मुख्य सामग्रीवर वगळा

समितीचे पाय मातीचे हवे

महाराष्ट्रात तिसरी आघाडी एकदाची झाली.तिचं बारसंही काल झालं. "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती". या समितीतील सगळ्यांनी हातात हात धरून हात उंचावले...आम्ही एकत्र असल्याचे दाखवण्यासाठी... प्रेसवाल्यांना, टिव्हीवाल्यांना फोटो दिले. या तिस-या आघाडीत आहेत, 1)शेतकरी कामगार पक्ष,(त्यांच्याच ऑफिसमधे बसून प्रेस घेतली म्हणून त्यांचे नाव प्रथम) 2)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकत्रीत), अजूनही रिपाईच्या पुढे कंस घालावाच लागतो. त्याशिवाय कळत नाही आपण कोणत्या रिपाई विषयी बोलत आहोत ते. अशीच अवस्था कमी जास्त प्रमाणात या आघाडीत सामील झालेल्या पक्ष - संघटनांची आहे. 3)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, 4)भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 5)स्वाभिमानी शेतकरी संघटना. 6)समाजवादी पार्टी, 7)जनता दल सेक्युलर, 8)परिवर्तन आघाडी 9)सोशालिस्ट फ्रंट 10)लोक जनशक्ती पार्टी 11)राष्ट्रीय समाज पक्ष 12)समाजवादी जनपरिषद 13)सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष 14)लोक राजनिती मंच 15) लोकभारती आणि 16)लोकसंघर्ष मोर्चा या सोळा पक्षाची मोट बांधण्यात आली आहे. आणखी बरेच पक्ष येवून मिळण्याचे संकेत या समितीने काल दिले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विकास आघाडीला दूर ठेवण्यात आले आहे.
या सर्व पक्ष - संघटनांच्या नावाची उजळणी केली असता काही नावं अगदीच अपरिचीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे स्वबळावर आधी आमदार आणि आता खासदार झाले आहेत. या सगळ्या पक्षांचे मिळून सध्या दोन अंकी आमदार आहेत. रिपाईची एक गठ्ठा ताकत निर्माण झाली आहे. डाव्यांचेही काही टापू मजबूत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचाही बांधलेला मतदार आहे. असा सारासार विचार केला तर तिसरी आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादीला मोठी डोके दूखी ठरू शकते. सेना-भाजपच्या खेम्यामधे या आघाडीमुळे नक्कीच आनंदाचे वातावरण असणार. सेनेचे सीईओ उध्दव ठाकरेंच्या गालावर खळी पडली असं खात्रीलायक वृत्त देखील आलं आहे.
मी 8 ऑगस्ट ला लिहिलेल्या ब्लॉग मध्ये रिपाई समोरील आव्हाने यात, रिपाईची ताकत महाराष्ट्र देशा समोर आली तर समविचारी पक्ष नक्कीच त्यांना येवून मिळतील, हा होरा व्यक्त केला होता. कारण महाराष्ट्रात आता छोट्या पक्षांचं मोठं पेव फूटलेलं आहे. त्याने लोकशाही नक्कीच वृद्धींगत होत आहे. (हा वेगळ्या ब्लॉगचा विषय होवू शकेल) काँग्रेस, राष्ट्रवादी हे एकाच माळेचे मणी आहेत, हे आता लोकांना चांगलच कळून चुकलं आहे.पण मग कोणा मागे जावं हा प्रश्न शिल्लक राहतोच. तिस-या आघाडीने समर्थ पर्याय महाराष्ट्राला दिला तर महाराष्ट्र देशाच्या राजकारणात वेगळं चित्र पहायला मिळेल हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही. सेना - भाजप या जातीयवादी पक्षांना चार हात दूर ठेवून रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी आपला मार्ग चोखाळत आहे. तोच न्याय त्यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडी सोबतही ठेवावा. ज्या प्रकारे राजू शेट्टी हा आमचा उमेदवार आहे. तो विधानसभेत-संसदेत गेला पाहिजे ही तळमळ ऊस उत्पादक शेतक-यांना वाटली. अशीच उमेद या समितीने जनतेत निर्माण करायला हवी. यांची जमेची बाजू म्हणजे को-या पोटीची बरीच मंडळी अजून यांच्याकडे आहे. त्यांना प्रमोट केलं पाहीजे. बाह्य फायदा या समितीला होण्याची शक्यता दाट आहे. भाजप आपल्याच चिंतनात गर्क आहे. अंतर्गत सुंदोपसुंदीत त्यांचा वेळ , श्रम आणि बुध्दी खर्च होत आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसचे बैल दिवसागणिक ढूसण्या देवून सतावत आहेत. आम्हाला आघाडी नको - तुम्हीच विलीन व्हा, स्वतंत्र लढू अशी राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारी विधानं रोजच्या रोज केली जात आहेत. त्यामुळे आघाडी झाली तरी ती पोटातून की ओठातून हे कोणालाच कळणार नाही.
सगळ रान हे रिपब्लिकन डावी लोकशाही समितीलाच मोकळं आहे असा नक्कीच याचा अर्थ नाही. जमीन भुसभुशीत आहे हे मात्र तेवढं खरं.
प्रकाश आंबेडकरांचा रिपाई एकिकरणात आणि रि.डा.लो.समितीत अजून सहभाग नाही. त्यांचा या पंधरा सोळा पक्ष-संघटनांपैकी ब-याच जणांशी निवडणूकपूर्व आघाडीसाठी संपर्क होता. रिपाई एक्यावर आंबेडकरांचा विश्वास नसला तरी डाव्या , समविचारी पक्षांशी त्यांचा नेहमी संपर्क असतो . आता ते समितीत सामील होणार की 'ऐकला चलो रे' ची री ओढणार , हे अजून गुलदस्त्यात आहे. समितीचा मतदार ग्रामीण महाराष्ट्रात जास्त असला तरी मनसे फॅक्टरचा अव्हेर करुन आज कोणत्याही पक्षाला पूढे जाता येणार नाही हे ही ध्यानी घ्यावं लागेल.
या सोळाही पक्षाच्या धुरीणांनी अंगझडून एकमेकांसाठी फिरलं पाहिजे. नसता हे कागदी वाघ ठरायला वेळ लागणार नाही.

टिप्पण्या

  1. काही शब्दांचा अपवाद वगळता ब्लॉग चांगला झाला आहे. उदा. शिवसेनेच्या खेम्यात हा शब्द... खेम्यात हा शब्द खटकतो. खेमा हा उर्दू शब्द तेथे तुम्ही गोटात हा शब्द वापरू शकला असता. दुसरी गोष्ट आकडेवारीत तुम्ही गाफील दिसता. कारण सोळा पक्षांचे कडबोळे असले तरी त्यांची कोणत्या भागात किती ताकद आहे हे इतिहास आणि वर्तमानाचे संदर्भ देऊन आकडेवारीसह देता आले पाहिजे. हे शक्य होऊ शकेल ना. तुम्ही निवडणूक आयोगाच्या बेबसाईटला भेट दिल्यास तेथे आयता संदर्भ उपलब्ध होऊ शकेल.

    उत्तर द्याहटवा
  2. Jai Maharashtra !
    Very interesting and realistic analysis. Only shortcoming is About Hon'ble Shree Uddhavaji's position. You are using word C.E.O.which is not acceptable by all means .It is my humble request you to respect him and use word Shivsena Karyadhyaksha OR Shivsena Executive President.
    Thank you
    Tukaram Saraf
    Bhartiya Vidyarthi Sena
    Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University,
    Sambhajinagar.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...