी माणसांच्या मेळ्यात, नात्यांच्या गोतावळ्यात, माझ्या एकाकी मनाची आई सोबती होते. एकटेपणाच्या गर्तेतून आई माझा उजवा हात हाती धरून, डावा हात पाठीवर फिरवून येणा-या प्रत्येक संकटाशी धैर्याने सामोरे जाणाचे बळ देते. त्यावेळी ती खूप काही सांगते. तिला लाभलेल्या छोट्याशा आयुष्यातील ब-या-वाईट अनुभवाचं संचित आई माझ्या पुढयात ठेवेत... कोजागिरीच्या पिठूर चांदण्यात आईची गोरी कांती अधिकच उजळून निघायची. सर्वांसाठी द्रवणारं तिचं ह्रदय, आजही कळत नाही तिच्या ह्रदयाचा थांग. कुठून साठवलं होतं तिनं एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचं तिच्याशी आपलेपणाचं नातं. 'उपाशीपोटी पाण्याच्या घोटी सपान पडतं आभाळ झडतं ग आभाळ झडतं' अशी मनाची अवस्था झाली की, मनाच्याही नकळत मनभर व्यापून राहाते आई; आणि म्हणूनच प्रत्येक ...